Thane : पाणीप्रश्नावर ठेकेदारांची ‘मस्ती’; कामे अर्धवट ठेवणाऱ्यांना काळ्या यादीत टाकण्याची मागणी, नगरसेवकांचा सभागृहात संताप 
ठाणे

Thane : पाणीप्रश्नावर ठेकेदारांची ‘मस्ती’; कामे अर्धवट ठेवणाऱ्यांना काळ्या यादीत टाकण्याची मागणी, नगरसेवकांचा सभागृहात संताप

शहरात पाण्यासाठी ठाणेकरांची वणवण सुरू असताना कोट्यवधींच्या अमृत आणि नगरुत्थान योजनेतील कामे मात्र ठेकेदारांच्या मनमानीमुळे रखडल्याचा संताप महापालिकेच्या सभागृहात सोमवारी उसळला.

Swapnil S

ठाणे : शहरात पाण्यासाठी ठाणेकरांची वणवण सुरू असताना कोट्यवधींच्या अमृत आणि नगरुत्थान योजनेतील कामे मात्र ठेकेदारांच्या मनमानीमुळे रखडल्याचा संताप महापालिकेच्या सभागृहात सोमवारी उसळला. कुठे २३ तासांनी पाणी येते, तर कुठे केवळ १० ते १५ मिनिटेच पुरवठा होतो. काही भागांत गढूळ पाणी, तर अनेक इमारतींना अद्याप पाण्याची जोडणीच नाही. १०० मीटरचे काम पूर्ण करण्यासाठी चार महिने लावले जातात, तरीही प्रशासन ठेकेदारांवर कारवाई करत नाही, असा सवाल नगरसेवकांनी उपस्थित केला.

काम करत नसलेल्या ठेकेदारांची बिले थांबवा, काम काढून घ्या आणि काळ्या यादीत टाका, अशी मागणी करत नगरसेवकांनी प्रशासनाला धारेवर धरले. विशेष म्हणजे, सभागृह नेते हणमंत जगदाळे यांनीही काम पूर्ण होईपर्यंत बिले अदा करू नयेत, अशी भूमिका घेतली.

२०० कोटींची कामे; गुणवत्ता मात्र ‘रामभरोसे’?

नगरसेवक सुधीर भगत यांनी नगरुत्थान योजनेतील कामांच्या पद्धतीवरच प्रश्नचिन्ह उपस्थित केले. सुमारे २०० कोटींची कामे देण्यात आली असून एकाच कंपनीला मोठ्या प्रमाणावर कामे दिल्याने तिची यंत्रणा अपुरी पडत आहे. त्यामुळे मनुष्यबळ व यंत्रणा कमी पडत असून गुणवत्तेचा बोजवारा उडल्याचा आरोप त्यांनी केला. नगरसेवक रमाकांत मढवी यांनी दिवा भागातील नगरुत्थानची कामे अद्याप अपूर्ण असल्याचे सांगितले. ठेकेदार काम करत नसेल तर त्याच्यावर कारवाई करा; ठेकेदाराच्या निष्क्रियतेमुळे पालिकेची बदनामी होत असल्याचे ते म्हणाले. त्यामुळे त्याला काळ्या यादीत टाकावे अशी मागणी केली.

२३ तासांनी पाणी; १० मिनिटांत नळ कोरडा!

कांचन चिंदरकर यांनी २३ तासांनी पाणी येते आणि केवळ १० ते १५ मिनिटे पुरवठा होतो. नागरिकांना जागरण करून पाणी भरावे लागते, अशी व्यथा त्यांनी मांडली. मालती पाटील यांनी कोळीवाडा भागात कमी पाणी येत असल्याचे सांगितले. नंदा पाटील यांनी कमी दाबाने पाणीपुरवठा होत असल्याचा आरोप केला. विमल भोईर यांनी ठाण्यातील पाणीप्रश्न गंभीर असल्याचे स्पष्ट केले.

दिव्यात गढूळ पाणी

दिव्यात पाणीप्रश्न दिवसेंदिवस गंभीर होत असल्याचा मुद्दा अर्चना पाटील आणि शैलेश पाटील यांनी मांडला. गढूळ पाणीपुरवठा होत असताना नागरिकांच्या आरोग्याशी खेळ सुरू आहे, असा संताप व्यक्त करत संबंधित ठेकेदाराला काळ्या यादीत टाकण्याची मागणी करण्यात आली. उद्धव सेनेचे नगरसवेक शहाजी खुस्पे यांनीही महिनाभरापूर्वी पाण्यासाठी मोर्चा काढूनही परिस्थितीत बदल झालेला नसल्याचे सांगितले. अमृत-१ आणि अमृत-२ची कामे सुरू असूनही पाणीटंचाई आणि गढूळ पाण्याचा प्रश्न कायम असल्याचे त्यांनी सांगितले.

(इंग्रजी बातमी वाचण्यासाठी येथे क्लिक करा.)

महालक्ष्मी रेसकोर्सखाली भूमिगत पादचारी मार्ग; वरळीतील सायन्स सेंटर मेट्रो स्थानक ते सागरीकिनारा मार्गाच्या विहारपथापर्यंत जोडणी

Mumbai : चर्चगेट येथील मुलींच्या हॉस्टेलमधील पाणीटंचाईची हायकोर्टाकडून दखल; महापालिका आणि विद्यापीठाला नोटीस

Vasai : शासकीय ‘बसीन’ हे नाव बदलून ‘वसई’ करावे! वेदमूर्ती धनंजयशास्त्री वैद्य यांनी दिला नामकरणाचा प्रस्ताव

Mumbai : गणेश मूर्तिकारांना पर्यावरणपूरक रंगांचे वाटप; तीन हजार लिटर कलरचे वितरण

ठाण्यात तीन तडीपार गुन्हेगारांना घेतले ताब्यात