मान्सूनच्या आगमनाला झालेला विलंब आणि संभाव्य पाणीटंचाईच्या पार्श्वभूमीवर कल्याण-डोंबिवली महानगरपालिकेने (केडीएमसी) पाणीपुरवठ्यात कपात करण्याचा निर्णय घेतला आहे. राज्याच्या जलसंपदा विभागाच्या निर्देशानुसार २१ जूनपर्यंत विविध भागांमध्ये २४ तासांसाठी पाणीपुरवठा बंद ठेवण्यात येणार आहे.
भारतीय हवामान विभागाने (IMD) एल निनो आणि इतर हवामानविषयक घटकांमुळे मान्सून लांबण्याची शक्यता वर्तवली आहे. त्यामुळे राज्य सरकारने ३१ ऑगस्टपर्यंत पाणी व्यवस्थापनाचे नियोजन करण्याच्या सूचना स्थानिक स्वराज्य संस्थांना दिल्या आहेत.
या पार्श्वभूमीवर ९ जून रोजी झालेल्या आढावा बैठकीत महापालिका, एमआयडीसी आणि इतर यंत्रणांना दररोज २० टक्के पाणीबचतीचे नियोजन करण्याचे निर्देश देण्यात आले.
कोणत्या भागात कधी पाणीपुरवठा बंद राहणार?
१२ जून २०२६ आणि १७ जून २०२६ - नेतिवली जलशुद्धीकरण केंद्रातून होणारा पाणीपुरवठा बंद राहणार असून, याचा फटका डोंबिवली (पूर्व) येथील एफ आणि जी प्रभागातील नागरिकांना बसणार आहे.
१३ जून २०२६ आणि १८ जून २०२६ - बारावे जलशुद्धीकरण केंद्रातून होणारा पाणीपुरवठा बंद राहील. त्यामुळे कल्याण (पूर्व) येथील डी आणि ई प्रभाग, तसेच कल्याण (पश्चिम) येथील गोदरेज हिल, के प्रभागातील पार नाका आणि सुभाष मैदान टाकी परिसर प्रभावित होणार आहे.
१४ जून २०२६ आणि १९ जून २०२६ - नेतिवली जलशुद्धीकरण केंद्र बंद राहणार असल्याने डोंबिवली (पश्चिम) येथील एच प्रभागातील पाणीपुरवठा खंडित राहील.
१५ जून २०२६ आणि २० जून २०२६ - बारावे जलशुद्धीकरण केंद्रातून होणारा पाणीपुरवठा बंद राहणार असून, कल्याण (पश्चिम) येथील बी आणि के प्रभागातील नागरिकांना याचा फटका बसणार आहे.
१६ जून २०२६ आणि २१ जून २०२६ - मोहिली जलशुद्धीकरण केंद्रातून होणारा पाणीपुरवठा बंद राहील. त्यामुळे मांडा-टिटवाळा, वडवली, आंबिवली, शहाड, अटाळी आणि कल्याण ग्रामीण विभागातील इतर गावे, तसेच बी प्रभागातील योगीधाम, मिलिंद नगर, बिर्ला कॉलेज परिसर, चिकणघर, मुरबाड रोड परिसर आणि डी प्रभागातील वालधुनी परिसरातील पाणीपुरवठा प्रभावित होणार आहे.
नागरिकांना आवाहन
महापालिकेने स्पष्ट केले आहे की, ज्या दिवशी पाणीपुरवठा बंद राहणार आहे त्या दिवशी रात्री १२ ते पुढील रात्री १२ वाजेपर्यंत पूर्ण २४ तास पाणीपुरवठा बंद असेल. नागरिकांनी आवश्यक तेवढेच पाणी साठवून ठेवावे आणि प्रशासनाला सहकार्य करावे, असे आवाहन केडीएमसीकडून करण्यात आले आहे.