ठाणे : हरयाणातून बेपत्ता झालेल्या आणि स्वतःची ओळखही विसरलेल्या एका तरुणीचे ठाण्यातील प्रादेशिक मनोरुग्णालयाच्या संवेदनशील उपचारांमुळे आणि समन्वित प्रयत्नांमुळे तब्बल सहा महिन्यांनंतर कुटुंबाशी भावनिक पुनर्मिलन झाले. डॉक्टर, परिचारिका, समाजसेवा विभाग आणि वागळे इस्टेट पोलिसांच्या अथक प्रयत्नांमुळे एका कुटुंबाला हरवलेली मुलगी पुन्हा मिळाल्याने आनंदाश्रूंनी भरलेला हा क्षण उपस्थितांसाठीही भावनिक ठरला.
३ जानेवारी रोजी तीन हात नाका परिसरात कविता (नाव बदललेले) ही ४५ वर्षीय महिला रडत बसल्याची माहिती वागळे इस्टेट पोलिसांना मिळाली. त्यानंतर पोलीस उपनिरीक्षक शशिकांत जाधव आणि महिला पोलीस मनीषा सूळ यांनी घटनास्थळी जाऊन तिला ताब्यात घेतले. मानसिक आजाराची लक्षणे दिसत असल्याने आणि स्वतःची ओळख सांगता येत नसल्यामुळे तिला उपचारासाठी ठाण्यातील प्रादेशिक मनोरुग्णालयात दाखल करण्यात आले. प्रादेशिक मनोरुग्णालयाचे वैद्यकीय अधीक्षक डॉ. नेताजी मुळीक यांच्या मार्गदर्शनाखाली तिच्यावर सातत्यपूर्ण आणि शास्त्रशुद्ध उपचार सुरू करण्यात आले. प्रेमळ सुश्रुषा, नियमित समुपदेशन आणि औषधोपचारांमुळे तिच्या प्रकृतीत हळूहळू सुधारणा होऊ लागली. ती बोलू लागली, मात्र स्वतःची ओळख किंवा घराचा पत्ता आठवत नव्हता. उपचारादरम्यान ती हरयाणवी बोलीभाषेत संवाद साधत असल्याचा महत्त्वाचा धागा मिळाल्याची माहिती मानसोपचारतज्ज्ञ डॉ. अमोल भुसारे यांनी दिली.
समाजसेवा अधीक्षक नितीन शिवदे यांनी तिच्याशी सातत्याने संवाद साधल्यानंतर तिने स्वतःचे नाव आणि गाव सांगितले. त्यानुसार हरयाणातील उचाना पोलिसांशी संपर्क साधून तिचा फोटो पाठविण्यात आला. तपासादरम्यान ती ऑक्टोबर २०२५ पासून बेपत्ता असल्याचे स्पष्ट झाले. अनेक महिन्यांपासून तिचा शोध घेत असलेले कुटुंबीय ही माहिती मिळताच तातडीने ठाण्यात दाखल झाले.
रुग्णालयात लेकीला पाहताच तिच्या वडिलांनी तिला घट्ट मिठी मारली. अनेक महिन्यांच्या विरहानंतर झालेल्या या भेटीत दोघांच्याही डोळ्यांतून आनंदाश्रू वाहू लागले. उपस्थित डॉक्टर, परिचारिका आणि कर्मचाऱ्यांनाही हा क्षण भावूक करून गेला. कुटुंबीयांनी रुग्णालय प्रशासन, समाजसेवा विभाग आणि पोलिसांचे मनापासून आभार मानले. या संपूर्ण कार्यात वॉर्ड इन्चार्ज मंगला संखे, मानसोपचार परिचारिका आशा डावरे, परिचारिका, समाजसेवा विभाग आणि इतर कर्मचाऱ्यांचे महत्त्वपूर्ण योगदान लाभले.
मानसिक आजारावर योग्य उपचार, संयम आणि माणुसकी यांच्या बळावर आयुष्य पुन्हा फुलू शकते. आज एका वडिलांना त्यांची हरवलेली लेक पुन्हा मिठीत घेता आली, यापेक्षा मोठे समाधान आमच्यासाठी दुसरे नाही.डॉ. नेताजी मुळीक, वैद्यकीय अधीक्षक