

मध्यपूर्वेत सुरू असलेल्या युद्धाच्या पार्श्वभूमीवर भारतासाठी दिलासादायक माहिती समोर आली आहे. भारताचे ध्वज असलेल्या 'ग्रीन आशा' या जहाजाने होर्मुझ सामुद्रधुनी यशस्वीरित्या पार केली असल्याची माहिती अधिकृत सूत्रांनी सोमवारी (दि.६) दिली.
२८ फेब्रुवारीपासून सुरू झालेल्या युद्धानंतर होर्मुझ सामुद्रधुनी पार करणारे हे आठवे भारतीय एलपीजी जहाज ठरले आहे. याआधी 'ग्रीन सान्वी' या मोठ्या गॅस वाहक जहाजाने शुक्रवारी रात्री ही सामुद्रधुनी सुरक्षितपणे पार केली होती. या जहाजामध्ये सुमारे ४६,६५० मेट्रिक टन द्रवरूप पेट्रोलियम वायू (एलपीजी) होता.
कांडला टर्मिनलवर ४७,००० टन एलपीजीचा साठा
यापूर्वी २८ मार्च रोजी गुजरातमधील जामनगर येथील डीपीए कांडला टर्मिनलवर ४७,००० मेट्रिक टन एलपीजीचा साठा पोहोचला होता. 'एमटी जग वसंत' या जहाजाद्वारे हा माल आणण्यात आला असून, तो शिप-टू-शिप (एसटीएस) प्रक्रियेद्वारे दुसऱ्या जहाजात हस्तांतरित केला जाणार आहे.
माहितीनुसार, या संपूर्ण प्रक्रियेदरम्यान भारतीय नौदलाची युद्धनौका व्यापारी जहाजांना आवश्यक ते समर्थन देण्यासाठी सज्ज आहे.
सरकारचे इराणसोबत समन्वय
मध्यपूर्वेतील तणावामुळे समुद्री नाकेबंदी निर्माण झाल्याने भारत सरकारने इराणच्या अधिकाऱ्यांशी सतत संपर्क ठेवला आहे. भारतीय जहाजांना सुरक्षित मार्ग मिळावा यासाठी राजनैतिक स्तरावर चर्चा सुरू आहे.
याआधी जहाजवाहतूक मंत्रालयाने दिलेल्या माहितीनुसार, पर्शियन गल्फ परिसरात सध्या १८ भारतीय जहाजे आणि सुमारे ४८५ खलाशी कार्यरत आहेत.
सर्व खलाशी सुरक्षित, केंद्र सरकारचे निरीक्षण
गेल्या काही दिवसांतील घडामोडींवर संयुक्त मंत्रालयीन बैठकीत बंदरे, जहाजवाहतूक आणि जलमार्ग मंत्रालयाचे अतिरिक्त सचिव मुकेश मंगल यांनी माहिती दिली. त्यांनी सांगितले, "पर्शियन गल्फमधील सर्व भारतीय जहाजे आणि खलाशांवर सतत लक्ष ठेवले जात आहे. सर्व खलाशी सुरक्षित आहेत."
ते पुढे म्हणाले, "या भागात सध्या १८ भारतीय जहाजे आणि सुमारे ४८५ खलाशी आहेत. आतापर्यंत ९६४ हून अधिक खलाशांना परत आणण्यात आले आहे. देशातील सर्व बंदरे सुरळीतपणे कार्यरत आहेत."
याशिवाय केंद्र सरकार विविध मंत्रालये, परराष्ट्र व्यवहार मंत्रालय, परदेशातील भारतीय दूतावास आणि समुद्री क्षेत्रातील संबंधित घटकांशी सातत्याने समन्वय साधत आहे.
५,९८,००० नागरिक भारतात परतले
मध्य पूर्व आणि गल्फ प्रदेशातील बिघडलेल्या सुरक्षेच्या पार्श्वभूमीवर आतापर्यंत सुमारे ५,९८,००० प्रवासी भारतात परतले असल्याची माहिती वरिष्ठ सरकारी अधिकाऱ्यांनी दिली आहे.