ठाणे : ठाणे जिल्ह्यातील जलजीवन मिशन अंतर्गत पाणीपुरवठा योजना पूर्ण क्षमतेने कार्यान्वित कराव्यात, संबंधित अधिकाऱ्यांनी तसेच कंत्राटदारांनी नेमून दिलेली कामे गांभीर्यपूर्वक लवकरात लवकर पूर्ण करावीत, अशा सूचना राज्याचे पाणीपुरवठा व स्वच्छता मंत्री गुलाबराव पाटील यांनी दिल्या. मंत्री गुलाबराव पाटील यांनी ठाणे जिल्ह्यातील विविध पाणीपुरवठा योजनांच्या कामांची पाहणी केली. यावेळी त्यांनी जिल्ह्यातील पाणीपुरवठा विभागाच्या अधिकाऱ्यांशी याबाबत चर्चा केली. मंत्री पाटील यांनी पडघा, वाशिंद, आसनगाव, चेरपोली, खर्डी येथे भेट दिली.
यावेळी आमदार शांताराम मोरे, ठाणे जिल्हा परिषद मुख्य कार्यकारी अधिकारी छायादेवी शिसोदे उपस्थित होते.
मंत्रालयात घेतली आढावा बैठक
पाटील म्हणाले की, नुकतीच मंत्रालयात ठाणे आणि शहापूरची आढावा बैठक घेण्यात आली. पाणीपुरवठा संबंधित काही योजना आहेत, त्या योजनांची पाहणी करणे, अपूर्ण योजना पूर्णत्वास नेण्यासाठी आवश्यक कार्यवाही आणि अंमलबजावणी गतिमान करणे, त्यासोबतच बंद असलेली कामे बंद का आहेत?, त्यासंबंधी अडचणी काय आहेत?, त्या जाणून घेण्यासाठी या दौऱ्याचे नियोजन करण्यात आले. या दौऱ्यात स्थानिक आमदार तसेच लोकप्रतिनिधीही सोबत असणार आहेत