ठाणे

गडकरीच्या दुरुस्तीसाठी सात वर्षांत ११ कोटी ; ४० वर्षांपूर्वीच्या गडकरी रंगायतन नाट्यगृहाची धोकादायक वास्तूकडे वाटचाल

गडकरी रंगायतनच्या दुरुस्तीकरिता मागील काही वर्षांपासून ठामपाने कोट्यवधींचा खर्च केला आहे

प्रमोद खरात

सांस्कृतिक उपराजधानी समजल्या जाणाऱ्या ठाणे शहरात महापालिकेचे भूषण असलेले गडकरी रंगायतन नाट्यगृह आहे. जवळपास ४० वर्षे जुनी असलेली ऐतिहासिक वास्तू धोकादायक होऊ लागली आहे. गेल्या काही वर्षांत छत कोसळण्याच्या तसेच वातानुकूलित यंत्रणा बंद पडण्याच्या घटना वेळोवेळी घडल्या आहेत. त्यामुळे ही धोकादायक होऊ लागलेली वास्तु वारंवार दुरुस्त करण्यापेक्षा पर्याय म्हणून नाट्यगृहाची पुनर्बांधणी करावी, अशी मागणी पाच वर्षांपूर्वीच अखिल भारतीय नाट्य परिषदेच्या ठाणे शाखेने केली होती; मात्र या मागणीकडे डोळेझाक करून गडकरी रंगायतनच्या दुरुस्तीवर करोडोंची उधळण सुरू आहे. विशेष म्हणजे, यंदाही बजेटमध्ये गडकरींच्या दुरुस्तीसाठी नव्याने ३ कोटी रुपयांच्या निधीची तरतूद करण्यात आली आहे.

गडकरी रंगायतनच्या दुरुस्तीकरिता मागील काही वर्षांपासून ठामपाने कोट्यवधींचा खर्च केला आहे. चार वर्षांपूर्वी नाट्यगृहाच्या छताचे प्लॅस्टर कोसळले होते. ठामपाने छत दुरुस्त केले आणि सदर वास्तूचा परिक्षण अहवाल मागवला. त्यानंतर वास्तू दुरुस्त करण्याचा प्रस्ताव तयार करण्यात आला; मात्र वारंवार होणाऱ्या दुरुस्तीच्या खर्चावर पर्याय म्हणून नाट्यगृहाची पुनर्बांधणी करावी, अशी मागणी अखिल भारतीय नाट्य परिषदेच्या ठाणे शाखेच्या वतीने करण्यात आली होती. विशेष म्हणजे, मोठ्या प्रमाणात गळती होत असल्याने गडकरी रंगायतनच्या छतावर शेड टाकण्याचा निणर्य घेण्यात आला. करोडो रुपये खर्च करून जे शेड बांधण्यात आले आहे, तेही चुकीच्या पद्धतीने बांधले असल्याचे उघड झाले होते.

गेल्या सहा वर्षांत गडकरी रंगायतच्या दुरुस्तीसाठी दरवर्षी करोडो रुपये खर्च करण्यात येत आहेत. स्थापत्य कामांच्या दुरुस्तीसाठी ३ कोटी २९ लाख ३८ हजार, विद्युत कामांच्या दुरुस्तीसाठी २ कोटी १७ लाख ८२ हजार, तर अग्निशमन यंत्रणा दुरुस्तीसाठी ९६ लाख ९८ हजार रुपये खर्च करण्यात आलेले असताना यंदाही बजेटमध्ये नव्याने ३ कोटी रुपयांची तरतूद करण्यात आली आहे.

शहरातील सर्वात पहिले अत्याधुनिक नाट्यगृह

ठाणे महापालिकेचे गडकरी रंगायतन नाट्यगृह १९७८ पासून अविरतपणे ठाणेकर रसिकांच्या सेवेत कार्यरत आहे. दरवर्षी गडकरी रंगायतन नाट्यगृहात जवळपास १००० ते ११०० नाट्यप्रयोग होत असतात, त्यातही सरकारी उपक्रम, सामाजिक संस्था यांचे उपक्रम मोठ्या प्रमाणात होत असतात.

२ कोटी ६५ लाखाचा खर्च मात्र तरी गळती थांबेना

गडकरी रंगायतन नाट्यगृह सुमारे ४० वर्षे जुने असल्याने मुख्यतः पावसाळयात छतावरून मोठ्या प्रमाणात गळती होत होती. त्यामुळे पाच ते सहा वर्षांपासून छतावर तात्पुरती शेड बांधून गळती थांबवण्याची कसरत महापालिका प्रशासनाकडून सुरू होती; मात्र गळती काही थांबत नव्हती. त्यामुळे २० ऑक्टोबर २०१६ साली गडकरी रंगायतनची गळती कायमस्वरूपी थांबवण्यासाठी स्टर्सल्स प्रोफाइल स्टील शिट रफींग आणि इतर भागात पॉलीकॅब रुफिंग शिट बसवण्याचा निर्णय घेण्यात आला होता. गडकरी रंगायतनवरील मूळ फ्रेम स्ट्रक्चरल सुरक्षित ठेवून या छतावर स्टेज आणि अडोटेरियम भागात २ हजार ७६० चौ. मीटर भागात र्सल्स प्रोफाइल स्टील शिट, तर उर्वरित भागात ६०५ चौ. मीटर पॉलीकॅब रुफिंग शिट बसवण्यासाठी २ कोटी ६५ लक्ष १५ हजार रुपये खर्चून छतावर शेड बसवण्यात आला आहे; मात्र तरी गळती थांबली नसल्याचे सांगण्यात येत आहे.

नव्याने ३ कोटी होणार खर्च

गडकरी नाट्यगृह इमारतीच्या दुरुस्ती आणि रंगरंगोटीचे काम कोरोनाकाळात करण्यात आले होते. या कामासाठी ६ लाख ५१ हजार २७० रुपये खर्च करण्यात आले होते. करोना र्निबधामुळे जवळपास दोन वर्षे नाट्यगृह बंद होते. याच काळात स्थापत्य कामाची दुरुस्ती, विद्युत कामाची दुरुस्ती, अग्निशमन यंत्रणा दुरुस्ती यावर ३ कोटी ७१ लाख ४४ हजार रुपयांचा खर्च करण्यात आला असताना यंदा नव्याने ३ कोटी खर्च करण्यात येणार आहेत.

Maharashtra Assembly Elections Results 2024 LIVE: महाराष्ट्राचा महानिकाल! एकाच क्लिकवर बघा कल आणि निकाल

अपक्ष, बंडखोरांसाठी रस्सीखेच; महायुती, महाआघाडीत खलबते

राहुल गांधी, खर्गे यांनी माफी मागावी, अन्यथा कारवाईला सामोरे जावे; विनोद तावडे यांची नोटीस

...तोपर्यंत मतमोजणी केंद्र सोडू नका; शरद पवारांचा उमेदवारांना आदेश

झारखंडमध्ये आज मतमोजणी