आशियाई क्रीडा स्पर्धेसाठी लक्ष्मण मुख्य प्रशिक्षक (Photo-X)
क्रीडा

आशियाई क्रीडा स्पर्धेसाठी लक्ष्मण मुख्य प्रशिक्षक

आयची-नागोया येथे होणाऱ्या आशियाई क्रीडा स्पर्धेसाठी भारतीय पुरुष क्रिकेट संघाच्या मुख्य प्रशिक्षकपदी माजी फलंदाज व्ही. व्ही. एस. लक्ष्मण यांची नियुक्ती करण्यात आली आहे.

Swapnil S

नवी दिल्ली : आयची-नागोया येथे होणाऱ्या आशियाई क्रीडा स्पर्धेसाठी भारतीय पुरुष क्रिकेट संघाच्या मुख्य प्रशिक्षकपदी माजी फलंदाज व्ही. व्ही. एस. लक्ष्मण यांची नियुक्ती करण्यात आली आहे. बेंगळुरू येथील सेंटर ऑफ एक्सलन्सचे (सीओई) क्रिकेट संचालक असलेल्या लक्ष्मण यांच्यासह सहाय्यक कर्मचाऱ्यांमध्ये सुनील जोशी, ऋषिकेश कानिटकर आणि नवे क्षेत्ररक्षण प्रशिक्षक सुभदीप घोष यांचा समावेश करण्यात आला आहे. केंद्रीय युवा व्यवहार आणि क्रीडा मंत्रालयाने जारी केलेल्या परिपत्रकाद्वारे या निर्णयावर अधिकृत मोहोर उमटवण्यात आली आहे.

भारतीय पुरुष संघाचे मुख्य प्रशिक्षक गौतम गंभीर हे मायदेशात होणाऱ्या वेस्ट इंडिजविरुद्धच्या एकदिवसीय मालिकेमुळे जपानला जाऊ शकणार नाहीत. वेस्ट इंडिजविरुद्धची मालिका २७ सप्टेंबर ते ३ ऑक्टोबर दरम्यान रंगणार आहे. दुसरीकडे, आशियाई क्रीडा स्पर्धेतील क्रिकेटचे सामने १९ सप्टेंबर ते ३ ऑक्टोबर या कालावधीत खेळवले जाणार आहेत. भारतीय पुरुष संघाला थेट उपांत्यपूर्व फेरीत प्रवेश मिळाला असून त्यांचा पहिला सामना २८ सप्टेंबर रोजी होणार आहे. गंभीर यांच्या नेतृत्वाखालील नियमित कोचिंग स्टाफ मायदेशातील एकदिवसीय मालिकेसाठी उपलब्ध असणार आहे.

व्ही. व्ही. एस. लक्ष्मण यांनी यापूर्वी चीनमधील हांगझोऊ येथे पार पडलेल्या २०२३च्या आशियाई क्रीडा स्पर्धेतही भारतीय संघाचे मुख्य प्रशिक्षकपद भूषवले होते, जिथे भारताने सुवर्णपदक पटकावले होते. तसेच नियमित मुख्य प्रशिक्षक अन्य मालिकांमध्ये व्यस्त असताना २०२२ पासून लक्ष्मण यांनी झिम्बाब्वे दौऱ्यासह अनेक मालिकांमध्ये भारतीय संघाच्या प्रशिक्षकपदाची जबाबदारी यशस्वीपणे सांभाळली आहे.

भारतीय महिला क्रिकेट संघाच्या मार्गदर्शनाची धुरा नियमित मुख्य प्रशिक्षक अमोल मुझुमदार यांच्याकडेच सोपवण्यात आली आहे. त्यांना गोलंदाजी प्रशिक्षक अविष्कार साळवी आणि क्षेत्ररक्षण प्रशिक्षक मुनीश बाली साथ देतील.

भारतीय महिलांची जपानशी सलामी

आशियाई स्पर्धेत भारतीय महिला संघ १८ सप्टेंबर रोजी जपानविरुद्ध सलामीचा सामना खेळणार आहे. दुसरीकडे भारतीय पुरुष संघ थेट उपांत्यपूर्व फेरीसाठी पात्र ठरला असल्याने त्यांची लढत २८ तारखेला होईल. भारतीय पुरुष संघाचा प्रतिस्पर्धी तेव्हाच ठरेल. महिलांचे क्रिकेट सामने २२ सप्टेंबरपर्यंत संपणार आहेत. त्यानंतर २४ तारखेपासून पुरुषांच्या क्रिकेट सामन्यांना प्रारंभ होईल. महिलांमध्ये आठ संघ असून प्रत्येक लढत नॉकआऊट पद्धतीने खेळवण्यात येणार आहे. त्यामुळे स्पर्धेत थरार टिकून राहील.

(संबधित इंग्रजी बातमी वाचण्यासाठी येथे क्लिक करा.)

राज्याच्या 'विधि व न्याय' विभागाच्या सचिवांना HC चा दणका; बजावली अवमान नोटीस, माफीनामाही फेटाळला

नवी मुंबई विमानतळावरून ३० लाख प्रवाशांचा प्रवास; ४६ शहरांशी हवाई जोडणीचा विस्तार

...तरच व्यापार करार! भारताला सवलतीचे दर द्या; केंद्रीय मंत्री पियूष गोयल यांचा अमेरिकेला इशारा

Palghar : रेशनकार्ड काढून देण्यासाठी लाचेची मागणी; तहसील कर्मचाऱ्याला ACB ने रंगेहाथ पकडले

Mumbai : बीकेसी-कुर्ला मार्गावर डबलडेकर बस चालवणे अशक्य; उंचीमुळे १५० नवीन ईव्ही डबलडेकर बस पुन्हा रखडल्या