ब्लोमफोंटेन : मुंबईकर मुशीर खानने (१०६ चेंडूंत ११८ धावा) झळकावलेल्या शतकाच्या बळावर गतविजेत्या भारतीय संघाने युवा विश्वचषक क्रिकेट स्पर्धेत (१९ वर्षांखालील) सलग दुसऱ्या विजयाची नोंद केली. अ-गटातील सामन्यात भारताने आयर्लंडचा तब्बल २०१ धावांनी फडशा पाडला.
उदय सहारनच्या नेतृत्वाखाली खेळणाऱ्या भारताने पहिल्या सामन्यात बांगलादेशला ८४ धावांनी धूळ चारली होती. सलग दुसऱ्या विजयामुळे भारतीय संघाने गटात अग्रस्थान काबिज केले आहे. भारताने दिलेले ३०२ धावांचे लक्ष्य गाठताना आयर्लंडचा संघ अवघ्या २९.४ षटकांत १०० धावांत गारद झाला. डावखुरा वेगवान गोलंदाज नमन तिवारीने चार, तर डावखुरा सौम्य पांडेने तीन बळी मिळवले.
तत्पूर्वी, प्रथम फलंदाजी करताना भारताने ५० षटकांत ७ बाद ३०१ धावा केल्या. मुशीरने ९ चौकार व ४ षटकारांसह ११८ धावा फटकावल्या. त्याला उदय (८४ चेंडूंत ७५) व महाराष्ट्राचा अर्शीन कुलकर्णी (५५ चेंडूंत ३२) यांनी उत्तम साथ दिली. भारताची आता रविवारी अखेरच्या साखळी सामन्यात अमेरिकेशी गाठ पडेल.