भिवंडी : भिवंडी शहरातील चाविंद्रा-रामनगर येथील डंपिंग ग्राऊंडवर स्थानिक नागरिकांनी कचरा टाकण्यास विरोध कायम ठेवल्याने शहरातील कचराकोंडी पाचव्या दिवशीही कायम राहिली आहे. शहरातील विविध भागांत कचऱ्याचे ढीग साचल्याने दुर्गंधी पसरली असून नागरिकांच्या आरोग्याचा प्रश्नही गंभीर बनला आहे. या पार्श्वभूमीवर महापालिका प्रशासनाने पोलीस बंदोबस्तात डंपिंग ग्राऊंडवर कचरा टाकण्याचा निर्णय घेतला असून, आवश्यक पोलीस संरक्षण मिळताच ही प्रक्रिया सुरू करण्यात येणार असल्याची माहिती पालिका प्रशासनाने दिली.
शनिवार, ११ जुलै रोजी चाविंद्रा-रामनगर डंपिंग ग्राऊंडवर कचरा टाकण्यासाठी आलेल्या डंपरच्या धडकेत तीन वर्षीय शनाया अब्दुल हक या चिमुरडीचा दुर्दैवी मृत्यू झाला होता. या घटनेनंतर संतप्त नागरिकांनी डंपिंग ग्राऊंडवरील पालिकेची कॅबिन आणि एक डंपर जाळून निषेध व्यक्त केला. त्यानंतर स्थानिकांनी डंपिंग ग्राऊंडवर कचरा टाकण्यास पूर्णपणे मज्जाव केला.
गुरुवारी सकाळीही कचरा घेऊन आलेली वाहने स्थानिकांनी परत पाठवल्याची माहिती समोर आली. मंगळवारी झालेल्या बैठकीत स्थानिक नगरसेवक रोहिदास वाघमारे यांनी मृत चिमुकलीच्या कुटुंबीयांना योग्य नुकसानभरपाई देण्याची, नादुरुस्त कचरा वाहतूक करणारी वाहने तातडीने बंद करण्याची, प्रत्येक वाहनावर चालकासोबत क्लिनर नियुक्त करण्याची तसेच डंपिंग ग्राऊंडची क्षमता संपल्याने ते कायमस्वरूपी बंद करण्याची मागणी केली.
दरम्यान, महापालिका प्रशासनाने ग्रामीण पोलीस ठाण्याकडे अतिरिक्त पोलीस बंदोबस्ताची मागणी केली आहे. पोलिस संरक्षण उपलब्ध होताच कचरा डंपिंग ग्राऊंडवर टाकण्यास सुरुवात केली जाईल, असे पालिका सूत्रांनी स्पष्ट केले.