शंकर जाधव/डोंबिवली
डोंबिवली पश्चिमेकडील पालिकेच्या शास्त्रीनगर रुग्णालयात प्रसूतिदरम्यान मृत्यू झाल्याची घटना गुरुवारी घडली. या प्रकरणी कुटुंबीयांनी रुग्णालयातील डॉक्टरांच्या हलगर्जीपणा असल्याचा आरोप केला आहे. या घटनेनंतर दुसऱ्या दिवशी शुक्रवारी शास्त्रीनगर रुग्णालयाच्या आवारात महिलेचे पती व नातेवाईकांना ठिय्या आंदोलन केले. याची दखल घेत सर्वच पक्षाच्या पदाधिकाऱ्यांनी आक्रमता दाखवत रुग्णालय व्यवस्थापनाला जाब विचारला.
डोंबिवली पश्चिमेकडील मोठा गाव येथील सुवर्णा सरोदे यांना ११ फेब्रुवारी रोजी प्रसूतिसाठी महापालिकेच्या शास्त्रीनगर रुग्णालयात दाखल करण्यात आले होते. त्यांचा प्रसूतिदरम्यान मृत्यू झाल्याची घटना घडली होती. शास्त्रीनगर रुग्णालयात त्यांच्यावर उपचार सुरू असताना रक्तस्राव वाढल्याने त्यांना प्राण गमवावे लागले. मात्र, त्यांच्या कुटुंबीयांनी डॉक्टरांवर हलगर्जीपणाचा आरोप केला आहे. या घटनेनंतर दुसऱ्या शुक्रवारी महिलेचे पती व नातेवाईकांनी शास्त्रीनगर रुग्णालयाच्या आवारात ठिय्या आंदोलन केले. याप्रकरणी पोलीस ठाण्यात गुन्हा का दाखल केला जात नाही, असा प्रश्न नातेवाईकांनी उपस्थित केला आहे.
याप्रकरणी शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे पक्षाच्या कल्याण जिल्हाप्रमुख दीपेश म्हात्रे, महिला पदाधिकारी वैशाली दरेकर, अभिजीत सावंत आदीसह अनेक पदाधिकारी व शिवसैनिक तसेच महाराष्ट्र नवनिर्माण सेनेचे डोंबिवली शहर अध्यक्ष राहुल कामत, श्रद्धा किरवे आदी मनसैनिक व वंचितचे पदाधिकाऱ्यांनी महिलेच्या कुटुंबीयांची भेट घेत मुख्य वैद्यकीय अधिकारी डॉ. दीपा शुक्ला यांची भेट घेतली. याप्रकरणी चौकशी करण्याची लेखी हमी प्रशासनामार्फत देण्यात आले आहे.
समितीमार्फत चौकशी
याप्रकरणी वैद्यकीय स्तरावर ठाणे जिल्हा शल्यचिकित्सक यांच्या अध्यक्षतेखाली समिती तयार करून समितीमार्फत चौकशी करण्यात येईल. प्रशासकीय त्रुटीबाबत पालिका स्तरावर चौकशी समिती बनवून शनिवारी ठाणे जिल्हा शल्यचिकित्सक पथक शास्त्रीनगर रुग्णालयात भेट देऊन चौकशी करतील. या घटनेची चौकशीअंती जे कोणी दोषी आढळतील त्यांच्या विरोधात फौजदारी कारवाई करण्यात येईल, असे पत्रात नमूद करण्यात आले आहे.