इमारत कोसळून १० ठार, ३ जखमी; भिवंडीत १३ वर्षे जुन्या चार मजली इमारतीची दुरुस्ती सुरू असताना दुर्घटना 
ठाणे

इमारत कोसळून १० ठार, ३ जखमी; भिवंडीत १३ वर्षे जुन्या चार मजली इमारतीची दुरुस्ती सुरू असताना दुर्घटना

भिवंडी महानगरपालिका क्षेत्रातील नारपोली गंगाराम वाडी येथील ‘कोहिनूर अपार्टमेंट’ ही तळ अधिक चार मजली अतिधोकादायक ठरवलेली व अवघे १३ वर्षे वयोमान असलेली इमारत गुरुवारी रात्री साडेअकराच्या सुमारास पत्त्याच्या बंगल्याप्रमाणे कोसळली. या इमारतीच्या ढिगाऱ्याखाली दबल्याने १० जणांचा दुर्दैवी मृत्यू झाला असून तीन जण जखमी आहेत.

प्रतिनिधी

सुमित घरत / भिवंडी

भिवंडी महानगरपालिका क्षेत्रातील नारपोली गंगाराम वाडी येथील ‘कोहिनूर अपार्टमेंट’ ही तळ अधिक चार मजली अतिधोकादायक ठरवलेली व अवघे १३ वर्षे वयोमान असलेली इमारत गुरुवारी रात्री साडेअकराच्या सुमारास पत्त्याच्या बंगल्याप्रमाणे कोसळली. या इमारतीच्या ढिगाऱ्याखाली दबल्याने १० जणांचा दुर्दैवी मृत्यू झाला असून तीन जण जखमी आहेत. जखमींवर इंदिरा गांधी स्मृती उपजिल्हा रुग्णालयात उपचार सुरू आहेत.

दरम्यान, घटनेची माहिती मिळताच पालिका आपत्कालीन कक्ष अग्निशामक दलाचे जवान घटनास्थळी धावून आले. परंतु इमारतीपर्यंत पोहचण्यासाठी अरुंद रस्ता असल्याने बचावकार्य सुरू करण्यात अडथळे येत होते. त्यानंतर रात्री १ वाजता घटनास्थळी ‘एनडीआरएफ’चे पथक दाखल झाले. इमारतीच्या समोर असलेली एक जुनी चाळ जेसीबीच्या सहाय्याने भुईसपाट करण्यात आली. त्यानंतर दुर्घटनाग्रस्त इमारती पर्यंत यंत्रणा पोहचली.

इमारतीची दुरुस्ती चुकीच्या पद्धतीने...

या इमारतीच्या तळमजल्यावर अरविंद गुप्ता हे कुटुंब राहत होते. इमारत कोसळत असताना व ढिगारा खाली पडत असताना अरविंद गुप्ता हे पत्नी सोबत बाहेर पडले. पण मुलगी कोमल मात्र या ढिगाऱ्याखाली अडकली होती. तिने नंतर कशीबशी आपली सुटका करून घेत जीव वाचवला. इमारतीच्या दुरुस्तीचे काम चुकीच्या पद्धतीने सुरू केल्यामुळे ही दुर्घटना घडल्याचे कोमल हिने सांगितले आहे.

धोकादायक इमारती खाली कराव्यात : महापौर नारायण चौधरी

या दुर्घटग्रस्त इमारतीच्या ढिगाऱ्याखाली अडकलेल्या व्यक्तींना काढण्यासाठी प्रथम प्राधान्य दिले जाईल. पालिकेची सर्व यंत्रणा कामाला लागलेली आहे. धोकादायक असल्याने पालिका कर्मचाऱ्यांनी ही इमारत रिकामी केल्यामुळे मोठी दुर्घटना टळली असली तरी नागरिकांनी धोकादायक इमारती खाली करून आपला जीव वाचवणे गरजेचे आहे, महापौर नारायण चौधरी यांनी सांगितले.

दुसऱ्या विंगमधल्यांनी आसरा दिल्याने वाचले...

