आशियाई चॅम्पियन्स ट्रॉफी हॉकी स्पर्धा : दीपिका पुन्हा चमकली; महिलांचा पंचतारांकित विजय  (Photo-X)
क्रीडा

आशियाई चॅम्पियन्स ट्रॉफी हॉकी स्पर्धा : दीपिका पुन्हा चमकली; महिलांचा पंचतारांकित विजय

भारतीय महिला हॉकी संघाने आशियाई चॅम्पियन्स ट्रॉफी स्पर्धेतील आपली विजयी घोडदौड कायम राखताना अखेरच्या साखळी सामन्यात जपानचा ४-० असा एकतर्फी पराभव केला.

Swapnil S

भोपाळ : भारतीय महिला हॉकी संघाने आशियाई चॅम्पियन्स ट्रॉफी स्पर्धेतील आपली विजयी घोडदौड कायम राखताना अखेरच्या साखळी सामन्यात जपानचा ४-० असा एकतर्फी पराभव केला. या विजयासह भारताने साखळी फेरीतील पाचही सामने जिंकत १५ गुणांसह गुणतालिकेत अव्वल स्थान पटकावले. बुधवारी झालेल्या या सामन्यात भारतीय खेळाडूंनी सुरुवातीपासूनच आक्रमक खेळाचे प्रदर्शन केले.

यापूर्वी भारताने ऑलिम्पिक रौप्यपदक विजेत्या चीनला पराभूत केले होते. त्यानंतर जपानविरुद्धही भारतीय संघाने आपले वर्चस्व कायम राखले. लालरेमसियामी (१२वे मिनिट), दीपिका (१६वे आणि ४८वे मिनिट) आणि नेहा (२८वे मिनिट) यांनी गोल करत भारताच्या विजयात महत्त्वपूर्ण योगदान दिले.

सामन्याच्या सुरुवातीच्या तीन मिनिटांतच भारताला पेनल्टी कॉर्नर मिळाला. नवनीत कौरने ही संधी निर्माण केली होती. मात्र, स्पर्धेत सर्वाधिक गोल करणाऱ्या दीपिकाचा फटका गोलपोस्टच्या बाहेर गेला. त्यानंतर इशिका आणि मुमताज खान यांनी सुरेख समन्वय साधत गोलची संधी निर्माण केली. मात्र, जपानच्या बचावफळीने नवनीतला फटका मारण्यापासून रोखले. भारताला १२व्या मिनिटाला पहिले यश मिळाले. लालरेमसियामीने प्रतिस्पर्ध्यांच्या गोलक्षेत्रात वेगाने प्रवेश करत नवनीत कौरसोबत सुरेख पासेसची देवाणघेवाण केली. त्यानंतर तिने जोरदार फटका मारत चेंडू गोलजाळ्यात धाडला.

पहिल्या गोलनंतर अवघ्या चार मिनिटांत भारताने आघाडी दुप्पट केली. सलग पेनल्टी कॉर्नर मिळाल्यानंतर दीपिकाचा पहिला ड्रॅगफ्लिक जपानच्या बचावपटूंनी अडवला. मात्र, परत आलेल्या चेंडूवर तिने चपळाई दाखवत अचूक फटका मारला आणि भारताला २-० अशी आघाडी मिळवून दिली. पहिल्या सत्राच्या अखेरीसही भारताने आक्रमण सुरूच ठेवले. दीपिकाचा फटका जपानच्या खेळाडूच्या पायाला लागल्याने भारताला पुन्हा पेनल्टी कॉर्नर मिळाला. दीपिकाचा जोरदार फटका गोलरक्षकाने अडवला. त्यानंतर कर्णधार सलीमा टेटेने रिबाऊंडवर चेंडू पुढे खेळवला आणि नेहाने गोलरेषेजवळून चेंडू गोलमध्ये ढकलला. २८व्या मिनिटाला भारताने ३-० अशी आघाडी घेतली.

