छाया सौजन्य : ICC / X
क्रीडा

ZIM vs AUS: झिम्बाब्वेकडून कांगारूंची 'शिकार'! टी-२० विश्वचषकात सर्वात मोठी उलथापालथ; बलाढ्य ऑस्ट्रेलियाला चारली धूळ

टी-२० विश्वचषकातील सर्वात मोठी उलथापालथ आज (दि.१३) बघायला मिळाली. आता झिम्बाब्वेच्या पुढील सुपर-८ फेरीमध्ये पोहोचण्याच्या आशा वाढल्या आहेत. तर, ऑस्ट्रेलियासाठी अस्तित्त्वाची लढाई असणार आहे.

Krantee V. Kale

आयसीसी पुरुष टी-२० विश्वचषक २०२६ स्पर्धेतील सर्वात मोठी उलथापालथ आज (दि.१३) बघायला मिळाली. झिम्बाब्वेने शिस्तबद्ध फलंदाजी आणि अचूक गोलंदाजीच्या जोरावर कोलंबो येथे झालेल्या सामन्यात बलाढ्य ऑस्ट्रेलियाला २३ धावांनी धूळ चारली आणि ऐतिहासिक विजय नोंदवला. यापूर्वी २००७च्या टी-२० विश्वचषक स्पर्धेतही झिम्बाब्वेने ऑस्ट्रेलियाला पराभवाचं पाणी पाजलं होतं.

नाणेफेकीचा निर्णय कांगारूंच्या अंगलट, पॉवर प्लेमध्ये दमदार सुरूवात

नाणेफेकीचा कौल जिंकून ऑस्ट्रेलियाचा कर्णधार ट्रेव्हिस हेडने प्रथम गोलंदाजी करण्याचा निर्णय घेतला. पण, त्याचा हा निर्णय चांगलाच अंगलट आला. ६ षटकांच्या पॉवर प्लेमध्ये कांगारू गोलंदाजांना झिम्बाब्वेचा एकही फलंदाज बाद करता आला नाही. संपूर्ण २० षटकांत झिम्बाब्वेचे केवळ २ गडी बाद करण्यात ऑस्ट्रेलियाला यश मिळाले. सलामीवीर ब्रायन बेनेटच्या नाबाद ६४ धावांच्या (५६ चेंडूत ७ चौकार) दमदार खेळीच्या बळावर झिम्बाब्वेने ऑस्ट्रेलियासमोर १७० धावांचे आव्हान ठेवले होते. पण, या आव्हानाचा पाठलाग करताना ऑस्ट्रेलियाचा संपूर्ण संघ केवळ १४६ धावांतच गारद झाला.

झिम्बाब्वेकडून संयम आणि आक्रमकतेचा समतोल

झिम्बाब्वेच्या सलामीवीरांनी प्रथम फलंदाजी करताना चांगली सुरूवात केली. पहिल्या सहा षटकांत एकही विकेट त्यांनी गमावली नाही आणि शेवटच्या षटकांत धावगती वाढवत त्यांनी ऑस्ट्रेलियन गोलंदाजांवर दबाव कायम ठेवला. खेळपट्टीवर गोलंदाजांना थोडी मदत मिळत असतानाही झिम्बाब्वेच्या फलंदाजांनी संयम आणि आक्रमकतेचा समतोल साधत स्पर्धात्मक धावसंख्या उभी केली. सुरूवातीच्या ७.३ षटकांत ६१ धावांची दमदार सलामी दिल्यानंतर पहिला सलामीवीर मारूमानी (२१ चेंडूत ३५ धावा) बाद झाला. तर, दुसऱ्या विकेटसाठी जवळपास १६ षटके आणि १३१ धावा होईपर्यंत ऑस्ट्रेलियाच्या गोलंदाजांना वाट बघावी लागली. दुसरा सलामीवीर ब्रायन बेनेटने नाबाद ६४ धावांची खेळी केली. त्याला रायन बर्ल (३० चेंडूत ३५ धावा) आणि कर्णधार सिकंदर रझा (१३ चेंडू नाबाद २५ धावा) यांनी चांगली साथ दिली. या जोरावर झिम्बाब्वेच्या संघाने २० षटकांत दमदार फलंदाजी २ बळी गमावून १६९ धावा केल्या.

