संग्रहित छायाचित्र 
ठाणे

महायुतीतही रस्सीखेच सुरू; भाजपच्या मुरबाडवर शिवसेनेचा दावा!

Swapnil S

बदलापूर : मुरबाड विधानसभा मतदारसंघाच्या जागेसाठी महविकास आघाडीत रस्सीखेच सुरू झाली आहे. असे असताना मुरबाड मतदारसंघातील भाजपच्या जागेवर शिवसेनेकडून दावा करण्यात आला आहे. त्यामुळे मुरबाड विधानसभा मतदारसंघाच्या जागेवरून महायुतीतही रस्सीखेच सुरू झाल्याचे चित्र पहावयास मिळत आहे.

आगामी विधानसभा निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर राष्ट्रवादी शरदचंद्र पवार गटाने उमेदवाराची चाचपणी सुरू केली आहे. त्यानंतर काँग्रेसकडूनही मुरबाड मतदारसंघाच्या जागेवर दावा केला आहे. त्यामुळे लोकसभा निवडणुकीत ज्याप्रमाणे भिवंडीच्या जागेसाठी शरदचंद्र पवार गट व काँग्रेसमध्ये जोरदार रस्सीखेच झाली; त्याप्रमाणे मुरबाड विधानसभेच्या जागेसाठीही रस्सीखेच होणार असल्याचे संकेत मिळत आहेत. आगामी विधानसभा, जिल्हा परिषद, पंचायत समिती व नगरपरिषद निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर बुधवारी बदलापुरातील अजय राजा हॉलमध्ये आयोजित पदाधिकारी बैठकीत ही मागणी करण्यात आली. या बैठकीनंतर पत्रकारांशी बोलताना शिवसेनेचे कल्याण, मुरबाड जिल्हाप्रमुख अरविंद मोरे, भिवंडी लोकसभा सहसंपर्क प्रमुख सुभाष पवार व बदलापूरचे शहरप्रमुख वामन म्हात्रे यांनी याबाबतची भूमिका स्पष्ट केली.

मुरबाड विधानसभेच्या तीन निवडणुकीत किसन कथोरे यांच्याशी माजी आमदार गोटिराम पवार व वामन म्हात्रे यांची लढत झाली आहे. या निवडणुकीतील गोटिराम पवार व वामन म्हात्रे यांच्या मतांची बेरीज केली तर भाजप ३० ते ३५ हजार मतांनी मागे पडते, असे गणित मांडत बदलापूरचे शिवसेना शहर प्रमुख वामन म्हात्रे यांनी मुरबाडची जागा शिवसेनेला मिळावी, अशी मागणी केली. ही जागा शिवसेनेला मिळाल्यास ती मोठ्या मताधिक्याने जिंकण्याचा दावाही वामन म्हात्रे यांनी केला आहे. दरम्यान, आता शिवसेनेच्या या मागणीबाबत आमदार किसन कथोरे व भाजप कोणती भूमिका घेणार? हे पाहणे औत्सुक्याचे ठरणार आहे.

मुरबाड मतदारसंघात शिवसेनेची ताकद वाढलेली आहे. त्यामुळे आगामी विधानसभा निवडणुकीत मुरबाडची जागा शिवसेनेला मिळावी, अशी मागणी सर्वानुमते करण्यात येणार असून याबाबत अंतिम निर्णय मुख्यमंत्री एकनाथ शिंदे घेतील. - सुभाष पवार, भिवंडी लोकसभा सहसंपर्क प्रमुख

मुरबाड मतदारसंघात भाजपचे किसन कथोरे आमदार असले तरी ताकद शिवसेनेची आहे. त्यामुळे मागील निवडणुकीत ज्याप्रमाणे कल्याण पश्चिमची जागा शिवसेनेला सोडण्यात आली त्याप्रमाणे मुरबाडची जागा शिवसेनेला सोडण्यात यावी. - अरविंद मोरे, शिवसेना कल्याण, मुरबाड जिल्हाप्रमुख

मविआचा तिढा सुटला! २६० जागांवर सहमती; २८ जागांवर रस्सीखेच; १-२ दिवसांत जागावाटप जाहीर होणार

मुंबईत आज पाऊस बरसणार; १६ ऑक्टोबरपर्यंत महाराष्ट्रासह 'या' राज्यांत मुसळधारचा IMD चा इशारा

विधानसभेचे रणशिंग फुंकणार; दसरा मेळाव्यात उद्धव ठाकरे-एकनाथ शिंदे भिडणार!

IND vs BAN 3rd T20I : टीम इंडिया आज क्लीन स्वीपचे 'तोरण' बांधणार; 'या' ४ खेळाडूंना संधी मिळणार?

रतन टाटांचा वारसदार मिळाला; नोएल टाटा बनले टाटा ट्रस्टचे चेअरमन