मुरुड तालुक्यातील राजपुरी ग्रामपंचायत हद्दीतील सुप्रसिद्ध ऐतिहासिक जंजिरा किल्ला पर्यटकांसाठी १ सप्टेंबरपासून सुरुवात करण्यात आली. १जून ते ३१ ऑगस्ट या काळात सदरचा किल्ला पर्यटकांसाठी बंद ठेवण्यात आला होता. सध्या या किल्ल्याला पर्यटकांचा प्रतिसाद कमी प्रमाणात लाभत असल्याचे पहावयास मिळत आहे.
सध्याचे वातावरण पाहता पर्यटक मोठ्या संख्येने येत नाही. सध्या मुरुड तालुक्यात दिवसा ऊन असते तर सायंकाळी चारनंतर हवामान बदलते व रोज पाऊस पडत असतो. त्यामुळे पर्यटक फार अल्प प्रमाणात या किल्ल्यास भेट देत आहेत. परंतु किल्ला पर्यटकांसाठी सुरू झाल्याने स्थानिक बोट मालक व आजूबाजूच्या परिसरात व्यवसाय करणाऱ्यांची दुकाने सुरू झाल्याने स्थानिकांच्या स्वयंरोजगारास सुरुवात झाली आहे.
किल्ला हा स्थानिक राजपुरी जलवाहतूक संस्थांना एक शाश्वत उत्पन्नाचा स्रोत आहे. यामुळे स्थानिकांच्या रोजीरोटीचा प्रश्नही काही अंशी सोडवला जातो. जंजिऱ्यात जाण्यासाठी राजपुरी व खोरा बंदर येथून प्रवासी जलवाहतुकीची व्यवस्था उपलब्ध करून देण्यात आली आहे. खोरा बंदरातून होणारी वाहतूक बंद ठेवण्यात आली आहे.