ठाणे

धार्मिक स्थळापासून २०० मीटर परिसरात बेकायदेशीर लाऊडस्पीकरच्या वापरास बंदी

प्रतिनिधी

राज्यभरात भोंग्यांवरून राजकारण तापलेले असतानाच ठाणे पोलिसांनी कोणत्याही धार्मिक स्थळापासून २०० मीटर परिसरात बेकायदेशीर जमाव, घोषणाबाजी, गायन, वाद्य वाजविणे, विनापरवाना ध्वनीक्षेपकाचा वापर, रॅली, मिरवणुका आणि सभा घेण्यास २७ जूनपर्यंत बंदी घातली आहे. तसेच शहरातील ध्वनिक्षेपक विक्रेते, दुकानदारांना ध्वनिक्षेपक तसेच त्यासंबंधीचे साहित्य खरेदी करणाऱ्या सर्व ग्राहकांची वैयक्तिक माहिती घेऊन जवळील पोलीस ठाण्यात त्याची नोंद करण्याचे निर्देशही पोलिसांनी दिले आहेत.

राज्यभरात धार्मिक स्थळांवरील ध्वनिक्षेपकांवरून मोठे वादंग सुरू आहे. काही नेतेमंडळींनी धार्मिक स्थळांवर लावण्यात आलेल्या भोंग्यांना विरोध दर्शविल्याने अनेक ठिकाणी तणावाची परिस्थिती निर्माण झाल्याचे चित्र आहे. या पार्श्वभूमीवर सुरक्षिततेच्या दृष्टीने तसेच ध्वनीक्षेपणाच्या वापरामुळे ध्वनीप्रदूषणात वाढ होत असल्याने ठाणे आयुक्तालय क्षेत्रातील सर्व ध्वनिक्षेपक विक्रेते, दुकानदार, आस्थापना यांनी त्यांच्याकडून ज्या ग्राहकाने ध्वनिक्षेपक किंवा त्या संबंधीचे साहित्य खरेदी केले असेल त्या संबंधित व्यक्तीची माहिती जवळील पोलीस ठाण्यात देणे बंधनकारक असल्याचे निर्देश विशेष शाखेचे पोलीस उपायुक्त डॉ. सुधाकर पठारे यांनी दिले आहेत.

यामध्ये विक्रेत्यांना ध्वनिक्षेपक खरेदी करणाऱ्या ग्राहकाचे नाव, पत्ता, ओळखपत्र, आधारकार्ड, संपर्क क्रमांक, वीज देयक यांची तपासणी करून तसेच खरेदी केलेल्या ध्वनीक्षेपकांची संख्या आणि कोणत्या उद्देशाने खरेदी केले आहे, याबाबतची सविस्तर माहिती पोलिसांना द्यावी लागणार आहे. त्याचबरोबर कोणताही अनुचित प्रकार घडू नये यासाठी ठाणे आयुक्तालय क्षेत्रात असणाऱ्या धार्मिक स्थळापासून २०० मीटर परिसरात बेकायदेशीर जमाव, घोषणाबाजी, गायन, वाद्य वाजविणे, विनापरवाना ध्वनीक्षेपकाचा वापर, रॅली, मिरवणुका तसेच सभा घेणे यांसारख्या गोष्टी करण्यास २७ जूनपर्यंत मज्जाव करण्यात आला आहे.

अर्थव्यवस्थेची दमदार वाटचाल आणि स्वदेशीचा जागर

आजचे राशिभविष्य, ३० सप्टेंबर २०२५ : जाणून घ्या तुमच्या दिवसाचे ग्रहसंकेत

Maharashtra HSC Exam 2025 : पूरग्रस्त विद्यार्थ्यांना दिलासा; बारावीचा अर्ज भरण्यास मुदतवाढ

लॉरेन्स बिश्नोई गँग दहशतवादी संघटना म्हणून घोषित; कॅनडा सरकारचा मोठा निर्णय, टोळीसोबत व्यवहार केल्यास होणार शिक्षा

एका रात्रीत ३७ गायी, २० शेळ्यांचा बळी! पुरामुळे दुग्धव्यवसाय उद्ध्वस्त; धाराशिवच्या शेतकऱ्याचे ६० लाखांचे नुकसान, मदत अपुरी