ठाणे

ठाण्यात महायुतीच्या रॅलीत राडा; दोन टोळ्यांमध्ये झालेल्या राड्यामुळे काही काळ तणाव

ठाणे शहरात शुक्रवारी महायुतीचे उमेदवार नरेश म्हस्के यांचा उमेदवारी अर्ज दाखल करण्याकरिता काढण्यात आलेल्या रॅलीमध्ये अचानक दोन टोळ्यांमध्ये झालेल्या राड्यामुळे काही काळ वातावरण तंग झाले होते.

Swapnil S

ठाणे : ठाणे शहरात शुक्रवारी महायुतीचे उमेदवार नरेश म्हस्के यांचा उमेदवारी अर्ज दाखल करण्याकरिता काढण्यात आलेल्या रॅलीमध्ये अचानक दोन टोळ्यांमध्ये झालेल्या राड्यामुळे काही काळ वातावरण तंग झाले होते. पोलिसांच्या समोर घडलेल्या या प्रकारामुळे पोलीस सतर्क झाले व त्यांनी परिस्थिती आटोक्यात आणण्यासाठी त्वरित दोन्ही टोळ्यांच्या गुंडांची पांगापांग केली.

सिद्धू अभंगे आणि अजय पासी यांच्या दोन टोळ्यांमध्ये पूर्ववैमनस्यातून हा प्रकार घडल्याची प्राथमिक माहिती आहे. रॅलीमध्ये भररस्त्यात हा प्रकार घडल्याने ठाण्यात कायदा-सुव्यवस्थेवर प्रश्नचिन्ह निर्माण झाले आहे.

महायुतीचे उमेदवार नरेश म्हस्के यांनी शुक्रवारी आपला उमेदवारी अर्ज दाखल केला. उमेदवारी अर्ज दाखल करण्यासाठी म्हस्के यांनी मोठे शक्तिप्रदर्शन केले. मात्र, या मिरवणुकीत काही दिवसांपूर्वी शिंदे गटात प्रवेश केलेले अजय पासी आणि यूट्यूब भाई म्हणून प्रसिद्ध असलेला सिद्धू अभंगे हे देखील आपल्या साथीदारांसह या रॅलीत सहभागी झाले होते. हे दोन्ही गुंड कोपरी परिसरातच राहात असून वर्चस्वासाठी या दोन्ही टोळ्यांमध्ये वैमनस्य आहे. त्यामुळे या टोळ्यांमधून विस्तव जात नाही. नरेश म्हस्के यांची रॅली बाजारपेठेतील मराठी ग्रंथ संग्रहालयासमोर आली असतानाच दोन्ही टोळ्यांचे म्होरके एकमेकांसमोर आले. त्यानंतर या दोन्ही टोळ्यांमध्ये चक्क पोलिसांसमोरच जोरदार हाणामारी झाली. एकमेकांचे कपडेदेखील यावेळी फाडण्यात आले. अखेर पोलिसांनी मध्यस्थी करीत या गुंडांची पांगापांग केली. याप्रकरणी अद्याप कोणताही गुन्हा दाखल करण्यात आलेला नाही.

दरम्यान, सिद्धू अभंगे आणि अजय पासी यांच्यावर हाणामारी, अमली पदार्थ बाळगणे, खंडणी, अवैध पद्धतीने शस्त्र बाळगणे आदी गंभीर गुन्हे दाखल आहेत.

उद्या हे गुंड तुमच्या अंगावर येतील - आव्हाड

ज्या गुंडांना गेल्या अडीच वर्षांत राजाश्रय देण्यात आला होता त्यांनीच शिवसेनेच्या रॅलीत टोळीयुद्ध घडविले. हे गुंड कुणाचेच नसतात. आज ते एकमेकांच्या अंगावर गेले; उद्या ते तुमच्या अंगावर आले तर नवल वाटायला नको, अशा शब्दांत राष्ट्रवादी शरद पवार गटाचे आमदार जितेंद्र आव्हाड यांनी शिंदे गटावर जोरदार टीका केली आहे.

आव्हाड यांनी ‘एक्स’वर केलेल्या पोस्टमध्ये म्हटले आहे की, आपण जे पेरतो, तेच उगवत असते. शिवसेनेचे लोकसभेचे उमेदवार आपला अर्ज भरायला जात असताना ज्या गुंडांना गेली अडीच वर्षे राजाश्रय दिला होता, त्या गुंडांच्या टोळ्यांमध्येच भररस्त्यात उघडपणे मारामारी झाली. स्वतः मुख्यमंत्री ज्या पक्षाचे प्रमुख आहेत, ते ज्या शहरात राहतात, त्याच शहरात त्यांच्या पक्षाच्या उमेदवाराच्या मिरवणुकीत टोळीयुद्ध होणार असेल तर हे महाराष्ट्रासाठी लज्जास्पद असल्याचे आव्हाड म्हणाले. पूर्ण महाराष्ट्रात ठाण्याची लाज गेली. माझी खात्री आहे, पोलीस या प्रकरणी कुठलीही कारवाई करणार नाहीत. एखादा गुन्हा असलेल्यांना तडीपार करण्याच्या ऑर्डर काढणाऱ्या पोलिसांचे मला कौतुक वाटते.

ज्या दोन गुंड टोळ्यांमध्ये टोळीयुद्ध झाले त्या टोळ्यांचे म्होरके हे कित्येक खुनाच्या गुन्ह्यांमध्ये आरोपी आहेत. मात्र, त्यांच्यावर कोणत्याही प्रकारची कारवाई होणार नाही. जणू काही ते प्रशासनाचे जावई आहेत. म्हणूनच आपण कोणाला जवळ ठेवतो आणि कोणाला मोठं करतो, याचे भान प्रत्येक राजकीय पक्षाने ठेवायला हवे. आज ते एकमेकांच्या अंगावर गेलेत. कारण ते कुणाचेच नसतात. उद्या ते तुमच्या अंगावर आले तर नवल वाटायला नको, असे आव्हाड यांनी पोस्टमध्ये म्हटले आहे.

Maharashtra Assembly Elections Results 2024 LIVE: महाराष्ट्राचा महानिकाल! एकाच क्लिकवर बघा कल आणि निकाल

अपक्ष, बंडखोरांसाठी रस्सीखेच; महायुती, महाआघाडीत खलबते

राहुल गांधी, खर्गे यांनी माफी मागावी, अन्यथा कारवाईला सामोरे जावे; विनोद तावडे यांची नोटीस

...तोपर्यंत मतमोजणी केंद्र सोडू नका; शरद पवारांचा उमेदवारांना आदेश

झारखंडमध्ये आज मतमोजणी