घोडबंदर-वाघबीळ येथे राज्यातील सर्वात मोठे नाट्यगृह; 'आप्पासाहेब धर्माधिकारी नाट्यगृह’ ठाण्याच्या सांस्कृतिक क्षेत्राला चालना देणार (Photo-X/@PratapSarnaik)
ठाणे

Thane : घोडबंदर-वाघबीळ येथे राज्यातील सर्वात मोठे नाट्यगृह; 'आप्पासाहेब धर्माधिकारी नाट्यगृह’ ठाण्याच्या सांस्कृतिक क्षेत्राला चालना देणार

घोडबंदर रोडवरील वाघबीळ परिसरात लवकरच अत्याधुनिक आणि भव्य नाट्यगृह उभारण्यात येणार असून, ‘आप्पासाहेब धर्माधिकारी नाट्यगृह’ या नावाने ओळखला जाणारा हा प्रकल्प राज्यातील सर्वात मोठे नाट्यगृह ठरणार आहे.

Swapnil S

ठाणे : घोडबंदर रोडवरील वाघबीळ परिसरात लवकरच अत्याधुनिक आणि भव्य नाट्यगृह उभारण्यात येणार असून, ‘आप्पासाहेब धर्माधिकारी नाट्यगृह’ या नावाने ओळखला जाणारा हा प्रकल्प राज्यातील सर्वात मोठे नाट्यगृह ठरणार आहे. सुमारे २५०० प्रेक्षक क्षमतेच्या या नाट्यगृहामुळे ठाण्याच्या सांस्कृतिक क्षेत्राला मोठी चालना मिळणार असल्याची माहिती परिवहन मंत्री प्रताप सरनाईक यांनी दिली.

शुक्रवारी झालेल्या पत्रकार परिषदेत त्यांनी या प्रकल्पाची सविस्तर माहिती दिली. प्रारंभी निधीअभावी रखडलेला हा प्रकल्प आता गती घेत असून, राज्य शासनाने एकूण १३८ कोटी रुपयांचा निधी मंजूर केला आहे. यासाठी दोन शासन निर्णय (जीआर) काढण्यात आले असून, पहिल्या टप्प्यात ८५ कोटी आणि दुसऱ्या टप्प्यात ५३ कोटी रुपयांचा निधी वितरीत करण्यात आला आहे. पुढील तीन वर्षांत हे काम पूर्ण करण्याचे नियोजन आहे.

सुमारे ७३०० चौरस मीटर क्षेत्रफळावर उभारण्यात येणाऱ्या या नाट्यगृहात २५०० आसन क्षमता असेल. मुख्य सभागृहात १६०० आसने, तर दोन बाल्कनींमध्ये प्रत्येकी सुमारे ४५० आसनांची व्यवस्था असणार आहे. विशेष म्हणजे, रंगमंचाची उंची गडकरी रंगायतनपेक्षा तब्बल १२ मीटर अधिक ठेवण्यात येणार आहे, ज्यामुळे भव्य नाट्यप्रयोग सादर करणे शक्य होणार आहे.

नाट्यगृहाच्या परिसरातील सुमारे ६० टक्के जागा मोकळी ठेवून सुमारे २००० चौरस मीटरचा प्रशस्त प्लाझा उभारण्यात येणार आहे. या प्लाझामध्ये एकावेळी १५०० ते २००० नागरिक उभे राहू शकतील. तसेच येथे लाईव्ह इव्हेंट्स आणि सांस्कृतिक कार्यक्रम सादर करण्याची सुविधा उपलब्ध करून दिली जाणार आहे.

अत्याधुनिक सुविधा

वाहनतळाचीही सुसज्ज व्यवस्था करण्यात येणार असून, सुमारे ६५० चारचाकी आणि ३०० दुचाकींसाठी पार्किंगची सुविधा असेल. याशिवाय दोन बेसमेंट आणि तीन मजल्यांवर पार्किंगची सोय करण्यात येणार आहे. प्रेक्षकांसाठी ६ लिफ्ट, स्वयंचलित जिने, प्रशस्त आसनव्यवस्था (प्रत्येक खुर्चीची किंमत सुमारे १२ हजार रुपये), स्वच्छतागृहे आदी अत्याधुनिक सुविधा उपलब्ध असतील. दिव्यांगांसाठी पहिल्या रांगेत १२ आसनांची विशेष व्यवस्था करण्यात येणार आहे.

१००० क्षमतेचे दोन मोठे बँक्वेट हॉल

कलाकारांसाठी स्वतंत्र लिफ्ट, बॅकस्टेज सुविधा तसेच प्रत्येकी १००० क्षमतेचे दोन मोठे बँक्वेट हॉल उभारण्यात येणार आहेत. या हॉलमधून महापालिकेला उत्पन्न मिळणार असून, नाट्यगृहाच्या देखभालीसाठी ते उपयुक्त ठरणार आहे. या प्रकल्पाच्या नियोजनासाठी लवकरच रंगकर्मी, दिग्दर्शक आणि कलाकारांची बैठक आयोजित केली जाणार असून, त्यांच्या सूचनांनुसार पुढील कामाला सुरुवात केली जाईल. एकंदरीतच, वाघबीळ येथे उभारले जाणारे ‘आप्पासाहेब धर्माधिकारी नाट्यगृह’ ठाण्याच्या सांस्कृतिक वैभवात मोठी भर घालणारे ठरणार आहे.

व्याजदर यंदा स्थिरच? आजपासून पतधोरण समितीची आढावा बैठक; बुधवारी निर्णय जाहीर होणार

'ग्रीन आशा'ची सुरक्षित वाटचाल; होर्मुझमधून आठवे भारतीय LPG जहाज पार

Mumbai : रेल्वे म्हणते, गाड्या 'वेळेत' धावतात; प्रवासी म्हणतात, १५ मिनिटे उशिरा

Mumbai : 'माझ्या भावावर तलवारीने वार…'; मालाडमध्ये दोन गटांत तुफान हाणामारी; एक तरुण गंभीर जखमी, पाच जण अटकेत

महापौर रितू तावडे यांच्या पासपोर्ट नूतनीकरणाला परवानगी