उल्हास नदी पूर नियंत्रणरेषा बाधितांना मिळणार दिलासा; शिवरायांच्या अश्वारूढ पुतळ्याच्या अनावरणावेळी मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीसांचे संकेत  X - @CMOMaharashtra
ठाणे

उल्हास नदी पूर नियंत्रणरेषा बाधितांना मिळणार दिलासा; शिवरायांच्या अश्वारूढ पुतळ्याच्या अनावरणावेळी मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीसांचे संकेत

बदलापूर : नवीन विकास नियंत्रण नियमावलीत पूर रेषेत कुठे बांधकाम करता येईल, याबाबत काही नियमावली तयार करता येईल. यापूर्वी कोल्हापूरमध्ये ते यशस्वी झाले असल्याचे सांगून मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी आगामी काळात उल्हास नदी पूर नियंत्रणरेषेमुळे बाधित झालेल्या नागरिकांना दिलासा मिळणार असल्याचे संकेत दिले आहेत.

Swapnil S

बदलापूर : नवीन विकास नियंत्रण नियमावलीत पूर रेषेत कुठे बांधकाम करता येईल, याबाबत काही नियमावली तयार करता येईल. यापूर्वी कोल्हापूरमध्ये ते यशस्वी झाले असल्याचे सांगून मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी आगामी काळात उल्हास नदी पूर नियंत्रणरेषेमुळे बाधित झालेल्या नागरिकांना दिलासा मिळणार असल्याचे संकेत दिले आहेत.

बदलापूर पश्चिमेकडील उल्हास नदीजवळ बदलापूर गावाच्या वेशीवर उभारण्यात आलेल्या छत्रपती शिवाजी महाराजांच्या अश्वारूढ पुतळ्याचे मंगळवारी राज्याचे मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या हस्ते अनावरण करण्यात आले. याप्रसंगी स्वदेश, स्वधर्म आणि स्वभाषा जिवंत आहे, ते छत्रपती शिवाजी महाराजांमुळे त्यामुळे बदलापुरातील छत्रपती शिवाजी महाराजांचा अश्वारूढ पुतळा म्हणजे तुम्हा आम्हासाठी प्रेरणास्थान असून त्यापासून प्रेरणा घेऊन आपण पुढे वाटचाल करूया, असे आवाहन मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी केले.

कार्यक्रमाचे प्रास्ताविक करताना माजी नगराध्यक्ष राजेंद्र घोरपडे व मनोगत व्यक्त करताना आमदार किसन कथोरे यांनी बदलापूरला एमएमआरडीएकडून निधीबाबत सापत्नभावाची वागणूक मिळत असल्याने मोठमोठे प्रकल्प रखडले असल्याची खंत व्यक्त केली. तसेच उल्हास नदीच्या पूर नियंत्रण रेषेमुळे लाखो नागरिक बाधित होत असल्याची कैफियत मांडून यातून दिलासा देण्याबाबत निर्णय घेण्याची मागणी केली. हा धागा पकडून मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी कोल्हापूरच्या धर्तीवर दिलासा देण्याचा प्रयत्न करणार असल्याचे संकेत दिले. ते पुढे म्हणाले की, उल्हास नदीवर आपण काही धरण देखील बांधतो आहोत, ही धरणे बांधल्यानंतर आपोआप पूररेषा कमी होणार आहे. त्यातून या भागाला दिलासा मिळेल.

उल्हास नदीतील गाळ काढून खोलीकरण करण्याचे काम हाती घेण्यात येईल. उल्हास नदी खोरे ही कोकणातील सर्वात मोठे खोरे असून मोठ्या प्रमाणात पाणी उपलब्ध आहे. त्याचे योग्य नियोजन करणे व निर्मळ बनवणे ही काळाची गरज असल्याचे मत मुख्यमंत्र्यांनी व्यक्त केले. कार्यक्रमाचे सूत्रसंचालन शरद तेली यांनी केले.

याप्रसंगी खासदार सुरेश उर्फ बाळ्यामामा म्हात्रे, आमदार किसन कथोरे, आमदार कुमार आयलानी, विधान परिषद आमदार निरंजन डावखरे, शिक्षक आमदार ज्ञानेश्वर म्हात्रे, जिल्हाधिकारी, अशोक शिनगारे, पोलीस आयुक्त आशुतोष डुंबरे, मुख्याधिकारी मारुती गायकवाड, भाजप जिल्हाध्यक्ष जितेंद्र टाकी आदींसह अनेक मान्यवर उपस्थित होते.

लवकरच एमएमआरडीएचा निधी इथपर्यंत येईल

एमएमआरडीएचा निधी इथपर्यंत येईल, याचा मार्ग आपण निश्चितपणे मोकळा करू, अशी ग्वाही मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी दिली. पाणीपुरवठा योजनेबाबत उपमुख्यमंत्र्यांशी चर्चा करून नगरविकास विभागामार्फत पाण्याचा प्रश्न मार्गी लावण्याचे आश्वासन मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी दिले. मेट्रो १४ हा प्रकल्पाला चालना देण्यात येणार असल्याचे मुख्यमंत्र्यांनी सांगितले. बदलापूरच्या स्वतंत्र महानगरपालिकेच्या मागणीबाबत मात्र त्यांनी बोलण्याचे टाळले.

कथोरे योग्य वेळी मंत्री होतील

आमदार किसन कथोरे मंत्र्यापेक्षा कमी आहेत का? मंत्री करू शकत नाही ते काम कथोरे करीत आहेत आणि प्रत्यक्ष मुख्यमंत्री त्यांच्या पाठीशी आहे. त्यामुळे चिंता करण्याची गरज नाही. योग्यवेळी ते मंत्रीही होतील, असे मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी सांगितले.

विरार-अलिबाग अंतर दोन तासांत पार होणार; मल्टिमॉडेल मार्गिकेला राज्य मंत्रिमंडळाची मंजुरी

मराठा आंदोलनाचा विजय! अखेर मनोज जरांगे-पाटलांनी पाचव्या दिवशी उपोषण सोडले; राज्य सरकारकडून ८ पैकी ६ मागण्या मान्य

घटनेतील तरतुदींचे स्पष्टीकरण करणार, सर्वोच्च न्यायालयाची माहिती; राष्ट्रपती, राज्यपालांवर विधेयकावर कालावधीचे बंधन

चीनकडून भव्य लष्करी संचलनात अत्याधुनिक शस्त्रांचे आज प्रदर्शन

GST परिषदेची आज बैठक; दैनंदिन वापरातील वस्तूंवरील कर कमी होण्याची शक्यता