कर्जत : कर्जत-चौक राज्यमार्गावर शुक्रवारी सकाळी सुमारे ११ वाजण्याच्या सुमारास कंटेनर आणि दुचाकीची समोरासमोर भीषण धडक होऊन (२४) तरुणाचा जागीच मृत्यू झाला. या अपघातात कर्जत तालुक्यातील बीड गावातील रहिवासी जितेश हिरूजी रुठे याचा दुर्दैवी अंत झाला.
जितेश रुठे हा आपल्या दुचाकीवरून प्रवास करत असताना कर्जत-चौक राज्यमार्गावर समोरून येणाऱ्या कंटेनरची त्याच्या दुचाकीला जोरदार धडक बसली. अपघात इतका भीषण होता की, त्याचा घटनास्थळीच मृत्यू झाला. या घटनेची माहिती मिळताच स्थानिक नागरिक आणि पोलिसांनी घटनास्थळी धाव घेतली.
मुंबई महानगर प्रदेश विकास प्राधिकरणाकडून नव्याने विकसित करण्यात आलेल्या या राज्यमार्गावर गतिरोधकांची व्यवस्था नसल्याने वाहने अतिवेगाने धावत असल्याची तक्रार नागरिकांकडून वारंवार करण्यात येत आहे. वाढत्या वेगामुळे अपघातांच्या घटनांमध्ये वाढ झाली असून जून महिन्यातील दुचाकीस्वाराचा हा तिसरा बळी ठरला आहे.यापूर्वी मागील आठवड्यात भिसेगाव आणि वाकस येथील दोन तरुणांचा स्वतंत्र अपघातांमध्ये मृत्यू झाला होता. आता बीड गावातील जितेश रुठे याचा बळी गेल्याने कर्जत तालुक्यावर पुन्हा एकदा शोककळा पसरली आहे.
उल्हासनगरात भरधाव कारच्या अपघातात दोघे जखमी
उल्हासनगर : फारवर लाइन चौक परिसरात शुक्रवारी दुपारी भरधाव वेगाने धावणारी कार अचानक अनियंत्रित होऊन रस्त्यावरील डिव्हायडरवर आदळल्याने भीषण अपघात झाला. धडक इतकी जोरदार होती की कार दोन ते तीन वेळा पलटी होऊन रस्त्याच्या कडेला जाऊन थांबली. या अपघातात कारमधील दोघेजण गंभीर जखमी झाले असून वाहनाचा अक्षरशः चुराडा झाला.