ठाणे

मुसळधार पावसामुळे उल्हासनदी धोक्याची पातळी गाठण्याची शक्यता

गेल्या दोन दिवसांपासून पावसाने चांगला जोर धरला असून गुरुवारी सकाळपासूनच पाऊस सुरू आहे

प्रतिनिधी

गेल्या दोन दिवसांपासून पावसाने दमदार हजेरी लावल्यामुळे बदलापुरातून वाहणारी उल्हासनदी दुथडी भरून वाहू लागली आहे. उल्हासनदीच्या पाण्याची पातळी १५ मीटरपर्यंत पोहचली आहे. पावसाचा जोर असाच कायम राहिल्यास उल्हासनदी धोक्याची पातळी गाठण्याची शक्यता आहे. या पार्श्वभूमीवर नगर परिषद प्रशासन व अग्निशमन दलही सज्ज झाले आहे.

गेल्या दोन दिवसांपासून पावसाने चांगला जोर धरला असून गुरुवारी सकाळपासूनच पाऊस सुरू आहे. त्यामुळे शहरातून वाहणारे नाले भरून वाहू लागले आहेत. तर उल्हासनदीही दुथडी भरून वाहू लागली आहे. उल्हासनदीत पाण्याची पातळी गुरुवारी दुपारी १५ मीटरपर्यंत पोहचली आहे.

पाऊस असाच सुरू राहिल्यास उल्हासनदी १७.५० मीटर ही धोक्याची पातळी गाठण्याची शक्यता आहे. नदीने ही धोक्याची पातळी ओलांडल्यास नदी लगतच्या बॅरेज रोड, रमेश वाडी, हेंद्रेपाडा आदी

सखल भागात पाणी शिरून ते जलमय होत असतात. या पार्श्वभूमीवर कुळगाव बदलापूर नगर परिषदेचे मुख्याधिकारी योगेश गोडसे व उपमुख्याधिकारी विलास जडये यांनी गुरुवारी नदी पात्र परिसराची पाहणी करून अग्निशमन दलाला सज्ज राहण्याचे निर्देश दिले आहेत.

मुंबईसह राज्यातील कबुतरखाने बंद होणार; उद्योग मंत्री उदय सामंत यांची माहिती

बाळ चोरीला गेल्यास रुग्णालयाची नोंदणी रद्द होणार; राज्य सरकारचा निर्णय

आता २४ तास वाळू वाहतूक; GPS, CCTV बसवणे बंधनकारक; महसूल मंत्री चंद्रशेखर बावनकुळे यांची सभागृहात घोषणा

सरकारी यंत्रणा शेतकऱ्यांची मारेकरी! महाराष्ट्रातील शेतकऱ्यांच्या प्रश्नांवर राहुल गांधी आक्रमक

घरांच्या किमती वाढल्याची राज्य सरकारची कबुली