ठाणे : कल्याण-डोंबिवली पालिकेच्या शास्त्रीनगर रुग्णालयातील डॉक्टरांवर झालेल्या प्राणघातक हल्लाप्रकरणी ठाणे पोलिसांनी मुख्य आरोपी असलेले शिवसेना नगरसेवक रमेश म्हात्रे आणि इतर चार आरोपींविरुद्ध कल्याण जिल्हा व सत्र न्यायालयात गुरुवारी आरोपपत्र दाखल केले. या आरोपपत्रात नगरसेवक रमेश म्हात्रे यांच्यासह रमेश पवार, प्रमोद निकम, अक्षय करंडे आणि साधना करंडे यांची नावे समाविष्ट करण्यात आली आहेत.
६ जुलै रोजी एका महिला रुग्णावर वेळेत उपचार झाले नाहीत, असा आरोप करत नगरसेवक रमेश म्हात्रे आणि त्यांच्या सहकाऱ्यांनी शास्त्रीनगर रुग्णालयात गर्दी जमवून तेथील डॉक्टरांना आणि वैद्यकीय कर्मचाऱ्यांना अमानुष मारहाण केली होती. ठाणे पोलिसांनी या प्रकरणात सखोल तपास करून साक्षीदारांचे जबाब, प्रत्यक्षदर्शी डॉक्टर, परिचारिका आणि सीसीटीव्ही फुटेजच्या आधारे सबळ पुरावे गोळा करून हे आरोपपत्र न्यायालयात सादर केले आहे.
आत्मसमर्पणानंतर म्हात्रे यांची कल्याणच्या आधारवाडी मध्यवर्ती कारागृहात रवानगी करण्यात आली. २० दिवसांनंतर ७ ऑगस्ट रोजी उच्च न्यायालयाने त्यांना कडक अटींवर जामीन मंजूर केला. या अटींनुसार, आरोपींना महाराष्ट्राबाहेर हद्दपार करण्यात आले असून म्हात्रे आणि इतर ३ पुरुष आरोपी सध्या गोव्यातील अंजुना येथील एका रिसॉर्टमध्ये राहत आहेत. न्यायालयात दोषारोप निश्चित होईपर्यंत त्यांना महाराष्ट्रात प्रवेशास मनाई आहे. या प्रकरणातील महिला आरोपी साधना करंडे ही अटकेनंतरपासून कल्याणच्या आधारवाडी कारागृहातच आहे.