ठाणे

अंबरनाथमध्ये भीषण अपघात; शिवसेना उमेदवाराच्या गाडीने उडवलं, चौघांचा मृत्यू, थरकाप उडवणारा Video

भरधाव येणाऱ्या कारने दुचाकीस्वारांना चिरडले तर कार चालकाचाही मृत्यू झाला. या अपघातात अनेकजण जखमी झाले असून जखमींमध्ये शिवसेना शिंदे गटाच्या उमेदवाराचाही समावेश आहे.

किशोरी घायवट-उबाळे

सध्या राज्यभरात नगरपंचायत निवडणुकांची धामधूम सुरु आहे. अनेक ठिकाणी प्रचारसभा सुरु आहेत. अशातच, एका प्रचार सभेवरून परतत असताना अंबरनाथ येथे शिंदे गटाच्या उमेदवाराच्या गाडीने अनेकांना उडवलं. यामध्ये चौघांचा जागीच मृत्यू झाला असून काही जण जखमी झाले आहेत. या घटनेचा थरार सीसीटीव्ही कॅमेऱ्यात कैद झाला आहे.

या भीषण दुर्घटनेत उमेदवाराचा कारचालक लक्ष्मण शिंदे, अंबरनाथ महापालिका कर्मचारी शैलेश जाधव, चंद्रकांत अनारके आणि सुमीत चेलानी या दुचाकीस्वारांचा मृत्यू झाला.

अंबरनाथच्या पूर्व-पश्चिम जोडणाऱ्या उड्डाणपुलावर शुक्रवारी (दि.२१) सायंकाळी ही घटना घडली. शिंदे गटाच्या उमेदवार किरण चौबे यांची ही गाडी होती. त्यांचा ड्रायव्हर लक्ष्मण शिंदे याला अचानक हृदयविकाराचा झटका आला आणि ही भीषण घटना घडली. त्यांची कार समोरून येणाऱ्या दुचाकींवर आदळली. यामध्ये काहीजण तर थेट उड्डाणपुलावरुन खाली फेकले गेले.

अपघातावेळी चालकाचा पाय ऍक्सीलेटवर

शिंदे गटाच्या उमेदवार किरण चौबेही या अपघातात जखमी झाल्या आहेत. किरण यांना स्थानिकांनी कारची काच फोडून बाहेर काढले. चौबे यांनी पोलिसांना दिलेल्या माहितीनुसार, पुलावर गाडी जात असताना चालकाला फोन आला. त्यांनी पाहिले की, तो फोनवर बोलताना अचानक शांत झाला. पण, त्याच्या पायाने ऍक्सीलेटर जोरात दाबला जात आहे. काही समजायच्या आतच कार वेगाने पुढे गेली आणि हा अपघात घडला.

या अपघातानंतर स्थानिकांनी तात्काळ मदतीसाठी धाव घेतली. जखमींना त्वरित रुग्णालयात हलवण्यात आले. चालकाला हृदयविकाराचा झटका आला की अन्य तांत्रिक कारणे होती, याचा तपास सध्या सुरू आहे. दरम्यान, शिवसेना शिंदे गटाचे आमदार बालाजी किणीकर यांनी अपघातग्रस्तांची उल्हासनगर मध्यवर्ती रुग्णालयात जाऊन विचारपूस केली.

Mumbai : शीव पूल १५ जुलैपर्यंत वाहतुकीसाठी खुला होणार; अतिरिक्त पालिका आयुक्तांनी केली पाहणी

शिक्षक व शिक्षकेतर कर्मचाऱ्यांना दिलासा; अनुकंपा तत्त्वावरील नियुक्तीसाठी सुधारित योजना

ठाणे शहरात उभारले जाणार १९ ई-व्हेईकल चार्जिंग स्टेशन्स; प्रमुख चौकांमध्ये उपलब्ध होणार सुविधा; पीपीपी तत्त्वावर प्रकल्पाला मंजुरी

मीरा-भाईंंदर महापालिकेत भाजपचेच वर्चस्व; महापौरपद डिंपल मेहता, तर उपमहापौरपदासाठी ध्रुवकिशोर पाटील

Mira-Bhayandar : सोसायटीच्या ऑडिटसाठी मागितली लाज; सनदी लेखापाल ACB च्या जाळ्यात