ऑस्ट्रेलियाच्या फलंदाजांनी टाकल्या नांग्या

प्रत्युत्तरात ऑस्ट्रेलियाच्या फलंदाजांनी अक्षरशः नांग्या टाकल्या. पहिल्या ६ षटकांत अवघ्या ३८ धावांमध्येच ऑस्ट्रेलियाचे ४ खंदे फलंदाज बाद झाले होते. सलामीवीर जॉश इंग्लिस ८ धावा करून दुसऱ्या षटकातील पहिल्याच चेंडूवर परतला. तर, कॅमेरून ग्रीन आणि टीम डेव्हिड यांना भोपळाही फोडता नाही आला. कर्णधार हेड देखील १७ धावांवर बॅटची कट लागून चेंडू स्टंप्सवर आदळल्याने बोल्ड झाला. त्यानंतर आलेल्या मॅट रेनशॉ आणि ग्लेन मॅक्सवेलने डाव सावरला. पण, १५ व्या षटकांत संघाच्या १०६ धावा झाल्या असताना ३२ चेंडूत ३१ धावांची खेळी करून मॅक्सवेल बाद झाला. त्यानंतर आलेला मार्कस स्टॉयनीस (६), बेन ड्वारशूएस (६) देखील स्वस्तात परतले. रेनशॉ मैदानात होता, तोपर्यंत ऑस्ट्रेलियाच्या आशा जिवंत होत्या. मात्र १९ व्या षटकात संघाच्या १३९ धावा झाल्या असताना झुंजार खेळी करून रेनशॉ (४४ चेंडूत ६५ धावा) बाद झाला आणि ऑस्ट्रेलियाचा पराभव निश्चित झाला. त्यानंतर नॅथन एलिस (७), अ‍ॅडम झांपा (२) आणि मॅथ्यू कुहनेमन (०) झटपट बाद झाले. सामन्यावर पकड मिळवण्याची संधी असताना झिम्बाब्वेच्या गोलंदाजांनी अचूक यॉर्कर आणि संथ चेंडूंच्या सहाय्याने दबाव वाढवला. झिम्बाब्वेकडून मुजाराबानीने सर्वाधिक ४, ब्रॅड इव्हान्सने ३, विलिंगटन आणि रायन यांनी प्रत्येरी १ गडी बाद केला. तर, ऑस्ट्रेलियाकडून केवळ ग्रीन आणि स्टॉयनीस यांनाच प्रत्येकी एक गडी बाद करता आला.

सुपर-८ मध्ये कोण पोहोचणार?

या विजयामुळे आता झिम्बाब्वेच्या पुढील सुपर-८ फेरीमध्ये पोहोचण्याच्या आशा वाढल्या आहेत. दोन सामन्यात दोन्ही विजयांसह ४ गुण मिळवून झिम्बाब्वे ब गटात दुसऱ्या स्थानी तर ऑस्ट्रेलिया एक विजय आणि एक पराभव यामुळे २ गुणांसह तिसऱ्या स्थानी आहे. श्रीलंका या गटात ४ गुणांसह (चांगल्या धावगतीमुळे) अव्वल स्थानी आहे. ऑस्ट्रेलियासाठी आता अस्तित्त्वाची लढाई लढावी लागणार असून पुढील दोन्ही सामन्यात मोठा विजय साकारावा लागणार आहे.

राज्यात १ मेपासून परवानाधारक रिक्षा-टॅक्सी चालकांसाठी मराठी अनिवार्य; मराठी भाषेचे ज्ञान नसलेल्यांचे परवाने रद्द करणार - सरनाईक

३६ तासांच्या 'बंद'नंतरही ठाण्यात कमी दाबानेच पाणी; ऐन उन्हाळ्यात पाणीबंदीने नागरिक हैराण

रुग्णालयच आता होणार अर्जदार! अर्जमंजुरीची प्रक्रिया ८ तासांत; सीएम सहाय्यता निधीची नवीन प्रणाली

'व्हायरल'च्या नादात मर्यादा ओलांडल्या! भररस्त्यात तरुणीशी गैरवर्तन; VIDEO व्हायरल होताच पोलिसांची धडाकेबाज कारवाई

रांजणगाव महागणपती मंदिर डागडुजीसाठी तीन महिने बंद