ठाणे : शिक्षण हक्क कायदा अर्थात आरटीई अंतर्गत विविध शाळांमध्ये प्रवेश घेण्यासाठी ठाणे जिल्ह्यात १० हजार ५०० अर्जांची नोंदणी झाली आहे. गेल्या आठवड्यात १४ जानेवारीपासून ऑनलाइन अर्ज भरण्याला सुरुवात झाली असून ठाणे जिल्ह्यासाठी ११ हजार ३२० जागांचा राखीव कोटा आरटीई अंतर्गत ठेवण्यात आला आहे. ऑनलाइन अर्ज करण्यासाठी आणखी ७ दिवसांची मुदत असून २७ जानेवारीपर्यंत पालकांना ऑनलाइन अर्ज करता येणार आहे. त्यामुळे राखीव जागांपेक्षा अर्ज जास्त येण्याची शक्यता आहे.
आर्थिक आणि सामाजिक दृष्ट्या दुर्बल असलेल्या घटकातील मुलांना खासगी विनाअनुदानित शाळांमध्ये शिक्षण घेता यावे, याकरिता आरटीई कायद्यांतर्गत २५ टक्के जागांवर प्रवेश प्रक्रिया राबविण्यात येते. ठाणे जिल्ह्यातील आणि महापालिका क्षेत्रातील ६२७ शाळा आरटीई प्रवेश प्रक्रियेसाठी पात्र ठरल्या असून ११ हजार ३२० जागांसाठी ही प्रवेश प्रक्रिया पार पडणार आहे. ठाणे जिल्ह्यातून आठवड्याभरात म्हणजे १४ जानेवारी ते २० जानेवारीपर्यंत १० हजार ५०६ अर्ज दाखल झाले असल्याची माहिती आरटीई संकेतस्थळावरून प्राप्त झाली आहे.
पालकांसाठी मदत केंद्रांची यादी, ऑनलाइन प्रक्रियेत अर्ज नोंदणी बाबत मार्गदर्शक पुस्तिका, आवश्यक कागदपत्रे इत्यादी बाबत सर्व माहिती शासनाच्या अधिकृत संकेतस्थळावर उपलब्ध करून देण्यात आली असल्याची माहिती शिक्षण विभागाच्या वतीने देण्यात आली आहे.