उल्हासनगर : उल्हासनगर महानगरपालिकेने थकीत मालमत्ताकर वसुलीमध्ये नव्या आणि परिणामकारक पद्धतींचा अवलंब केला आहे. नियमित वॉरंट आणि नोटिसा यांनाही जुमानत नसलेल्या मोठ्या थकबाकीदारांना यंदा ढोल-ताशांच्या गजरात जनजागृतीच्या अनोख्या मोहिमेचा सामना करावा लागत आहे. शहरातील वसुली मोहिमेत आवाजाच्या गजरातून जनतेला कर भरण्याचे महत्त्व पटवून देण्यासाठी महापालिकेने हा अभिनव प्रयोग सुरू केला आहे, जो शहरात चर्चेचा विषय ठरत आहे.
२६ डिसेंबर २०२४ रोजी युनिट क्रमांक १ ते ४ मध्ये महापालिकेच्या मालमत्ता कर विभागाने मोठ्या थकबाकीदारांविरुद्ध कठोर कारवाई केली. यामध्ये ढोल-ताशांच्या गजरात ध्वनिक्षेपकाद्वारे त्यांच्या थकीत कराची सविस्तर माहिती जाहीर करण्यात आली. वेळोवेळी वॉरंट आणि नोटीस देऊनही कर न भरणाऱ्या थकबाकीदारांना कर भरण्याचे आवाहन करण्यात आले.
उल्हासनगर महापालिकेच्या या कारवाईमुळे एकीकडे नागरिकांमध्ये जनजागृती झाली आहे, तर दुसरीकडे थकबाकीदारांवर दबाव निर्माण झाला आहे. या मोहिमेमुळे अनेक नागरिकांनी त्वरित कर भरण्याचा निर्णय घेतला, असे महापालिकेच्या अधिकाऱ्यांनी सांगितले. सदर मोहीम आयुक्त तथा प्रशासक विकास ढाकणे यांच्या आदेशानुसार आणि अतिरिक्त आयुक्त जमीर लेंगरेकर यांच्या मार्गदर्शनाखाली पार पडली. कर निर्धारक व संकलक निलम कदम, उप कर निर्धारक सचिन वानखेडे, मनोज गोकलानी, तसेच कर निरीक्षक आणि कर्मचारी यांनी या मोहिमेत सक्रिय सहभाग घेतला.
महापालिकेने नागरिकांना यापूर्वीच वारंवार वॉरंट नोटीस पाठवून कर भरण्याचे आवाहन केले होते. मात्र, काही थकबाकीदारांनी दुर्लक्ष केल्याने त्यांच्यावर ही कठोर कारवाई करण्यात आली आहे. महापालिकेच्या या मोहिमेमुळे शहरात शिस्त आणि जबाबदारीची भावना निर्माण होत असून, याचा लाभ शहराच्या विकासाला होईल, अशी अपेक्षा व्यक्त होत आहे. उल्हासनगर महापालिकेच्या या नावीन्यपूर्ण मोहिमेने ठिकठिकाणी चर्चेला उधाण आले आहे.
आपल्या थकीत मालमत्ताकराचा भरणा त्वरित करावा आणि महापालिकेच्या पुढील कठोर कारवाईपासून बचाव करावा. ३१ डिसेंबर २०२४ नंतर कर भरणा न करणाऱ्या थकबाकीदारांवर नियमानुसार कठोर कारवाई करण्यात येणार आहे. थकीत कर भरण्यासाठी महापालिकेच्या अधिकृत काऊंटरवर भेट द्या किंवा महापालिकेच्या वेबसाइटद्वारे ऑनलाईन भरणा करा. अधिक माहितीसाठी महापालिकेच्या कर विभागाशी संपर्क साधावा.
- निलम कदम, महिला अधिकारी