ट्विटर
क्रीडा

१०० धावांत गारद होण्याची भीती नव्हती; बांगलादेशवरील वेगवान विजयानंतर रोहित शर्मा काय म्हणाला?

रोहितच्या नेतृत्वाखाली भारताने आजवर एकही कसोटी मालिका गमावलेली नाही.

Swapnil S

कानपूर : बांगलादेशचा पहिला डाव ७५ षटकांत २३३ धावांत गुंडाळल्यावर आम्ही सर्वांनी एकमताने सामन्याचा निकाल लावण्याच्या दृष्टीनेच खेळ केला. त्यामुळे आक्रमक फटकेबाजीवर पहिल्या षटकापासून भर दिला. यादरम्यान आम्ही १०० धावांत गारद झालो असतो, तरी कसलीच भीती नव्हती. कारण धावांपेक्षा षटके व वेळ वाचवणे अधिक महत्त्वाचे होते, अशी बेधडक प्रतिक्रिया भारताचा कर्णधार रोहित शर्माने व्यक्त केली. पराभवाची भीती नव्हती, पण जागतिक कसोटी अजिंक्यपद स्पर्धे (वर्ल्ड टेस्ट चॅम्पियनशिप)च्या दृष्टीने सामन्याचा निकाल लागावा याच उद्देशाने टीम इंडियाने बांगलादेशविरुद्धच्या दुसऱ्या कसोटीत खेळ केल्याचे त्याने एकप्रकारे सांगितले.  

रोहितच्या नेतृत्वाखाली भारताने आजवर एकही कसोटी मालिका गमावलेली नाही. आफ्रिकेविरुद्ध १-१ अशी बरोबरी पत्करण्यासह भारताने रोहितच्या नेतृत्वाखाली ५ मालिका जिंकल्या. या सामन्यातही रोहितचे नेतृत्व तसेच त्याच्या फलंदाजीतील शैलीचे कौतुक करण्यात येत आहे. तसेच रोहितने क्षेत्ररक्षणातही छाप पाडली.

“अडीच दिवस वाया गेल्यावर बांगलादेशच्या संघाला आम्ही चौथ्या दिवशी गुंडाळले. त्यानंतर फलंदाजीला येण्यापूर्वी सर्वांनी सामना जिंकण्यासाठी आक्रमक खेळायचे, असे ठरवले. कर्णधार म्हणून मी स्वत: त्या नात्याने पुढाकार घेणे गरजेचे होते. आम्हाला १०० धावांत ऑल-आऊट होण्याचीही भीती नव्हती. मात्र कमीत कमी वेळेत तसेच कमी षटकांत अधिक धावा कशा लुटता येईल, त्यावरच आमचे लक्ष होते,” असे रोहित म्हणाला. भारताने या कसोटीच्या पहिल्या डावात सर्वात वेगवान ५०, १००, १५०, २०० व २५० धावांचा विक्रम मोडीत काढला.

“मी ज‌वळपास ५०० आतंरराष्ट्रीय सामने खेळण्याच्या उंबरठ्यावर आहे. त्यामुळे मला कुणालाही स्वत:च्या तंदुरुस्तीविषयी स्पष्टीकरण देण्याची गरज नाही,” असेही रोहितने नमूद केले.

भारताचे गुणतालिकेतील अग्रस्थान कायम

जागतिक कसोटी अजिंक्यपद स्पर्धेच्या गुणतालिकेत भारताने अग्रस्थान कायम राखले आहे. या मालिका विजयानंतर भारताच्या खात्यात ११ सामन्यांतील ८ विजयांचे ९८ गुण जमा आहेत. त्यांची टक्केवारी ७४.२४ टक्के इतकी आहे. ऑस्ट्रेलिया ६२.५० टक्क्यांसह दुसऱ्या स्थानी आहे. श्रीलंकेने न्यूझीलंडविरुद्धच्या मालिका विजयासह तिसरे स्थान प्राप्त केले आहे. त्यांची टक्केवारी ५५.५६ टक्के आहे. आघाडीचे दोन संघ पुढील वर्षी जूनमध्ये लॉर्ड्स येथे होणाऱ्या अंतिम फेरीसाठी पात्र ठरणार आहेत.

विराटकडून शाकिबला खास भेट

बांगलादेशचा अनुभवी अष्टपैलू शाकिब अल हसनचा हा कारकीर्दीतील अखेरचा कसोटी सामना ठरू शकतो. शाकिबने काही दिवसांपूर्वीच मिरपूर येथे आफ्रिकेविरुद्ध खेळण्याची संधी लाभली नाही, तर हीच कसोटी आपली अखेरची समजावी, असे जाहीर केले होते. त्यामुळे विराट कोहलीने सामना संपल्यानंतर शाकिबला बॅट भेट दिली. तसेच त्याच्याशी काही मिनिटे संवाद साधून पुढील आयुष्यासाठी शुभेच्छा दिल्या. शाकिबने टी-२० प्रकारातूनही निवृत्ती जाहीर केली आहे.

Maharashtra Assembly Elections Results 2024 LIVE: महाराष्ट्राचा महानिकाल! एकाच क्लिकवर बघा कल आणि निकाल

अपक्ष, बंडखोरांसाठी रस्सीखेच; महायुती, महाआघाडीत खलबते

राहुल गांधी, खर्गे यांनी माफी मागावी, अन्यथा कारवाईला सामोरे जावे; विनोद तावडे यांची नोटीस

...तोपर्यंत मतमोजणी केंद्र सोडू नका; शरद पवारांचा उमेदवारांना आदेश

झारखंडमध्ये आज मतमोजणी