ठाणे

ठाण्यातील तलावपाळीत दिवाळी पहाट शिंदे गटाचीच; शिवसेनाचा ठाकरे गटाला दणका

प्रतिनिधी

शिवाजी पार्कवरील दसऱ्या मेळाव्याची परवानगी ठाकरे गटाला उच्च न्यायालयाने दिली होती, तर आता तलावपाळी येथे होणाऱ्या दिवाळी पहाटसाठी ठाकरे गटाचा अर्ज फेटाळत शिंदे गटाला परवानगी दिली असल्याने बुधवारी बाळासाहेबांची शिवसेनेच्यावतीने ठाण्यातील आनंद आश्रमात आनंदोत्सव साजरा करण्यात आला.

दसरा मेळाव्यासाठी शिवतीर्थ मिळवण्यात न्यायालयात बाजी मारलेल्या उद्धव सेनेला ठाण्यातील दिवाळी पहाटच्या आयोजनाबाबत उच्च न्यायालयाने चपराक लगावली आहे. मुंबई उच्च न्यायालयाने उद्धव सेनेची (ठाकरे गट) याचिका फेटाळल्याने ठाण्यातील तलावपाळी येथे बाळासाहेबांच्या शिवसेनेला (शिंदे गट) दिवाळी पहाटच्या कार्यक्रमाचे आयोजन करण्याचा मार्ग मोकळा झाला आहे. ठाण्यातील दिवाळी पहाट कार्यक्रमाच्या निमित्ताने शिवसेनेच्या दोन्ही गटात वाद धुमसत होता. उद्धव गटाचे खा. राजन विचारे यांनी आरोपांची राळ उठवून थेट न्यायालयात धाव घेतली होती. यावर शिवसेना प्रवक्ते नरेश म्हस्के यांनी खा. विचारे यांना, सक्रिय शिवसैनिक तुमच्यासोबत नसल्याचा टोला लगावत आत्मपरिक्षण करण्याचा सल्ला दिला आहे.

या पार्श्वभुमीवर ठाणे महापालिकेने दिवाळी पहाटसाठी दोन्ही गटास परवानगी दिली असली तरी पोलिसांनी मात्र दोन्ही गटांना परवानगी दिली नव्हती. त्यामुळे खा. विचारे यांनी मध्यंतरी मागील तारखेचा अर्ज देऊन दडपशाही सुरू असल्याचा आरोप शिंदे गटावर केला होता.तसेच न्यायालयातही दाद मागितली होती. मात्र न्यायालयाने ठाकरे गटाची याचिका फेटाळून बाळासाहेबांच्या शिवसेनेला दिवाळी पहाटचा कार्यक्रम करण्यास परवानगी दिली आहे.

या याचिकेवर न्यायमूर्ती रमेश धनुका आणि न्यायमूर्ती कमल खाता यांच्या खंडपीठासमोर सुनावणी झाली. यावेळी ठाणे महापालीकेच्यावतीने अ‍ॅड. राम यांनी या कार्यक्रमासाठी शिंदे गटाने १९ सप्टेंबर रोजी परवानगी मागत अर्ज केला होता, तर ठाकरे गटाने ३ ऑक्टोबर रोजी अर्ज केला होता. त्यामुळे पहिला अर्ज करणा-या शिंदे गटाला आवश्यक त्या परवानग्या घेण्यास सांगण्यात आल्याचे स्पष्ट केले. तर शिंदे गटाने आम्हीच या ठिकाणी वर्षानुवर्षे दिवाळी पहाट आयोजित करत आलो आहोत, असा दावा केला. याची गंभीर दखल खंडपीठाने घेतली. आम्हाला तुमच्या गटा तटाच्या राजकारणात रस नाही असे स्पष्ट करत पालिकेने शिंदे गटाला दिलेल्या परवानगवर शिक्कामोर्तब करून ठाकरे गटाच्या विचारे यांची याचिका फेटाळून लावली.

कांदा निर्यातबंदी उठवली! ४० टक्के निर्यातकरामुळे शेतकऱ्यांमध्ये असंतोष कायम

भारतीय नौदल बांधणार ‘एआयपी’ तंत्रज्ञानाने पाणबुड्या; ६० हजार कोटींचा प्रकल्प!

एच. डी. रेवण्णा एसआयटीच्या ताब्यात,राहुल गांधी यांचे कर्नाटकच्या मुख्यमंत्र्यांना पत्र!

"तर पवारांची औलाद सांगायचो नाही..." उदयनराजेंच्या प्रचारसभेत अजित पवार नेमकं काय म्हणाले?

Terrorist Attack in Jammu Kashmir: जम्मू-काश्मीरच्या पूंछमध्ये हवाई दलाच्या वाहनावर हल्ला; एक जवान शहीद, चार जखमी!