कल्याण-डोंबिवली परिसरात बुधवारी संध्याकाळच्या सुमारास मुसळधार पावसाने हजेरी लावली. यामुळे सखल भागात मोठ्या प्रमाणावर पाणी साचायला सुरुवात झाली होती. सकाळी सकाळपासून उन्हाचा कडाका जाणवत होता. तर संध्याकाळी ५ बाजेच्या सुमारास विजेच्या कडकडाटासह जोरदार पावसाला सुरुवात झाली. अचानकपणे पडलेल्या या पावसामुळे नागरिकांची मात्र एकच तारांबळ उडाली.
आज संध्याकाळी ५ वाजेच्या सुमारास कल्याण-डोंबिवली भागात सोसाट्याच्या वाऱ्यासह, ढगांचा गडगडात आणि विजांच्या कडकडाटासह मुसळधार पाऊस सुरु झाला. यामुळे डोंबिवली स्टेशन परिसरात सुरुवातीला पाणी साचले. मात्र संध्याकाळी ६ वाजेनंतर पावसाचा जोर ओसरल्याने पाण्याचा निचरा व्हायला सुरुवात झाली. यावेळी केळकर रोड, डोंबिवली पश्चिमेला रेतीबंदर रोड परिसर, तर कल्याणमध्ये शिवाजी चौक ते मार्केट जाणाऱ्या मुख्य रस्त्यावर पाणी साचल्याने नागिकांना मोठ्या मनस्तापाला सामोरं जावं लागलं.
या तासभर झालेल्या पावसाने कल्याण-डोंबिवली करांची चांगली धावपळ उडाली. रस्त्या शेजारी असलेल्या नाल्यांमधून पाण्याचा निचरा होत नसल्याने सर्व पाणी रस्त्यावर आलं. कल्याण पूर्वेतील कचोरे भागात देखील पाणी साचल्याने वाहतुकीचा खोळंबा झाला होता. यावेळी कल्याण रेल्वे स्थानकात रेल्वे रुळांवर देखील पाणी साचण्यास सुरुवात झाली होती. अचानक आलेल्या या पावसामुळे गणपती विसर्जनाची तयारी करत अललेल्या मंडळाच्या कार्यकर्त्यांची तसंच कामावरुन घरी परतणाऱ्या चाकरमान्यांची मोठी धावपळ उडाली.