ठाणे

नागरीकांवर कोणत्याही प्रकारच्या करवाढीचा बोजा नाही; KDMC ने २०२५-२६ चे अंदाजपत्रक केले सादर

शहरातील नागरिकांना उत्तम दर्जाच्या मूलभूत सोयीसुविधा पुरविण्यावर भर देणाऱ्या व नागरिकांवर कोणत्याही प्रकारच्या करवाढीचा बोजा न टाकणाऱ्या अंदाजपत्रकाचे गुरुवारी सादरीकरण करण्यात आले.

शंकर जाधव

कल्याण : कल्याण - डोंबिवली महानगरपालिकेच्या २६४२.६९ कोटी जमा व १९१५.६० कोटी खर्चाचे सन २०२४-२५ चे सुधारित अंदाजपत्रक आणि कोणतीही करदर वाढ नसलेले महापालिकेचे सन २०२५-२६ चे ३३६१.२५ कोटी जमा व ३३६१.०० कोटी खर्चाचा आणि २५ लाख रुपये शिल्लकेचे मूळ अंदाजपत्रक महापालिका आयुक्त व प्रशासक डॉ. इंदु राणी जाखड यांच्याकडून सादरीकरण करून मंजुरी देण्यात आली.

शहरातील नागरिकांना उत्तम दर्जाच्या मूलभूत सोयीसुविधा पुरविण्यावर भर देणाऱ्या व नागरिकांवर कोणत्याही प्रकारच्या करवाढीचा बोजा न टाकणाऱ्या अंदाजपत्रकाचे गुरुवारी सादरीकरण करण्यात आले. विभागनिहाय खर्चाच्या तरतुदी अंतर्गत घनकचरा व्यवस्थापनाकरिता महसुली खर्चांतर्गत १३५.३१ कोटी व भांडवली खर्चांतर्गत ४७.०० कोटींची तरतूद करण्यात आली आहे. १०० दिवस कृती आराखडा अंतर्गत वर्ग १ ते ४ मधील ३२३२ अधिकारी/कर्मचाऱ्यांना आश्वासित प्रगती योजनेचा लाभ देणे, अत्यावश्यक सेवेतील पदे सरळसेवेने भरणे, २७ गावातील ४९९ कर्मचाऱ्यांना महापालिकेत समावून घेणे इ. कामे प्रस्तावित असून, याकरिता अंदाजे ८०.०० कोटी वार्षिक खर्च अपेक्षित आहे.

भारतरत्न डॉ. बाबासाहेब आंबेडकर पूर्णाकृती पुतळा व ज्ञान केंद्राचे काम पूर्ण करण्यात आले असून, याकामी १६.८५ कोटी इतका खर्च येत असून, त्यापैकी रक्कम ९.०० कोटी शासनाकडून मंजूर झाले आहे. महापालिका क्षेत्रातील उद्याने व मैदाने यांची निगा व देखभालीसाठी एजन्सीची नियुक्ती करण्यात आली असून ३ वर्षांसाठी रक्कम १७.०० कोटी खर्च अपेक्षित आहे. दिव्यांग कल्याण व पुनर्वसनाकरिता १९.१० कोटींची तरतूद करण्यात आली आहे. शहरातील बेघरांसाठी महापालिका २ निवारा केंद्र चालवित असून याकरीता ५०.०० लाखांची तरतूद करण्यात आली आहे. महिला व बालकल्याण विभागांतर्गत महिला पोलिसांच्या दामिनी पथकाकरिता १६ स्कूटी वाहने भेट देण्यात येणार आहेत. महिलांसाठी कायदेशीर सल्ला देण्यासाठी समपुदेशन केंद्र सुरू करण्यात येणार आहे. याकरिता महसुली व भांडवली कामांकरिता १४.१६ कोटींची तरतूद करण्यात आली आहे. महापालिका शाळांतील व्यवस्थापन व शिक्षणात नाविन्यता आणण्यासाठी ३.०० कोटी मंजूर करण्यात आले आहेत.

महापालिकेच्या शाळांची दुरुस्ती, रंगकाम, फर्निचर इ. बाबींकरीता १९.४१ कोटी तसेच राज्य शासन व महापालिका यांच्या माध्यमातून आदर्श शाळा उभारण्याकरीता ८.२० कोटींची तरतूद करण्यात आली आहे. कैलास गार्डन, कल्याण (पश्चिम) येथे मल्टिस्‍पेशालीटी हॉस्पिटल उभारणे प्रस्तावित असून या सर्वांसाठी महसुली खर्चा अंतर्गत ५३.४० कोटींची तरतूद करण्यात आली आहे.

शहरातील सर्व रस्त्यांच्या देखभाल व दुरुस्तीसाठी एकूण ३०.०० कोटी निधी उपलब्ध करून देण्यात आला आहे.

पालिकेला अपेक्षित अनुदानाचा आढावा

विभाग अपेक्षित रक्कम

मालमत्ता कर ६००.०० कोटी

पाणीपट्टी वसुली १०१.०० कोटी

शासनाकडून ४८३.८३ कोटी

इतर अनुदान १३३.५९ कोटी

विविध शासकीय अनुदानातून ७८७.८३ कोटी

नवी मुंबईत अग्नितांडव! वाशीतील रहेजा रेसिडेन्सीला भीषण आग; ६ वर्षांच्या चिमूरडीसह ४ जणांचा मृत्यू, १० जखमी

मुंबईकरांनो सावधान! हवेची गुणवत्ता ढासळली, प्रदूषणात होतेय वाढ, AQI १६४ वर पोहोचला

समुद्रकिनारे धोक्यात! CRZ ‘बफर झोन’ ५०० वरून २०० मीटर करण्याचा नीती आयोगाचा प्रस्ताव, पर्यावरणवाद्यांनी व्यक्त केली नाराजी

अंदमान-निकोबार बेटांवर चक्रीवादळ धडकणार; हवामान खात्याचा इशारा

दिवाळीच्या पहिल्याच दिवशी दिल्लीतील हवा ‘अतिशय खराब’; दिल्लीकरांनी घेतला विषारी श्वास, हवेचा एक्यूआय ३०० च्या पुढे