नागपूर : डावखुरा सलामीवीर यशस्वी जैस्वालचे मुंबईच्या रणजी संघात पुनरागमन झाले आहे. सोमवार, १७ फेब्रुवारीपासून मुंबई आणि विदर्भ यांच्यात रणजी करंडक क्रिकेट स्पर्धेचा उपांत्य सामना रंगणार आहे. नागपूर (जामठा) येथील विदर्भ क्रिकेट असोसिएशनच्या स्टेडियमवर ही लढत खेळवण्यात येईल.
अजिंक्य रहाणेच्या नेतृत्वात खेळणाऱ्या मुंबईने सलग दुसऱ्यांदा उपांत्य फेरीत धडक मारताना उपांत्यपूर्व लढतीत हरयाणावर वर्चस्व गाजवले. अजिंक्यसह सूर्यकुमार यादव, शिवम दुबे, शार्दूल ठाकूर असे आंतरराष्ट्रीय दर्जाचा अनुभव असलेले खेळाडू मुंबई संघाचा भाग आहेत. यशस्वी व दुबे यांचा चॅम्पियन्स ट्रॉफीसाठी राखीव खेळाडूंत समावेश करण्यात आला आहे. मात्र गरज लागली तरच त्यांना दुबईत जावे लागणार आहे. त्यामुळे दोघेही रणजी स्पर्धेत खेळतील. यशस्वीने यंदाच्या हंगामात फक्त जम्मू-काश्मीरविरुद्ध एकमेव रणजी सामना खेळला.
विदर्भाचे नेतृत्व अक्षय वाडकर करत असून या संघांत करुण नायर, अक्षय वाखरे, यश राठोड असे प्रतिभावान खेळाडू आहेत. मुंबई-विदर्भ यांच्यातच गेल्या वर्षी रणजीची अंतिम फेरी रंगली होती. त्यावेळी मुंबईने बाजी मारून ४२व्यांदा करंडक उंचावला. त्यामुळे यावेळी विदर्भाला परतफेड करण्याची संधी आहे. दुसरी उपांत्य लढत गुजरात आणि केरळ यांच्यात अहमदाबादच्या नरेंद्र मोदी स्टेडियमवर होणार आहे.
मुंबईचा संघ
अजिंक्य रहाणे (कर्णधार), यशस्वी जैस्वाल, आयुष म्हात्रे, अंक्रिश रघुवंशी, अमोघ भटकल, सूर्यकुमार यादव, सिद्धेश लाड, शिवम दुबे, आकाश आनंद, हार्दिक तामोरे, सूर्यांश शेडगे, शार्दूल ठाकूर, शम्स मुलाणी, तनुष कोटियन, मोहित अवस्थी, सेल्व्हेस्टर डीसोझा, रॉयस्टन डायस, अथर्व अंकोलेकर, हर्ष तन्ना.