बदलापूर : बदलापूरला अवकाळी पावसाने जोरदार हजेरी लावली. विजांचा कडकडाट व जोरदार वाऱ्यासह आलेल्या या अवकाळी पावसामुळे वीजपुरवठा खंडित झाला. त्याचबरोबर सुमारे अर्धा तास रेल्वे सेवाही विस्कळीत झाल्याने नागरिकांची एकच तारांबळ उडाली.
सोमवारी (ता.१३) सकाळपासून अधूनमधून वातावरण ढगाळ होत होते. त्यामुळे पाऊस येणार का? असा अंदाज वर्तवला जात होता आणि अखेर दुपारी ३ वाजण्याच्या सुमारास अचानक जोरदार वाऱ्यांसह पावसाला सुरुवात झाली. काळे ढग एकवटल्याने दिवसा अंधारून आले. त्यानंतर पावसाचा जोर आणखी वाढला. अधूनमधून विजांचा कडकडाटही सुरू होता. गेल्या अनेक दिवसांपासून उकाडा वाढलेला असल्याने या पावसामुळे हवेत गारवा निर्माण झाला. त्यामुळे उकाड्याने हैराण झालेल्या नागरिकांना काहीसा दिलासा मिळाला.
मात्र कामानिमित्त वा खरेदीसाठी घराबाहेर पडलेल्या नागरिकांची या पावसाने एकच तारांबळ उडाली. सुमारे तासभर पावसाचा जोर कायम होता. त्यामुळे पावसापासून बचाव करण्यासाठी नागरिकांनी रेल्वे स्टेशन परिसर, रस्त्याजवलील दुकानांच्या शेड, स्कायवॉक आदी मिळेल त्या ठिकाणी आडोसा घेतला. काहींनी रिक्षा पकडून घर गाठणे पसंत केले. तर काहींनी भिजत पावसाचा आनंद घेत घरी जाणे पसंत केले. वांगणी तसेच अंबरनाथ परिसरातही अवकाळी पावसाने हजेरी लावली. बदलापूर व लगतच्या ग्रामीण भागात काही ठिकाणी गारांचा पाऊसही झाला. तसेच काही ठिकाणी इमारतींच्या शेडचे पत्रे उडल्याचेही सांगण्यात येत आहे.