भिवंडी : येथे २० वर्षीय मैत्रिणीचा तिच्या मित्रानेच विनयभंग केल्याची संतापजनक घटना कोनगाव येथे घडली आहे. यामुळे परिसरात खळबळ उडाली आहे. याप्रकरणी विनयभंग करणाऱ्या मित्रावर कोनगाव पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे.
जय उर्फ अनिकेत आझाद बोहत (२४, रा. डोंबिवली) असे गुन्हा दाखल झालेल्या मित्राचे नाव आहे. पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, २० वर्षीय पीडिता आणि जय हे एकमेकांच्या ओळखीचे आहेत. पीडिता ही कोनगाव येथील एका अपार्टमेंट मध्ये राहते.
२१ नोव्हेंबर रोजी सायंकाळी पीडित तक्रारदार युवती कामावरून घरी परतली. तेव्हा आरोपी जयने पीडितेचा ती राहत असलेल्या जिन्यावरच विनयभंग केला. ही बाब कोणाला सांगितल्यास पीडितेला जीवे मारण्याची धमकीही दिली. याप्रकरणी ८ डिसेंबर रोजी पीडितेने दिलेल्या तक्रारीवरून जय याच्या विरोधात कोनगाव पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल केला आहे.