PM
ठाणे

रेल्वे फाटकांचा अडथळा दूर होणार; बदलापूर-कर्जत रेल्वे मार्गावर दहा उड्डाणपुलांची उभारणी

बदलापूर ते कर्जत मार्गावर दहा रेल्वे उड्डाणपुलांची उभारणी होणार आहे. त्यामुळे वांगणी ते कर्जत स्थानकादरम्यान रेल्वे वाहतुकीला अडथळा ठरणारी आणि नागरिकांना मनस्ताप ठरणारी रेल्वे फाटके हटून नागरिकांची होत असलेली गैरसोय टळणार आहे.

Swapnil S

बदलापूर : बदलापूर ते कर्जत मार्गावर दहा रेल्वे उड्डाणपुलांची उभारणी होणार आहे. त्यामुळे वांगणी ते कर्जत स्थानकादरम्यान रेल्वे वाहतुकीला अडथळा ठरणारी आणि नागरिकांना मनस्ताप ठरणारी रेल्वे फाटके हटून नागरिकांची होत असलेली गैरसोय टळणार आहे. याबद्दल उपनगरीय रेल्वे प्रवासी एकता संस्थेने रेल्वे प्रशासनाचे आभार मानले असून उड्डाणपूल उभारणीच्या कामाला गती मिळावी, अशी अपेक्षा व्यक्त केली आहे.

रेल्वेची वाहतूक विनाअडथळा व्हावी, यासाठी सन २०१५ पर्यंत मुंबई ते पुणे या मार्गावरील सर्व रेल्वे फाटके बंद करून रेल्वे उड्डाणपूल उभारण्याची घोषणा मध्य रेल्वेच्या तत्कालीन महाप्रबंधकांनी केली होती. मात्र अद्याप यासंदर्भात कार्यवाही झालेली नाही. त्यामुळे वांगणी, शेलू, नेरळ, भिवपुरी ही स्थानके उड्डाणपुलाअभावी त्रस्त झाली आहेत.

मध्य रेल्वे मार्गावरील बदलापूरच्या पुढे वांगणी ते कर्जत पट्ट्यात गेल्या दशकभरात लोकसंख्या झपाट्याने वाढली आहे. त्याचबरोबर वाहनांच्या संख्येतही मोठी वाढ झाली आहे. त्यात या रेल्वे स्थानकात रेल्वे उड्डाणपूल नसल्याने शहराच्या पूर्व पश्चिम भागात येजा करण्यासाठी वाहनचालकांना रेल्वे फाटकातून जावे लागते.

लांब पल्ल्याच्या एक्स्प्रेस गाड्या, मालगाड्या व लोकल गाड्या रेल्वे स्थानकात येताना व रेल्वे स्थानकातून जाताना ही रेल्वे फाटके बंद असतात. त्यामुळे या गाड्या जाईपर्यंत वाहनचालकांना रेल्वे फाटकात थांबून राहावे लागते. असल्याने वाहनांची गर्दी झाल्यास अनेकदा वाहनकोंडीही होत असते.

नागरिकांची होत असलेली ही गैरसोय टाळण्यासाठी वाहतुकीस अडथळा ठरत असलेली वांगणी ते कर्जत रेल्वे स्थानकादरम्यानची सर्व रेल्वे फाटके बंद करून त्याठिकाणी उड्डाणपूल उभारावेत, अशी मागणी उपनगरीय रेल्वे प्रवासी एकता संस्थेच्या वतीने रेल्वे प्रशासन व महाराष्ट्र शासनाकडे सातत्याने करण्यात येत होती. या मागणीची दखल घेऊन रेल्वे प्रशासनाने बदलापुर ते कर्जत या रेल्वे मार्गावर १० उड्डाणपूल उभारण्याच्या घेतलेल्या निर्णयाचे उपनगरीय रेल्वे प्रवासी एकता संस्थेने स्वागत केले असल्याची माहिती संस्थेचे वरिष्ठ सल्लागार व मध्य रेल्वे उपनगरीय सल्लागार समिती सदस्य मनोहर शेलार यांनी दिली.

कामाला गती मिळणार

या उड्डाणपुलांच्या परीक्षण व मंजुरीची प्रक्रिया सुरू असल्याचे मध्य रेल्वेचे कोकण विभाग मुख्य अभियंता शरद राजभोग यांच्या कार्यालयाकडून कळविण्यात आले असल्याचेही शेलार यांनी स्पष्ट केले. त्याचबरोबर रेल्वे प्रशासनाने या कामाला अधिक गती मिळावी, आणि लवकरात लवकर रेल्वे उड्डाणपुलांची उभारणी होऊन नागरिकांना दिलासा मिळावा, अशी अपेक्षाही शेलार यांनी व्यक्त केली आहे.

ओबीसी आरक्षणाला धक्का नाही! मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांची ग्वाही; नोंदी असलेल्यांनाच कुणबी प्रमाणपत्र मिळणार

‘देवाभाऊ’ कॅम्पेनवरून जोरदार वादंग; जाहिरात देणारा भाजपच्या मित्रपक्षाचा मंत्री - रोहित पवार

मुंबईला मिळणार वातानुकूलित वंदे मेट्रो; २ हजार ८५६ डब्यांच्या खरेदीची निविदा जाहीर

निवडणूक आयोग भाजपचे कार्यालय बनले का? मल्लिकार्जुन खर्गे यांची टीका

अस्तित्व वाचवण्यासाठी ओमी कलानींची धडपड; अखेर युतीसाठी शिंदे गटाचा दरवाजा ठोठावला