मुंबई : महिला प्रीमियर लीगच्या (डब्ल्यूपीएल) पाचव्या हंगामाचे वेळापत्रक भारतीय क्रिकेट नियामक मंडळाने (बीसीसीआय) जाहीर केले आहे. २०२७ मधील ही स्पर्धा १४ जानेवारी ते ७ फेब्रुवारी या कालावधीत वडोदरा आणि मुंबई येथे खेळवली जाणार आहे. दोन्ही शहरांमध्ये प्रत्येकी ११ सामने होणार आहेत.
स्पर्धेची सुरुवात गतविजेत्या रॉयल चॅलेंजर्स बंगळुरू आणि दोन वेळच्या विजेत्या मुंबई इंडियन्स यांच्यातील रंगतदार लढतीने होणार आहे. १४ जानेवारी रोजी या दोन संघांमध्ये सलामीचा सामना खेळवला जाईल. बीसीसीआयने स्पर्धेचे संपूर्ण वेळापत्रक जाहीर करताना सामन्यांच्या ठिकाणांचीही अधिकृत घोषणा केली. वडोदरा येथील कोटांबीमधील नव्या बीसीए स्टेडियमवर पहिल्या टप्प्यातील सामने होतील. त्यानंतर मुंबईतील क्रिकेट क्लब ऑफ इंडियाच्या ब्रेबॉर्न स्टेडियमवर उर्वरित सामने खेळवले जातील. प्लेऑफ आणि अंतिम सामनाही ब्रेबॉर्न स्टेडियमवरच होणार आहे. सर्व सामने सायंकाळी ७.३० वाजता सुरू होणार आहेत.
वडोदरा येथे १४ ते २४ जानेवारीदरम्यान स्पर्धेतील ११ सामने खेळवले जातील. या टप्प्यात पाचही संघ विजेतेपदाच्या शर्यतीत आपली मोहीम सुरू करतील. त्यानंतर २६ जानेवारीपासून स्पर्धेचा पुढील टप्पा मुंबईत रंगणार आहे. मुंबईतील ब्रेबॉर्न स्टेडियमवर उर्वरित ११ सामने होतील. साखळी फेरीतील सामने ३ फेब्रुवारीपर्यंत खेळवले जाणार आहेत. मागील हंगामातील सामने नवी मुंबईतील डी. वाय. पाटील स्टेडियम आणि वडोदरा येथे झाले होते. सध्या त्या पाटील स्टेडियमचे नूतनीकरणाचे काम सुरू असल्याने यंदाच्या हंगामासाठी ब्रेबॉर्न स्टेडियमची निवड करण्यात आली आहे.
७ फेब्रुवारी रोजी अंतिम सामना
* स्पर्धेतील गुणतालिकेत दुसऱ्या आणि तिसऱ्या क्रमांकावर राहणाऱ्या संघांमध्ये ५ फेब्रुवारी रोजी एलिमिनेटरचा सामना खेळवला जाईल. या सामन्यातील विजेता अंतिम फेरीत प्रवेश करेल.
* गुणतालिकेत अव्वल स्थान मिळवणाऱ्या संघाला थेट अंतिम सामन्यात प्रवेश मिळणार आहे. त्यामुळे साखळी फेरीतील प्रत्येक सामन्याला महत्त्व प्राप्त होणार आहे. स्पर्धेचा अंतिम सामना ७ फेब्रुवारी रोजी मुंबईतील ब्रेबॉर्न स्टेडियमवर खेळवला जाईल.
* ही स्पर्धा संपल्यानंतर महिलांच्या पहिल्यावहिल्या ऐतिहासिक चॅम्पियन्स ट्रॉफी स्पर्धेला ब्रेबॉर्न स्टेडियमवरच सुरुवात होणार आहे. १४ ते २८ फेब्रुवारी दरम्यान मुंबई व वदोदरा येथेच ही स्पर्धा होईल. त्यामुळे डब्ल्यूपीएलच्या निमित्ताने खेळाडूंना त्या स्पर्धेसाठी सराव करता येईल.