डोंबिवलीतील खंबाळपाडा परिसरात सोमवारी (दि. २९) मध्यरात्री हृदयद्रावक घटना घडली. ३ वर्षांची चिमुकली प्राणवी भोईर आणि तिची अवघ्या २४ वर्षांची मावशी श्रुती ठाकूर या दोघींचा सर्पदंशाने दुर्दैवी मृत्यू झाला. नातेवाइकांनी या प्रकरणी KDMC रुग्णालय प्रशासनाने हलगर्जीपणा केल्याचा आरोप केला आहे.
रात्रीच्या झोपेत काळाने घातला घाला
आजदे गावातील विक्की भोईर यांची पत्नी चिमुकल्या प्राणवीसोबत माहेरी गेली होती. रात्री प्राणवी ही मावशी श्रुतीसोबत झोपली होती. झोपेतच तिला अचानक साप चावला. प्राणवी जोरजोराने रडू लागली, मात्र नेमकं काय झालं हे सुरुवातीला कुणालाच कळलं नाही. काही क्षणांतच त्याच सापाने श्रुतीलाही दंश केला. तेव्हा दोघींनाही सर्पदंश झाल्याचं स्पष्ट झालं.
श्रुतीचं पुढील महिन्यात होतं लग्न
कुटुंबीयांनी तत्काळ दोघींना KDMC च्या शास्त्रीनगर रुग्णालयात दाखल केलं. डॉक्टरांनी सुरुवातीला त्यांची प्रकृती स्थिर असल्याचं सांगितलं. पण, काही तासांतच प्राणवीची तब्येत अचानक बिघडली. पुढील उपचारासाठी तिला ठाण्याच्या सिव्हिल रुग्णालयात हलवण्यात आलं, मात्र तिथेच तिचा मृत्यू झाला. दरम्यान, श्रुतीला एका खासगी रुग्णालयात दाखल करण्यात आलं. अँटी-स्नेक व्हेनम देऊनही उपचारादरम्यान तिची प्राणज्योत मालवली. श्रुतीचं पुढील महिन्यात लग्न होणार होतं, त्यामुळे या मृत्यूमुळे तिच्या कुटुंबावर शोककळा पसरली आहे.
संतापलेल्या नातेवाईकांचा आक्रोश
या दुहेरी मृत्यूला नातेवाईक आणि स्थानिकांनी KDMC रुग्णालय प्रशासनाला जबाबदार ठरवले आहे. त्यांनी वेळेत अँटी-स्नेक डोस देण्यात उशीर केला, प्राथमिक उपचारांमध्ये हलगर्जीपणा केला आणि आवश्यक सुविधा नसल्यामुळेच दोन जीव गमावले असे आरोप केले आहेत. संतप्त नागरिक आणि नातेवाईकांनी थेट मुख्य वैद्यकीय अधिकारी डॉ. दीपा शुक्ल यांच्या दालनात ठिय्या आंदोलन सुरू केले आणि जबाबदार डॉक्टरांवर कारवाईची मागणी केली.
या प्रकरणावर प्रतिक्रिया देताना डॉ. शुक्ल म्हणाल्या, दोन्ही रुग्णांवर आवश्यक उपचार करण्यात आले. अँटी-व्हेनम इंजेक्शन दिलं होतं. मात्र, प्रकृती गंभीर झाल्याने प्राणवीला ठाण्यात हलवण्यात आलं. नातेवाईकांच्या आरोपांची चौकशी केली जाईल आणि आवश्यक ती कारवाई केली जाईल.
अवघ्या तीन वर्षांची चिमुकली आणि विवाहाच्या उंबरठ्यावर असलेली तरुणी अशा दोन जिवांचा सर्पदंशामुळे घेतलेला बळी डोंबिवलीकरांसाठी मोठा धक्का ठरला आहे. खंबाळपाडा परिसरात हळहळ व्यक्त होत आहे.