या इमारतीच्या दुर्घटनाग्रस्त भागातील चौथ्या मजल्यावर सबिना बानो शाह ही महिला कुटुंबीयांसह राहत होती. सायंकाळी सहा वाजल्या पासून इमारतीला तडे जाण्यास सुरूवात झाली होती. त्यामुळे इमारतीच्या दुसऱ्या विंगमध्ये राहणाऱ्या कुटुंबियांनी सबिना बानो यांच्या कुटुंबास आपल्या घरात आसरा दिला होता. त्यामुळे सबिना बानो शाह यांचे कुटुंबीय आपला जीव वाचवू शकले. पण इमारत कोसळल्याने घरातील सर्व साहित्य, पैसा- अडका ढिगाऱ्याखाली गाडले गेल्याची खंत त्यांनी बोलून दाखविली. इमारत पडत असल्याने पहिल्या मजल्यावर राहणाऱ्या अभय यादव याने खोली बाहेर पळण्याचा प्रयत्न केला. परंतु जिन्यामध्येच ढिगारा पडल्याने जीव वाचवण्यासाठी त्याने पहिल्या मजल्यावरून थेट खाली उडी मारली. ज्यामुळे त्याच्या दोन्ही पायांना फ्रॅक्चर झाले आहे.

मृतांच्या कुटुंबियांना पाच लाखांची मदत

राज्याचे आपत्कालीन विभागाचे मंत्री गिरीश महाजन यांनी सकाळी घटनास्थळाला भेट दिली .त्यांनी यावेळी या इमारत दुर्घटनेबाबत जबाबदारी निश्चित करून दोषींवर योग्य ती कडक कारवाई केली जाईल असे सांगत शासनाकडून मृतांच्या नातेवाईकांना पाच लाखांची मदत जाहीर केली आहे. यावेळी खासदार सुरेश म्हात्रे उर्फ बाळ्या मामा, माजी केंद्रीय राज्यमंत्री कपिल पाटील, आमदार महेश चौघुले, महापौर नारायण चौधरी जिल्हाधिकारी डॉ. श्रीकृष्ण पांचाळ आदी उपस्थित होते.

रुग्णालयात दाखल जखमींची नावे : अभय यादव (२६), दीपक यादव (२५), संगीता प्रजापती (३६)

मृतांची नावे : क्रिश कुमार (२५), रणजीत सिंग (४५), राधेश्याम कुशवाह (४५), मिराज रसूल शेख (३४), संतोष पांडे (४२), शमीम अन्सारी (३०), राकेश पासवान (४५), मुकेश पासवान (३५), अशोक पासवान (५०), श्यामजी पाल (४८)

इमारत अतिधोकादायक असल्याचे घोषित

एनडीआरएफ, टीडीआरएफ, अग्निशमन दल यांनी बचावकार्य करण्यासाठी सुरुवात केली. कोहिनूर अपार्टमेंट ही नारपोलीतील ही इमारत २०१३ मध्ये उभारण्यात आली होती. या इमारतीमध्ये दोन अपार्टमेंट असून एका अपार्टमेंटमध्ये २४ अशा एकूण ४८ खोल्या या इमारतीमध्ये होत्या. परंतु कामच कमकुवत असल्याने सुरुवातीपासूनच इमारत धोकादायक असल्याने पालिकेने ही इमारत अतिधोकादायक म्हणून घोषित करून तीनवेळा ती निर्मनुष्य करण्यासाठी नोटीस बजावली होती.

कंत्राटदारावर फौजदारी कारवाई : मुख्यमंत्री

भिवंडीतील इमारत दुर्घटनेप्रकरणी कंत्राटदारावर फौजदारी कारवाई करण्याचे आदेश महापालिका आयुक्तांना देण्यात आल्याची माहिती मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी शुक्रवारी येथे दिली. दुर्घटनेतील मृतांच्या कुटुंबीयांना शासनाकडून मदत केली जाणार आहे. तसेच धोकादायक म्हणून घोषित करण्यात आलेल्या इमारती जे रहिवासी सोडायला तयार नसतात त्यांना सक्तीने बाहेर काढण्याचा प्रयत्न करण्यात येणार असल्याचेही फडणवीस यांनी स्पष्ट केले.

(इंग्रजी बातमी वाचण्यासाठी येथे क्लिक करा.)

आरक्षण : गुणवत्ता, ब्रेन ड्रेन आणि जात-वास्तव

ऑगस्ट महिना कसा जाईल? बघा मेष आणि वृषभ राशीचे भविष्य

आजचे राशिभविष्य, १ ऑगस्ट २०२६ : जाणून घ्या तुमच्या दिवसाचे ग्रहसंकेत

सर्दी-खोकल्यापासून चांगल्या झोपेपर्यंत... हळदीचे दूध पिण्याचे 'हे' फायदे तुम्हाला माहिती असायलाच हवेत

Delhi Riots 2020 : गुप्तचर अधिकारी अंकित शर्मा हत्येप्रकरणी माजी AAP नगरसेवक ताहीर हुसेनला जन्मठेप