ठाणे

उल्हासनगरमध्ये हिट अँड रन; पाच जणांना चिरडले; चार गंभीर जखमी

पहाटेच्या वेळेत उल्हासनगरच्या रस्त्यावर घडलेली एक दुर्घटना अंगावर काटा आणणारी ठरली.

Swapnil S

उल्हासनगर : पहाटेच्या वेळेत उल्हासनगरच्या रस्त्यावर घडलेली एक दुर्घटना अंगावर काटा आणणारी ठरली. उल्हासनगर कॅम्प नंबर ४ च्या व्हीनस चौकात एका मद्यधुंद कारचालकाने भरधाव वेगाने गाडी चालवत पाच जणांना चिरडले. या भयंकर अपघातात चार जण गंभीर जखमी झाले आहेत. या घटनेने शहरात खळबळ उडाली आहे.

मंगळवारी पहाटे पाचच्या सुमारास, उल्हासनगरच्या कॅम्प नंबर चारमधील व्हीनस चौकात ही घटना घडली. एक भरधाव कार चौकातून जात असताना चालकाचे नियंत्रण सुटले. गाडीने रस्त्यावरून जात असलेल्या एका रिक्षाला, दुचाकीला आणि पादचाऱ्यांना जोरदार धडक दिली. या धडकेत चार जण गंभीररीत्या जखमी झाले. स्थानिकांनी तत्काळ जखमींना रुग्णालयात दाखल केले. या अपघातात गंभीर जखमी झालेल्या चार जणांपैकी दोघांवर खासगी रुग्णालयात तर उर्वरित दोघांवर शासकीय रुग्णालयात उपचार सुरू आहेत. वैद्यकीय अधिकाऱ्यांच्या माहितीनुसार, चारही जणांची स्थिती चिंताजनक असून त्यांच्यावर विशेष देखरेख ठेवली जात आहे.

प्राथमिक तपासात उघड झाले की, गाडी चालवत असलेला चालक मद्यधुंद अवस्थेत होता. त्याच्या निष्काळजीपणामुळे हा अपघात घडल्याचे पोलिसांनी सांगितले. साक्षीदारांच्या मते, चालक गाडी प्रचंड वेगात चालवत होता आणि तो पूर्णपणे नशेत होता. अपघातानंतर घटनास्थळी पोलीस दाखल झाले. अपघातग्रस्त गाडी जप्त करण्यात आली असून, चालकाला अटक करण्यात आली आहे. पोलिसांनी घटनास्थळाचा पंचनामा केला असून, सीसीटीव्ही फुटेजच्या आधारे पुढील तपास सुरू आहे. या अपघातामुळे व्हीनस चौक परिसरातील नागरिक संतप्त झाले आहेत. अनेकांनी मद्यधुंद चालकांविरोधात कठोर कारवाईची मागणी केली आहे. मद्यपान करून गाडी चालवणाऱ्यांना गंभीर शिक्षा झाली पाहिजे, असे एका स्थानिकांनी सांगितले.

या अपघातामुळे वाहतूक सुरक्षिततेबाबत मोठे प्रश्न उभे राहिले आहेत. अशा घटनांना आळा घालण्यासाठी अधिक कठोर नियम आणि तपासणीची मागणी होत आहे. प्रशासनाने मद्यधुंद वाहनचालकांवर कडक कारवाई करावी, अशी विनंती स्थानिक नागरिकांनी केली आहे.

या अपघाताने पुन्हा एकदा सिद्ध केले की, मद्यधुंद अवस्थेत वाहन चालवणे केवळ स्वतःच्याच नाही, तर इतरांच्याही जिवाला धोका निर्माण करते. या दुर्घटनेतून धडा घेत प्रशासनाने आणि नागरिकांनी वाहतूक नियमांचे काटेकोर पालन करणे गरजेचे असल्याचे मत व्यक्त होत आहे.

वडापाव, समोसा, कचोरी म्हणजे लठ्ठपणाला आमंत्रण; आरोग्य खाते सर्वत्र फलक लावणार

Mumbai : मढमधील बेकायदा बंगल्यांच्या बांधकामांसाठी शेकडो बनावट नकाशे : ४ बड्या अधिकाऱ्यांना कोर्टाचा दणका

Mumbai : कांदिवली, मालाड विभागातील 'हे' ७ पूल धोकादायक; लवकरच होणार पुनर्बांधणी

विजयी मेळावा मराठीपुरताच! त्याचा राजकारणाशी संबंध नाही, राज ठाकरेंच्या वक्तव्याने शिवसेना-मनसे युतीबाबत संभ्रम

निवडणूक आयोगाला फक्त चिन्ह देण्याचा अधिकार; उद्धव ठाकरेंची टीका