ठाणे : ठाणे जिल्ह्यातील भिवंडीच्या गंगारामवाडी परिसरात गुरुवारी (दि. ३०) रात्री साडेअकराच्या सुमारास चार मजली कोहिनूर अपार्टमेंटच्या 'बी' विंगचा काही भाग अचानक कोसळला. या भीषण दुर्घटनेत आतापर्यंत नऊ जणांचा मृत्यू झाला असून अनेकजण जखमी झाले आहेत. तसेच, ढिगाऱ्याखाली आणखी काही नागरिक अडकल्याची भीती व्यक्त करण्यात येत असून, त्यांचा शोध घेण्यासाठी एनडीआरएफ, एसडीआरएफ, अग्निशमन दल आणि स्थानिक प्रशासनाकडून युद्धपातळीवर बचावकार्य सुरू आहे.
दुरुस्ती सुरू असतानाच दुर्घटना
महापालिका अधिकाऱ्यांनी सांगितले की, कोहिनूर अपार्टमेंटमध्ये ४८ खोल्या असून प्रत्येक मजल्यावर १२ खोल्या आहेत. ही इमारत यापूर्वीच 'धोकादायक' घोषित करण्यात आली होती. दुर्घटनेच्या वेळी इमारतीच्या दुरुस्तीचे काम सुरू होते.
रात्री सुमारे ९ वाजल्यापासून इमारतीत तडे जात असल्याचा आवाज येऊ लागल्याने स्थानिक नागरिकांनी अनेक कुटुंबांना बाहेर काढले. मात्र, काही रहिवासी बाहेर पडत असतानाच 'बी' विंगचा भाग कोसळला.
मोठा आवाज ऐकताच जीव वाचवण्यासाठी उड्या
दुर्घटनेतून बचावलेले अभय कुमार यादव यांनी सांगितले की, रात्री जेवण झाल्यानंतर ते कुटुंबासह खोलीत होते. अचानक इमारतीतून मोठा तडतडण्याचा आवाज आला. बाहेर पडण्याचा मार्ग नसल्याने त्यांनी पहिल्या मजल्यावरून उडी मारली. या घटनेत त्यांच्या पायाला फ्रॅक्चर झाले.
यादव यांनी सांगितले की, स्थानिक तरुणाने शिडी आणल्यामुळे अनेकांना सुरक्षित खाली उतरता आले. "त्यावेळी इमारतीत सुमारे २५ ते ३० जण होते. इमारतीत एकूण ४५ खोल्या आहेत. ती शिडी नसती तर अनेकांचे प्राण गेले असते," असे त्यांनी सांगितले.
क्षणात गोंधळ, जीव वाचवण्यासाठी पहिल्या मजल्यावरून उडी
दुसरे रहिवासी दीपक कुमार यादव यांनी सांगितले की, शेजारच्या इमारतीच्या खांबांच्या दुरुस्तीचे काम सुरू होते. रात्री जेवण झाल्यावर झोपल्यानंतर अचानक मोठा आवाज झाला आणि काही क्षणांतच सर्वत्र गोंधळ उडाला. "जीव वाचवण्यासाठी मी पहिल्या मजल्यावरून उडी मारली," असे त्यांनी सांगितले.
'डोळ्यांसमोर इमारत कोसळली'
संगीता प्रजापती या दुर्घटनेच्या वेळी पार्किंग परिसरात होत्या. इमारतीला तडे जात असल्याचा आवाज ऐकताच त्या बाहेर पळाल्या. मात्र, बाहेर पडत असतानाच इमारतीचा भाग कोसळला. या दुर्घटनेत त्या जखमी झाल्या.
'फोन वाजतोय, पण उत्तर मिळत नाही'
नेहा सिंह यांनी सांगितले की, त्यांचे पती रणजित सिंह दुर्घटनेपूर्वी काही कामासाठी खाली गेले होते. "ते गेल्यानंतर अवघ्या दहा मिनिटांत इमारत कोसळली. त्यांचा मोबाईल अजूनही वाजतो आहे, पण ते फोन उचलत नाहीत," असे त्या भावूक होत म्हणाल्या.
एनडीआरएफकडून युद्धपातळीवर बचावमोहीम
घटनास्थळी एनडीआरएफ, एसडीआरएफ, अग्निशमन दल, ठाणे आपत्ती प्रतिसाद पथक आणि स्थानिक प्रशासनाकडून बचावकार्य सुरू आहे. श्वान पथक, चार अग्निशमन बंब, दोन रुग्णवाहिका आणि जड यंत्रसामग्रीच्या मदतीने ढिगारा हटवण्याचे काम सुरू आहे.
रहिवासी उपजिल्हाधिकारी संदीप माने यांनी सांगितले की, दुर्घटनेतील मृतांचा आकडा नऊवर पोहोचला असून, ढिगाऱ्याखाली आणखी काही जण अडकल्याची भीती आहे. एका जखमी मुलाची सुखरूप सुटका करण्यात आली असून त्याच्यावर रुग्णालयात उपचार सुरू आहेत. मृतांचे मृतदेह शवविच्छेदनासाठी शासकीय रुग्णालयात पाठविण्यात आले आहेत.