शहापूर : शुक्रवारी (दि. १२) दुपारी सुमारे १२ वाजता कल्याण स्टेशनहून सुटलेल्या गोदान एक्स्प्रेस (गाडी क्र. ११०५५) मध्ये प्रवास करत असताना एका प्रवासी महिलेने धावत्या गाडीतच बाळाला जन्म दिला. घटना कल्याण ते कसारा या मार्गावर घडली असून, आई व बाळ सुखरूप असल्याची माहिती समोर आली आहे.
पनवेल येथील अंशिका प्रिन्स कुमार गौतम (१९) या पती प्रिन्स कुमार श्याम बहादुर गौतम (२३) यांच्यासोबत बोगी क्रमांक बी/२, बर्थ क्रमांक ४५ व ४६ मधून प्रवास करत होत्या. गाडी कल्याण स्टेशनवरून सुटल्यापासून केवळ १०-१५ मिनिटांत त्यांना अचानक प्रसूतीवेदना सुरू झाल्या आणि त्यांनी गाडीतच मुलीला जन्म दिला. यानंतर गाडी कसारा रेल्वे स्टेशनवर आल्यानंतर रेल्वे पोलीस जितेंद्र मोरे आणि विलास पाटील यांनी तत्परतेने पुढाकार घेत आई व बाळाला कसारा प्राथमिक आरोग्य केंद्रात दाखल केले. वैद्यकीय अधिकाऱ्यांनी तपासल्यानंतर दोघेही पूर्णपणे सुरक्षित व स्थिर असल्याचे सांगितले.