डोंबिवली : डोंबिवली रेल्वे स्थानकात मंगळवारी सकाळी वातानुकूलित लोकलचे दरवाजे गर्दीमुळे बंद होत नसल्याचा प्रकार घडला.
सध्या उकाडा असल्याने प्रवासी वातानुकूलित लोकलला पसंती देत आहेत. डोंबिवलीत मुंबई छत्रपती शिवाजी टर्मिनसला जाणारी जलद लोकल आली असता प्रवाशांनी नेहमीप्रमाणे लोकलमध्ये चढण्यासाठी गर्दी केली. डबा प्रवाशांनी खचाखच भरून गेल्यावरही अनेक प्रवासी वातानुकूलित डब्यात चढण्यासाठी प्रयत्नशील होते. त्यामुळे वातानुकूलित लोकलचे दरवाजे बंद होण्यास अडथळा येत होता. दरवाजे बंद होण्याचा पिवळे दिव्यांचा इशारा वाजू लागल्यानंतरही लोकलचे दरवाजे बंद होत नव्हते.
एकही प्रवासी दरवाजातून बाहेर हटण्यास तयार नव्हता. त्यामुळे दरवाजा बंद होण्यात अडथळे येत होते. अखेर फलाटावरील रेल्वे सुरक्षा बलाच्या जवानांनी दरवाजातील काही प्रवाशांना आत दाबून लोटले, तर दरवाजात लोंबकळत असणाऱ्या काही प्रवाशांना दरवाजातून खेचून फलाटावर उतरविले.