“गेल्या १० वर्षांत पहिल्यांदाच मी संपूर्ण एक महिना बॅटला स्पर्शदेखील केला नव्हता. मी मानसिकदृष्ट्या कणखर आणि खेळण्यासाठी उत्सुक असल्याचे दाखवून देत असलो, तरी तसे नव्हते. मी भास करून देत होतो,” असे भारताचा क्रिकेटपटू विराट कोहलीने सांगितले. याबाबतचा व्हिडीओ भारतीय क्रिकेट नियामक मंडळाने (बीसीसीआय) शेअर केला आहे.
कोहलीने म्हटले आहे की, “मी कायम स्वतःला सांगत होतो की, तू हे करू शकतोस, तू स्पर्धात्मक वृत्तीचा आहेस. तुझ्या खेळात ती उत्कटता आहे; मात्र माझे शरीर सांगत होते की, आता थांब, ब्रेक घे थोडी माघार घे. त्याने स्पष्ट केले की, मी मानसिकदृष्ट्या खूप कणखर असल्याचे दिसतो. मी तसा आहेदेखील; मात्र सर्वांना मर्यादा असतात. त्या मर्यादा ओळखण्याची गरज असते; अन्यथा प्रतिकूलता निर्माण होते. कोहली बॅडपॅचमधून बाहेर येण्यासाठी ब्रेकवर गेला होता. आता तो आशिया कपसाठी संघात परतला असून आपल्या बॅड पॅचवर मात करण्यासाठी सज्ज झाला आहे. सुमारे एक हजार दिवसांपासून त्याच्या बॅटमधून शतक आलेले नाही. तो इंग्लंड दौऱ्यावर अपयशी ठरल्यानंतर त्याला वेस्ट इंडिज आणि झिम्बब्वेविरुद्धच्या मर्यादित षट्कांच्या मालिकेसाठी विश्रांती देण्यात आली. हा ब्रेक विराट कोहलीसाठी का महत्त्वाचा होता हे विराट कोहलीने सांगितले.