ठाणे : ठाणे महापालिकेच्या महासभेत झालेल्या गोंधळावरून राजकीय वातावरण चांगलेच तापले असून उपमहापौरांविरोधात थेट शिस्तभंग कारवाईची मागणी करण्यात आली आहे. शिंदे सेनेचे नगरसेवक विकास रेपाळे यांनी महापौरांकडे लेखी निवेदन देत उपमहापौरांनी महासभेत अध्यक्षीय अधिकारांचा अवमान करत सभागृहाचे कामकाज मुद्दाम विस्कळीत करण्याचा प्रयत्न केल्याचा गंभीर आरोप केला आहे.
१५ मे रोजी पार पडलेल्या महासभेत महापौर अध्यक्षस्थानी असतानाही उपमहापौरांनी परवानगी न घेता वारंवार हस्तक्षेप केल्याचा आरोप निवेदनात करण्यात आला आहे. ‘सभा उधळून लावू’, ‘सभागृह चालू देणार नाही’ अशा धमकीवजा भाषेचा वापर करत लोकशाही प्रक्रियेलाच आव्हान दिल्याचे रेपाळे यांनी म्हटले आहे. महापौरांनी स्पष्ट निर्देश दिल्यानंतरही आदेशाचे पालन करण्यात आले नसल्याने हा प्रकार केवळ गोंधळ नसून अध्यक्षीय अधिकारांवर थेट हल्ला असल्याचा आरोपही करण्यात आला आहे.
उपमहापौरांसारख्या जबाबदार पदावरील व्यक्तीकडूनच सभागृह नियमांचे उल्लंघन होत असल्याने चुकीचा आणि धोकादायक पायंडा पडत असल्याची टीका निवेदनातून करण्यात आली आहे. महासभा मुद्दाम ठप्प करण्याचा प्रयत्न झाला असून हा प्रकार पूर्वनियोजित असल्याचा संशयही व्यक्त करण्यात आला आहे.
रेपाळे यांनी महापौरांकडे पाच प्रमुख मागण्या करत या प्रकरणाची अधिकृत इतिवृत्तात नोंद करणे, व्हिडीओ फुटेज आणि ध्वनिमुद्रणांची चौकशी करणे, संबंधितांवर तत्काळ शिस्तभंग कारवाई करणे तसेच भविष्यात अशा प्रकारच्या वर्तनावर निलंबनासह कठोर कारवाईचा इशारा देण्याची मागणी केली आहे.
महासभेतील या आरोपांमुळे महायुतीतील अंतर्गत संघर्ष पुन्हा उघड्यावर आला असून ठाणे महापालिकेतील सत्ताधाऱ्यांमध्येच संघर्ष तीव्र झाल्याची चर्चा राजकीय वर्तुळात सुरू झाली आहे.