कोकणासाठी ‘धर्मवीर आनंद दिघे एक्स्प्रेस’ची मागणी; ठाण्यात अतिरिक्त आरक्षण खिडक्या सुरू करण्याचाही आग्रह 
ठाणे

कोकणासाठी ‘धर्मवीर आनंद दिघे एक्स्प्रेस’ची मागणी; ठाण्यात अतिरिक्त आरक्षण खिडक्या सुरू करण्याचाही आग्रह

आगामी गणेशोत्सव २०२६ च्या पार्श्वभूमीवर कोकणात जाणाऱ्या लाखो चाकरमान्यांच्या रेल्वे प्रवासाचा प्रश्न ऐरणीवर आला असून, ठाणे लोकसभेचे खासदार नरेश म्हस्के यांनी रेल्वे प्रशासनाकडे विविध महत्त्वपूर्ण मागण्या लावून धरल्या आहेत.

Swapnil S

ठाणे : आगामी गणेशोत्सव २०२६ च्या पार्श्वभूमीवर कोकणात जाणाऱ्या लाखो चाकरमान्यांच्या रेल्वे प्रवासाचा प्रश्न ऐरणीवर आला असून, ठाणे लोकसभेचे खासदार नरेश म्हस्के यांनी रेल्वे प्रशासनाकडे विविध महत्त्वपूर्ण मागण्या लावून धरल्या आहेत.

ठाणे रेल्वे आरक्षण केंद्रात अतिरिक्त आरक्षण खिडक्या सुरू करणे, ठाणे ते सावंतवाडी दरम्यान विशेष ‘धर्मवीर आनंद दिघे एक्स्प्रेस’ सुरू करणे, सावंतवाडी रेल्वे टर्मिनसचे रखडलेले काम पूर्ण करणे, सावंतवाडी स्थानकाचा ‘अमृत भारत स्टेशन योजना’ आणि ‘पीएम गति शक्ती नॅशनल मास्टर प्लॅन’मध्ये समावेश करणे तसेच अनेक लांब पल्ल्याच्या गाड्यांना सावंतवाडी येथे थांबा मंजूर करणे, अशा विविध मागण्या त्यांनी मध्य रेल्वे प्रशासनाकडे केल्या आहेत. याबाबत खासदार नरेश म्हस्के यांनी मध्य रेल्वेचे महाप्रबंधक, मुंबई विभागीय रेल्वे प्रशासन तसेच केंद्रीय रेल्वेमंत्री अश्विनी वैष्णव यांच्याकडे विविध स्तरांवर निवेदने सादर केली आहेत.

गणेशोत्सव हा महाराष्ट्राचा महासण मानला जातो. दरवर्षी मुंबई, ठाणे आणि मुंबई महानगर प्रदेशातील लाखो कोकणी चाकरमानी आपल्या मूळ गावी कोकणात जात असतात. यंदा गणेशोत्सव १४ सप्टेंबरपासून सुरू होत असून, त्यासाठीचे ६० दिवस आधीचे आगाऊ रेल्वे आरक्षण ११ जुलै ते ३० जुलै या कालावधीत होणार आहे. या काळात रेल्वे आरक्षण केंद्रांवर प्रचंड गर्दी होत असल्याने प्रवाशांना मोठ्या त्रासाला सामोरे जावे लागते. ही बाब लक्षात घेऊन ठाणे रेल्वे आरक्षण केंद्रात सध्या सुरू असलेल्या खिडक्यांव्यतिरिक्त किमान दोन अतिरिक्त आरक्षण खिडक्या सुरू करण्यात याव्यात, अशी मागणी खासदार म्हस्के यांनी केली आहे.

दरम्यान, गणेशोत्सव काळात नियमित गाड्यांवरील प्रचंड ताण लक्षात घेता ठाणे ते सावंतवाडी दरम्यान विशेष ‘धर्मवीर आनंद दिघे एक्स्प्रेस’ सुरू करण्याची आग्रही मागणीही खासदार म्हस्के यांनी केली आहे. सावंतवाडी टर्मिनस प्रकल्पाचा ‘पीएम गति शक्ती नॅशनल मास्टर प्लॅन’मध्ये समावेश करण्यात यावा, अशी मागणी करतानाच सावंतवाडी रेल्वे स्थानकाला ‘अमृत भारत स्टेशन योजना’त स्थान देण्याची मागणीही त्यांनी केली आहे. सावंतवाडी स्थानकातून दररोज सुमारे ४ लाख ८८ हजार ९२० इतके तिकीट उत्पन्न मिळते. त्यातील तब्बल ९५ टक्के उत्पन्न ५०० किलोमीटरपेक्षा अधिक अंतराच्या प्रवासातून मिळत असल्याने या स्थानकाचे व्यावसायिक महत्त्व अधोरेखित होते, असे त्यांनी नमूद केले.

सावंतवाडी येथे थांबा द्यावा

या पार्श्वभूमीवर १२४३१/३२ राजधानी एक्स्प्रेस, १२२०१/०२ गरीब रथ एक्स्प्रेसचे कोविड काळात बंद झालेले थांबे पुन्हा सुरू करावेत, १२१३३/३४ सीएसएमटी-मंगळुरू एक्स्प्रेस, २२२२९/३० मुंबई-मडगाव वंदे भारत एक्स्प्रेस, १२४४९/५० गोवा संपर्क क्रांती एक्स्प्रेस, २२६५५/५६ एर्नाकुलम-निजामुद्दीन एक्स्प्रेस आणि २२६५३/५४ तिरुवनंतपुरम-निजामुद्दीन एक्स्प्रेस या गाड्यांना सावंतवाडी येथे थांबा मंजूर करावा, अशी मागणीही खासदार नरेश म्हस्के यांनी केली आहे.

इबोलाच्या धोक्यामुळे मुंबई पालिका अलर्ट मोडवर; निवासी डॉक्टरांना मार्गदर्शक सूचना जारी

मुंबईतील १० जिमखान्यांची होणार काटेकोर तपासणी; शासकीय जमिनीवरील जिमखान्यांच्या भाडेकरारासंदर्भात मोहीम

रस्ते अपघातातील जखमींसाठी 'एअर ॲम्ब्युलन्स' सेवा; परिवहन विभागाचा उच्चाधिकार समितीला प्रस्ताव

सत्ताधारी पक्षावर पुन्हा नामुष्की; मुंबई महापालिकेच्या सुधार समितीत प्रस्ताव मागे घेण्याची वेळ

Bhiwandi : पावसाळ्यापूर्वी भिवंडी-वाडा रस्त्याची एक मार्गिका सुरू होणार