क्रीडा

एल क्लासिकोसाठी वानखेडे सज्ज!

मुंबई इंडियन्स-चेन्नई सुपर किंग्ज उद्या आमनेसामने

ऋषिकेश बामणे


मुंबई इंडियन्स आणि चेन्नई सुपर किंग्ज म्हणजे इंडियन प्रीमियर लीगमधील (आयपीएल) दोन सर्वोत्तम संघ. फुटबॉलमध्ये जेव्हा दोन समान दर्जाचे संघ आमनेसामने येतात, तेव्हा त्या लढतीस ‘एल क्लासिको’ असे संबोधले जाते. शनिवारी वानखेडे स्टेडियमवर मुंबई आणि चेन्नई हे दोन संघ आयपीएलमध्ये एकमेकांविरुद्ध उभे ठाकतील, तेव्हा क्रीडारसिकांना क्रिकेटमधील ‘एल क्लासिको’ लढत पाहायला मिळेल.
रोहित शर्माच्या नेतृत्वाखालील मुंबईचा हा यंदाच्या हंगामातील घरच्या मैदानावरील पहिलाच सामना असून, ते गुणांचे खाते उघडण्यास आतुर असतील. मुंबईला सलामीच्या लढतीत रॉयल चॅलेंजर्स बंगळुरूकडून पराभव पत्करावा लागला; मात्र आता मुंबई लयीत परतण्यासाठी सज्ज आहे. मुंबईकडे मधल्या फळीत सूर्यकुमार यादव, तिलक वर्मा असे फलंदाज असून, त्यांना कॅमेरून ग्रीनकडून अष्टपैलू कामगिरीची अपेक्षा आहे. गोलंदाजीत जोफ्रा आर्चरचे फॉर्मात येणे गरजेचे असून, चेन्नईच्या डावखुऱ्या फलंदाजांसमोर फिरकीपटू पियुष चावला कशी कामगिरी करतो, हे पाहणे रंजक ठरेल.
दुसरीकडे महेंद्रसिंह धोनीच्या चेन्नईने पहिल्या लढतीत गुजरात जायंट्सकडून पराभव स्वीकारल्यानंतर दुसऱ्या सामन्यात लखनऊ सुपर जायंट्सवर मात केली. धोनीला योग्य वेळी लय गवसली असून सलामीवीर ऋतुराज गायकवाड भन्नाट फलंदाजी करत आहे. त्याशिवाय बेन स्टोक्स, रवींद्र जडेजा, मोईन अली असे अष्टपैलू त्यांच्याकडे आहेत. मात्र गोलंदाजी विभाग चेन्नईची कमकुवत बाजू आहे. वानखेडेची खेळपट्टी नेहमी धावांचा पाठलाग करणाऱ्या संघासाठी फलंदाजी ठरली असल्याने येथे १७०-१८० धावाही अपुऱ्या पडू शकतात.

34 मुंबई-चेन्नई यांच्यात आतापर्यंत ३४ सामने झाले असून, त्यापैकी मुंबईने २०, तर चेन्नईने १४ लढती जिंकल्या आहेत.

संभाव्य संघ


मुंबई इंडियन्स :
रोहित शर्मा (कर्णधार), इशान किशन, सूर्यकुमार यादव, कॅमेरून ग्रीन, तिलक वर्मा, टिम डेविड, नेहल वधेरा, हृतिक शौकीन, जोफ्रा आर्चर, अर्शद खान, पियुष चावला.

चेन्नई सुपर किंग्ज : महेंद्रसिंह धोनी (कर्णधार), डेवॉन कॉन्वे, ऋ तुराज गायकवाड, अंबाती रायुडू, बेन स्टोक्स, शिवम दुबे, मोईन अली, रवींद्र जडेजा, मिचेल सँटनर, दीपक चहर, राजवर्धन हंगर्गेकर.

आजपासून भारत आणि EFTA व्यापार करार अंमलात; पुढील १५ वर्षांत १०० अब्ज डॉलरची गुंतवणूक होणार

नवी मुंबई विमानतळाला अखेर ‘एअरोड्रोम परवाना’; ८ ऑक्टोबरला पंतप्रधान मोदींच्या हस्ते उद्‌घाटन

रिलायन्स इन्फ्रावर ‘ईडी’चे छापे; फेमा कायद्याचे उल्लंघन केल्याचा आरोप

गोकुळकडून दूध उत्पादकांना दिवाळी भेट; १३६ कोटींचा ‘दरफरक’ जमा होणार

NPS आता अधिक आकर्षक; आजपासून १०० टक्के समभागात गुंतवणुकीची परवानगी