पहिल्या दोन सत्रांत भारताने सामन्यावर पूर्ण नियंत्रण ठेवले. भारताने पाच अचूक फटके आणि ११ वेळा प्रतिस्पर्ध्यांच्या गोलक्षेत्रात प्रवेश केला. याउलट जपानला पहिल्या ३० मिनिटांत एकही अचूक फटका किंवा गोलक्षेत्रातील प्रवेश नोंदवता आला नाही. भारताने पहिल्या दोन सत्रांत ५५ टक्के चेंडूवर ताबा राखला. तिसऱ्या सत्रात जपानला पहिला पेनल्टी कॉर्नर मिळाला. मात्र, त्यांना या संधीचा फायदा घेता आला नाही. दरम्यान, मुमताज खानच्या हाताला चेंडू जोरात लागल्याने तिला उपचारासाठी मैदानाबाहेर जावे लागले.

अखेरच्या सत्रात भारताला आणखी एक पेनल्टी कॉर्नर मिळाला. मैदानावर परतलेल्या दीपिकाने ४८व्या मिनिटाला जोरदार ड्रॅगफ्लिक मारत चेंडू गोलच्या वरच्या उजव्या कोपऱ्यात पाठवला. हा तिचा सामन्यातील दुसरा गोल ठरला. त्यानंतर जपानला गोल करण्याची संधी न देता भारताने ४-० असा विजय निश्चित केला. आता शुक्रवारी उपांत्य लढतीत मलेशियाशी भारताची गाठ पडेल.

मलेशियाविरुद्ध आज उपांत्य सामना

शानदार फॉर्ममध्ये असलेला भारतीय महिला हॉकी संघ शुक्रवारी उपांत्य फेरीत मलेशियाशी दोन हात करणार आहे. या सामन्यात विजय मिळवून सलग तिसऱ्यांदा विजेतेपद पटकावण्याच्या दिशेने आणखी एक पाऊल टाकण्याचा भारतीय संघाचा प्रयत्न असेल. यजमान भारताने साखळी फेरीत अपराजित राहत उपांत्य फेरीत प्रवेश केला असून विजेतेपदाचा प्रबळ दावेदार म्हणून भारतीय संघाकडे पाहिले जात आहे. भारताने साखळी फेरीतील पाचही सामन्यांत दमदार कामगिरी केली आहे. याशिवाय भारतीय संघाची सलग अपराजित सामन्यांची संख्या १४ झाली आहे. या सातत्यपूर्ण कामगिरीच्या जोरावर भारताने जागतिक क्रमवारीत ऐतिहासिक चौथे स्थान मिळवले आहे. भारताने साखळी फेरीत मलेशियाचा ४-१ असा पराभव केला होता. सुरुवातीला पिछाडीवर पडल्यानंतर भारतीय खेळाडूंनी जोरदार पुनरागमन करत विजय मिळवला होता. दीपिका सेहरावत, लालरेमसियामी आणि नेहा यांनी भारतीय आक्रमणाची धुरा प्रभावीपणे सांभाळली आहे. कर्णधार सलीमा टेटे, मुमताज खान आणि पूजा साहू यांनीही महत्त्वपूर्ण योगदान दिले आहे.

वेळ : सायंकाळी ७ वाजता

थेट प्रक्षेपण : स्टार स्पोर्ट्स नेटवर्क

(संबधित इंग्रजी बातम्या वाचण्यासाठी येथे क्लिक करा.)

प्रत्येक फ्लॅटसाठी प्रॉपर्टी कार्ड; राज्यातील सात कोटी फ्लॅटधारकांना मिळणार दिलासा, राज्य सरकारचा प्रस्ताव

हाय फॅट, साखर, मिठाची स्वतंत्र इशारा चिन्हे अनिवार्य; पाकीटबंद खाद्यपदार्थांबाबत सुप्रीम कार्टाचा आदेश

वॉशिंग सेंटर : पाणी वापरावर बंदी; पिण्याचे पाणी न वापरण्याबाबत राज्य सरकारचा प्रस्ताव, गृहनिर्माण सोसायट्यांवरही निर्बंधांची शक्यता

कॉफी डे एंटरप्रायझेसच्या व्यवहारांची चौकशी होणार; निधी वळवल्याप्रकरणी फॉरेन्सिक ऑडिटर नियुक्त

Navi Mumbai : तुर्भे रेल्वे उड्डाणपूल चार महिने वाहतुकीसाठी बंद; ३१ मार्चपर्यंत वाहनांसाठी स्वतंत्र मार्ग