क्रीडा

विराट भारतात परतला! आयपीएलच्या तयारीसाठी सोमवारपासून बंगळुरूच्या सराव शिबिरात होणार सहभागी

Swapnil S

नवी दिल्ली : भारताचा तारांकित फलंदाज विराट कोहली तब्बल दोन महिन्यांनी भारतात परतला आहे. वैयक्तिक कारणास्तव गेल्या दोन महिन्यांपासून इंग्लंडमध्ये असलेला विराट रविवारी मुंबईतील विमानतळावरून बाहेर पडत असतानाची चित्रफित स्टार स्पोर्ट्सच्या अधिकृत ट्विटर खात्यावर पोस्ट करण्यात आली आहे.

२२ मार्चपासून आयपीएलच्या १७व्या हंगामाला प्रारंभ होणार आहे. यासाठी रॉयल चॅलेंजर्स बंगळुरूचे सराव शिबीर सुरू झाले असून ३५ वर्षीय विराट सोमवारपासून त्या शिबिरात दाखल होईल. स्पर्धेच्या सलामीच्या सामन्यातच बंगळुरूची गतविजेत्या चेन्नई सुपर किंग्जशी गाठ पडणार आहे. यानिमित्ताने चाहत्यांना विराट व महेंद्रसिंह धोनी यांच्यातील जुगलबंदी पाहायला मिळेल.

पत्नी अनुष्का दुसऱ्या अपत्याला जन्म देणार असल्याने विराटने इंग्लंडविरुद्धच्या पाच कसोटी सामन्यांच्या मालिकेतून माघार घेतली होती. फेब्रुवारीत या दाम्पत्याला पुत्ररत्न झाले. त्याचे नाव अकाय ठेवण्यात आले आहे. दरम्यान, जानेवारीत अफगाणिस्तानविरुद्ध विराट अखेरची लढत खेळला आहे. यादरम्यानच्या काळात विराट कुटुंबासह लंडनमध्ये वास्तव्यास होता. मात्र आता तो पुन्हा क्रिकेटकडे वळण्यास सज्ज आहे.

विराटने आयपीएलच्या गेल्या हंगामात दोन शतकांसह ६३९ धावा केल्या. परंतु बंगळुरूला बाद फेरी गाठता आली नव्हती. तसेच आतापर्यंत एकदाही बंगळुरूला ही स्पर्धा जिंकता आलेली नाही. त्यामुळे यंदा विराटसह बंगळुरूचे खेळाडू जेतेपदासाठी सर्वस्व पणाला लावतील, यात शंका नाही.

रोहितला टी-२० विश्वचषकासाठी विराट हवा - आझाद

विराटला टी-२० संघात स्थान मिळणे कठीण असून तो वेस्ट इंडिज व अमेरिका येथे होणाऱ्या विश्वचषकात भारतीय संघाचा भाग नसेल, असे वृत्त काही दिवसांपूर्वी पसरले होते. मात्र भारताचे माजी क्रिकेटपटू कीर्ती आझाद यांनी या अफवांना फेटाळून लावत विराट टी-२० विश्वचषक खेळेलच, असे सांगितले. “जय शहा यांनी निवड समिती अध्यक्ष अजित आगरकरला विराट टी-२० विश्वचषक खेळू शकत नाही. त्याची जागा संघात बनत नाही, असे सांगितले. यासंबंधी त्यांनी आगरकरांनाच विराटची समजूत काढण्यासही सांगितले. मात्र आगरकर यांनी नकार दिला. तसेच कर्णधार रोहित शर्मानेसुद्धा विराट संघात हवा आहे, असे सांगितले. सूत्रांनी दिलेल्या माहितीनुसार तरी विराट टी-२० विश्वचषक खेळणारच,” असे ट्वीट आझाद यांनी केले.

मदुशंका सुरुवातीच्या लढतींना मुकणार

श्रीलंकेचा २३ वर्षीय डावखुरा वेगवान गोलंदाज डाव्या माडींचे स्नायू ताणले गेल्यामुळे बांगलादेशविरुद्धच्या तिसऱ्या एकदिवसीय सामन्याला मुकणार आहे. तसेच मदुशंकाला यातून सावरण्यासाठी किमान ३ ते ४ आठवड्यांचा कालावधी लागण्याची शक्यता आहे. त्यामुळे तो मुंबईच्या सुरुवातीच्या काही सामन्यांना मुकेल, असे समजते. याशिवाय आफ्रिकेचा वेगवान गोलंदाज जेराल्ड कोएट्झेसुद्धा दुखापतीतून सावरत असून मुंबई इंडियन्सचा वैद्यकीय चमू त्याच्या तंदुरुस्तीवर लक्ष ठेवून आहे.

मुंबईत आज पाऊस बरसणार; १६ ऑक्टोबरपर्यंत महाराष्ट्रासह 'या' राज्यांत मुसळधारचा IMD चा इशारा

विधानसभेचे रणशिंग फुंकणार; दसरा मेळाव्यात उद्धव ठाकरे-एकनाथ शिंदे भिडणार!

IND vs BAN 3rd T20I : टीम इंडिया आज क्लीन स्वीपचे 'तोरण' बांधणार; 'या' ४ खेळाडूंना संधी मिळणार?

रतन टाटांचा वारसदार मिळाला; नोएल टाटा बनले टाटा ट्रस्टचे चेअरमन

इस्रायलचा लेबनॉनमधील संयुक्त राष्ट्रांच्या इमारतीवर हल्ला; भारताकडून चिंता व्यक्त