चंद्रकांत सुतार/माथेरान
पर्यावरण संवेदनशील आणि वाहनमुक्त पर्यटनस्थळ म्हणून ओळखल्या जाणाऱ्या माथेरानमध्ये स्वच्छता व पर्यावरण संवर्धनासाठी महत्त्वपूर्ण पावले उचलली जात आहेत. कचऱ्यापासून संसाधन या उपक्रमासोबतच ‘Use & Throw’ प्लास्टिक रेनकोटवर बंदी घालून शहराला प्लास्टिकमुक्त करण्याच्या दिशेने ठोस प्रयत्न सुरू झाले आहेत. डोंगर-दऱ्या, घनदाट जंगल आणि वाहनबंदीची भौगोलिक रचना लक्षात घेता नगरपरिषदेचा हा निर्णय पर्यावरण संरक्षणाच्या दृष्टीने अत्यंत महत्त्वाचा मानला जात आहे.
दरवर्षी हजारो पर्यटक माथेरानमध्ये दाखल होत असल्याने प्लास्टिक कचऱ्याचे प्रमाण मोठ्या प्रमाणात वाढत आहे. पर्यटन स्थळे, जंगलातील पायवाटा आणि दऱ्यांमध्ये प्लास्टिकच्या बाटल्या, पिशव्या, रॅपर्स तसेच ‘Use & Throw’ रेनकोट मोठ्या प्रमाणावर टाकून दिले जात असल्याचे चित्र दिसून येत होते. विशेषतः पावसाळ्यात या कचऱ्यामुळे गटारे तुंबणे, पाण्याचा निचरा रोखला जाणे आणि पर्यावरणाला गंभीर हानी पोहोचण्याच्या घटना वाढत होत्या.
या उपक्रमात स्थानिक नागरिक, व्यापारी आणि स्वयंसेवी संस्थांचा सक्रिय सहभाग दिसून येत आहे. बाजारपेठांमध्ये प्लास्टिक वापर कमी करण्यासाठी जनजागृती केली जात आहे. आपला कचरा आपणच योग्य ठिकाणी टाका असा संदेश पर्यटकांपर्यंत पोहोचवला जात आहे.
माथेरान गिरीस्थान नगरपरिषदेचा पुढाकार
ही परिस्थिती लक्षात घेऊन माथेरान गिरीस्थान नगरपरिषद यांनी ‘Use & Throw’ प्रकारातील प्लास्टिक रेनकोटच्या विक्री, साठवणूक आणि वापरावर बंदी लागू केली आहे. नेरळ ते माथेरान मार्गावरील व्यापारी, नागरिक आणि पर्यटकांना स्पष्ट सूचना देण्यात आल्या असून पर्यावरण संरक्षण कायदा आणि प्लास्टिक वेस्ट मॅनेजमेंट नियमांनुसार कारवाईचा इशाराही देण्यात आला आहे.
माथेरान हे पर्यावरणदृष्ट्या अत्यंत संवेदनशील ठिकाण आहे. प्लास्टिकमुळे निसर्गाला धोका निर्माण होत असल्याने ‘Use & Throw’ रेनकोटवर बंदी घालण्यात आली आहे. स्वच्छ आणि प्लास्टिकमुक्त माथेरान हेच आमचे उद्दिष्ट आहे.चंद्रकांत चौधरी, नगराध्यक्ष
नगरपरिषदेचे उपक्रम पर्यावरण रक्षणासाठी अत्यंत महत्त्वाचे आहेत. नागरिक व पर्यटकांनी प्लास्टिकचा वापर टाळणे ही काळाची गरज आहे.शिवाजी शिंदे, गटनेते
'कचऱ्यापासून संसाधन' उपक्रम
नगरपरिषदेचा कचऱ्यापासून संसाधन हा उपक्रम प्रभावीपणे राबवला जात आहे. घराघरातून ओला व सुका कचरा वेगळा गोळा करण्यावर भर देण्यात आला असून कचरा वर्गीकरणाची सवय नागरिकांमध्ये निर्माण केली जात आहे. ओल्या कचऱ्यापासून सेंद्रिय खत तयार केले जात असून प्लास्टिक व पुनर्वापरयोग्य वस्तूंवर प्रक्रिया करून पुनर्चक्रण केले जात आहे. माथेरानचे वाहनमुक्त आणि डोंगराळ स्वरूप लक्षात घेता कचरा व्यवस्थापन अत्यंत आव्हानात्मक आहे. अनेक पर्यटनस्थळे जंगल आणि दुर्गम भागात असल्याने सफाई कर्मचाऱ्यांना प्रतिकूल परिस्थितीत काम करावे लागत आहे. तरीही कर्मचारी पावसाळा व पर्यटन हंगामात सातत्याने मेहनत घेत शहर स्वच्छ ठेवत आहेत.