Badlapur : साडी आणली नाही म्हणून थेट नवऱ्याचा घेतला जीव; पत्नी अटकेत 'एआय'ने बनविलेली प्रतिमा
ठाणे

Badlapur : साडी आणली नाही म्हणून थेट नवऱ्याचा घेतला जीव; पत्नी अटकेत

बदलापूरमध्ये साडी आणली नाही म्हणून पत्नीने पतीची हत्या केल्याचा धक्कादायक प्रकार समोर आला असून, आरोपी पत्नीला पोलिसांनी अटक केली आहे.

Mayuri Gawade

क्षुल्लक कारणांवरून होणारे वाद टोकाला जाऊन एकमेकांचा जीव घेतल्याच्या घटना हल्ली सातत्याने समोर येत आहेत. अशाच एका धक्कादायक घटनेत, साडी आणून दिली नाही म्हणून झालेल्या वादातून पत्नीने पतीची हत्या केल्याचा आरोप आहे. ठाणे जिल्ह्यातील बदलापूरमध्ये घडलेल्या या प्रकरणात पोलिसांनी मंगळवारी (दि. २१) ३० वर्षीय महिलेला अटक केली असून, सुरुवातीला तिने हा मृत्यू अपघाती असल्याचा बनाव करण्याचाही प्रयत्न केला होता.

साडीवरून झाला वाद

पीटीआयने दिलेल्या वृत्तानुसार, बिहारमधील रोहतास जिल्ह्याची रहिवासी असलेली सुनीता देवी सिंह (३०) ही पती हरिराम सिंह (३५) यांच्यासोबत बदलापूर पूर्व येथे राहत होती. १९ जुलै रोजी हरिराम घरी आल्यानंतर त्यांनी साडी आणली नसल्याच्या कारणावरून दोघांमध्ये जोरदार वाद झाला. वाद विकोपाला गेल्यानंतर संतापाच्या भरात सुनितादेवीने प्रेशर कुकरच्या झाकणाने पतीवर हल्ला केला. त्यानंतर त्याचा गळा आवळून हत्या केल्याचा आरोप पोलिसांनी केला आहे.

अपघाती मृत्यूचा बनाव फसला

घटनेनंतर पत्नीने पतीचा मृत्यू अपघाती झाल्याची माहिती पोलिसांना दिली. त्यानुसार सुरुवातीला पोलिसांनी आकस्मिक मृत्यूची नोंद (ADR) केली होती. मात्र, शासकीय रुग्णालयाच्या शवविच्छेदन अहवालात गळा आवळल्यामुळे श्वास रोखला जाऊन मृत्यू झाल्याचे स्पष्ट झाले. त्यानंतर पोलिसांनी मृताच्या नातेवाईकांसह घरमालकाची चौकशी केली. चौकशीत पत्नीवर संशय बळावल्याने तपासाची दिशा बदलली.

पत्नीला अटक

पोलिसांनी मंगळवारी सुनितादेवीला अटक केली. तिला न्यायालयात हजर केले असता न्यायालयाने २९ जुलैपर्यंत पोलीस कोठडी सुनावली आहे. या प्रकरणाचा पुढील तपास बदलापूर पूर्व पोलीस करत आहेत.

दरम्यान, काही माध्यमांच्या वृत्तानुसार, हरेराम सिंग आणि सुनीता देवी यांच्यात यापूर्वीही वारंवार कौटुंबिक वाद होत असत. त्यामुळे ही घटना केवळ साडीवरून घडली की त्यामागे इतर काही कारणेही होती, याचाही पोलीस तपास करत आहेत. तसेच, आरोपी महिलेने पुरावे नष्ट करण्याचा किंवा पोलिसांची दिशाभूल करण्याचा प्रयत्न केला का, याचाही तपास सुरू असल्याचे सांगितले जात आहे.

(संबधित इंग्रजी बातमी वाचण्यासाठी येथे क्लिक करा.)

Mumbai : गणेशभक्तांना दिलासा; मध्यरात्रीपर्यंत धावणार ॲक्वा लाईन मेट्रो, जाणून घ्या वेळ

बेपत्ता मुलाला मृत समजून केले अंत्यसंस्कार; काही दिवसांनी आला फोन, 'तो जिवंत आहे'

Delhi : उशिरा घरी परतल्याने कुटुंबीय रागावले; १३ वर्षीय मुलीने उचललं टोकाचं पाऊल

Mumbai : भुलेश्वर, गिरगावात बुलडोझर; एसव्हीपी रोडवरील फुटपाथ अतिक्रमणांवर हातोडा, तीन मोठ्या लॉरी भरून साहित्य हटवले

जिल्हा, न्यायालयीन कर्मचाऱ्यांच्या वेतनवाढीच्या मागणीला पाठिंबा; महाराष्ट्र राज्य न्यायाधीश संघटनेचा निर्णय