डोंबिवली : दुष्काळामुळे संकटात सापडलेल्या शेतकरी बांधवांच्या पाठीशी शिवसेना ठामपणे उभी असून, त्यांना या कठीण परिस्थितीतून सावरण्यासाठी सर्वतोपरी मदत करण्यात येईल, अशी ग्वाही उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी दिली. दुष्काळग्रस्त शेतकरी कुटुंबांतील महिलांना शिलाई मशीनचे वाटप, शेतकऱ्यांच्या मुलींच्या विवाहासाठी आर्थिक मदत आणि येत्या दसरा मेळाव्याच्या दिवशी शेतकरी कुटुंबांसाठी दिवाळीचा शिधा घेऊन जाणारे ट्रक रवाना करण्यात येतील, अशी घोषणाही त्यांनी केली. डोंबिवलीतील शारदीय नवरात्रोत्सवाला भेट दिल्यानंतर ते बोलत होते. खासदार डॉ. श्रीकांत शिंदे फाऊंडेशन आणि श्री नवदुर्गा युवा मंडळ यांच्या वतीने डोंबिवलीतील डीएनसी शाळेच्या मैदानावर शारदीय नवरात्रोत्सवाचे आयोजन करण्यात आले आहे.
खासदार डॉ. श्रीकांत शिंदे यांच्या संकल्पनेतून यंदा दांडियाऐवजी भजनसंध्या आणि संगीत कार्यक्रमांना प्राधान्य देण्यात आले आहे. रासरंग दांडिया उत्सवासाठी होणारा खर्च दुष्काळग्रस्त शेतकऱ्यांच्या मदतीसाठी देण्यात येत आहे.
उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी शनिवारी उत्सवस्थळी भेट देऊन देवीचे दर्शन घेतले. दुष्काळाचे संकट दूर होऊन बळीराजाच्या जीवनात सुख-समृद्धी नांदावी, अशी प्रार्थना त्यांनी देवीचरणी केली. शेतकरी कुटुंबांना आर्थिक संकटातून बाहेर काढण्यासाठी समाजातील सर्व घटकांनी एकत्र येऊन मदतीचा हात देण्याची गरजही त्यांनी व्यक्त केली. यावेळी आयोजित भजनसंध्येत कोकणातील विविध भजन मंडळांनी सहभाग घेतला. देवीची भजने, श्री गणेशाची भजने आणि पारंपरिक भक्तिगीतांच्या सादरीकरणामुळे परिसर भक्तिमय झाला.
महाराष्ट्राच्या समृद्ध सांस्कृतिक परंपरेचे जतन करून ती पुढील पिढीपर्यंत पोहोचविण्यासाठी अशा उपक्रमांचे महत्त्व मोठे असल्याचे शिंदे यांनी सांगितले. खासदार डॉ. श्रीकांत शिंदे यांच्या सामाजिक आणि सांस्कृतिक उपक्रमांचे कौतुक करत त्यांनी आयोजकांचे अभिनंदन केले.
बळीराजाच्या सुख-समृद्धीसाठी देवीचरणी गाऱ्हाणे
डोंबिवलीतील नवरात्रोत्सवात दुष्काळग्रस्त शेतकऱ्यांच्या कल्याणासाठी मालवणी भाषेत देवीचरणी गाऱ्हाणे घालण्यात आले. बळीराजावरील संकट दूर होऊन शेतकरी कुटुंबांच्या जीवनात पुन्हा आनंद नांदावा, अशी प्रार्थना करण्यात आली. या उपक्रमातून कोकणच्या लोकपरंपरेसोबतच शेतकऱ्यांप्रति सामाजिक संवेदनशीलतेचे दर्शन घडले.