माथेरानला मिळणार पाइपलाइनद्वारे गॅस; महानगर गॅसच्या अधिकाऱ्यांकडून पाहणी 
ठाणे

माथेरानला मिळणार पाइपलाइनद्वारे गॅस; महानगर गॅसच्या अधिकाऱ्यांकडून पाहणी

माथेरानमधील गॅस सिलिंडर वाहतुकीची वर्षानुवर्षांची समस्या सोडविण्याच्या कायमस्वरूपी दृष्टीने पाइपलाइनद्वारे गॅस पुरवठा करण्याच्या प्रस्तावाला वेग आला आहे.

Swapnil S

माथेरान : माथेरानमधील गॅस सिलिंडर वाहतुकीची वर्षानुवर्षांची समस्या सोडविण्याच्या कायमस्वरूपी दृष्टीने पाइपलाइनद्वारे गॅस पुरवठा करण्याच्या प्रस्तावाला वेग आला आहे. महानगर गॅस लिमिटेडच्या इंजिनिअरिंग, प्लॅनिंग आणि मार्केटिंग विभागातील अधिकाऱ्यांनी गुरुवारी माथेरानचा दौरा करून संभाव्य पाइपलाइन मार्गाची पाहणी केली. घाटाचा रस्ता, दस्तुरी नाका तसेच इंदिरानगर परिसराची पाहणी केल्यानंतर माथेरानमध्ये पाइपलाइनद्वारे गॅस पुरवठा करणे शक्य असल्याचा प्राथमिक अंदाज प्रकल्प अधिकारी जोबीन जॉन्सन, चेतन सुवर्णा आणि साईराज मोरे यांनी व्यक्त केला.

माथेरानचे नगरसेवक सुनील शिंदे हे या प्रकल्पासाठी सातत्याने पाठपुरावा करीत आहेत. वाहनांना बंदी असल्याने सध्या गॅस सिलिंडरची वाहतूक घोड्यांद्वारे केली जाते. त्यामुळे पुरवठ्यात विलंब होण्याबरोबरच ग्राहकांना वाहतूक खर्चापोटी अतिरिक्त १५० ते २०० रुपये मोजावे लागतात. हॉटेल व्यावसायिकांनाही गॅस उपलब्धतेच्या समस्येला सामोरे जावे लागत आहे.

प्रस्तावानुसार सिलिंडर ट्रकद्वारे दस्तुरी नाका येथे आणून तेथून यंत्रणेद्वारे पाइपलाइनच्या माध्यमातून संपूर्ण माथेरानमध्ये गॅसपुरवठा करण्याचा विचार आहे. महानगर गॅसच्या अधिकाऱ्यांनी तहसीलदार सुरेंद्रसिंग ठाकूर, मुख्याधिकारी राहुल इंगळे तसेच नगरसेवकांशी चर्चा केली. मुख्याधिकाऱ्यांनी प्रकल्पाचा सविस्तर अहवाल नगरपरिषदेकडे सादर करण्याच्या सूचना दिल्या आहेत.

(संबधित इंग्रजी बातमी वाचण्यासाठी येथे क्लिक करा.)

Mumbai : गणेशोत्सवासाठी BMC सज्ज; महापौर, उपमहापौरांकडून विसर्जनस्थळांची पाहणी

Ulhasnagar : बाप्पा येणार... पण खड्ड्यांतूनच? महापौरांचा संकल्प गेला खड्ड्यात! अजूनही विघ्न कायम; नागरिकांचा संतप्त सवाल

बदलापुरात सुरू होणार शेतकरी आठवडे बाजार; पूर्व-पश्चिम भागात चार ठिकाणी बाजारपेठ

Thane : गणरायाच्या सुरक्षेसाठी मंडळे सज्ज! मोठ्या मूर्तीना पट्ट्यांचा आधार; खड्डेयुक्त रस्त्यांची खरी अडचण

Mumbai : महामुंबई मेट्रो सेवा रात्री उशिरापर्यंत सुरू