ठाणे : रायगड जिल्ह्यातील कर्जत तालुक्यातील कुरुंग गावाच्या हद्दीत ६,३९४ कोटी रुपये खर्चून उभारण्यात येणाऱ्या प्रस्तावित पोशीर धरण प्रकल्पाला आता सरकारकडून मंजुरी मिळाली असून, या प्रकल्पामुळे मुंबई महानगर क्षेत्रातील पाणीटंचाईच्या समस्येवर मोठा तोडगा निघणार आहे. धरणामुळे नवी मुंबई, उल्हासनगर, अंबरनाथ, बदलापूर आणि एमएमआरडीए हद्दीतील भागांना आवश्यक त्या प्रमाणात पाणीपुरवठा होणार आहे. कोकण पाटबंधारे विकास महामंडळाने (KIDC) संबंधित पाच नागरी संस्थांना निधी वाटपाची अंमलबजावणी करण्याचे स्पष्ट निर्देश दिले आहेत.
सदर प्रकल्पासाठी ६,३९४ कोटी रुपयांचा खर्च अपेक्षित असून, KIDC मार्फत प्रकल्प राबवला जाणार आहे. या प्रकल्पासाठी प्रत्येक लाभार्थी संस्थेने त्यांच्या भांडवली खर्चातून निधी देणे अपेक्षित असून, पुढील आर्थिक वर्षासाठी आवश्यक तरतूद करून ठेवण्याचे निर्देश देण्यात आले आहेत.
या प्रकल्पाचा आराखडा तयार झाला असून, मार्च २०२५ च्या विधिमंडळ अधिवेशनात या प्रकल्पास प्रशासकीय मंजुरी मिळाल्यानंतर तांत्रिक मंजुरीची प्रक्रिया गतिमान करण्यात आली. महापालिका आणि नगरपरिषदांनीही यासंदर्भात तयारी सुरू केली असून, उल्हासनगर महापालिकेच्या आयुक्त मनीषा आव्हाळे यांनी सुधारित अर्थसंकल्पात तरतूद केल्याचे केआयडीसीला लेखी कळवले आहे.
या प्रकल्पाची मांडणी व मागणी गेल्या अनेक वर्षांपासून सुरू होती. बदलापूर येथील शेतकरी हक्क संघर्ष समितीचे अध्यक्ष राम पाटकर यांनी एमएमआरडीचे सदस्य असताना या धरणाचा प्रस्ताव पुढे रेटला होता. त्यानंतर त्यांनी तत्कालीन मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांची भेट घेत प्रस्तावाचे महत्त्व पटवून दिले. शासनानेही प्रस्तावाची गंभीर दखल घेत २०२५च्या अधिवेशनात निधी मंजुरी प्रक्रिया सुरू केली. अखेर प्रकल्पास प्रशासकीय व तांत्रिक मंजुरी मिळाली असून, प्रत्यक्ष निधी उभारणी आणि कामाचे टप्पे निश्चित करण्यास सुरुवात झाली आहे.
राजकीयदृष्ट्या पाहता, हा प्रकल्प विविध पक्षांच्या लोकप्रतिनिधींनी एकत्र येऊन रेटलेला असल्यामुळे राज्य शासन आणि स्थानिक संस्थांमधील समन्वयातून घडून आलेल्या यशस्वी प्रयत्नांचे उदाहरण म्हणून पाहिला जात आहे. पाणी ही मूलभूत गरज असल्याने या प्रकल्पावर सर्वच स्तरांवर सकारात्मक प्रतिसाद मिळत आहे.
भौगोलिक दृष्टिकोनातून पाहता, कर्जत तालुक्यातील कुरुंग गाव हे एमएमआरच्या तुलनेने उंच ठिकाणी वसलेले असून, गुरुत्वाकर्षणाचा उपयोग करून मोठ्या खर्चाविना पाणी वाहून नेणे शक्य आहे, असे जलतज्ज्ञांचे म्हणणे आहे. त्यामुळे या प्रकल्पामुळे एमएमआर परिसरातील नजीकच्या शहरांमधील जलसंकट दूर होण्याची शक्यता अधिक आहे.
या निधीचे वाटप पुढीलप्रमाणे
धरण प्रकल्पाच्या लाभार्थी संस्थांनी आपल्या २०२५-२६ या आर्थिक वर्षाच्या भांडवली अर्थसंकल्पातून हा निधी मंजूर करावा. जेणेकरून कामास वेळेत गती देता येईल. हा प्रकल्प बर्वी धरणाच्या पूरक स्रोताच्या रूपाने उभा राहणार आहे.विनोद मुंजप्पा, कार्यकारी अभियंता केआयडीसी
धरणाचे स्थान
धरणाचे स्थान कुरुंग गाव असून, हे धरण दगड व मातीच्या रचनेचे असेल. त्याची एकूण पाणी साठवण क्षमता ३४९ दशलक्ष घनमीटर (MCM) इतकी आहे. पाणी बारवी धरण किंवा अन्य साठ्यांवरून न आणता थेट पोशीर धरणातून एमएमआर क्षेत्रात आणण्यात येणार असल्याने यामुळे दीर्घकालीन व स्थायी स्वरूपाचा जलपुरवठा शक्य होणार आहे.
पाण्याच्या प्रश्नावर तो कायमस्वरूपी तोडगा
एकूणच पोशीर धरण प्रकल्पामुळे मुंबई महानगर क्षेत्रातील नागरी वस्तीच्या वाढत्या पाण्याच्या गरजा भागवण्यासाठी एक स्थायी पर्याय उभा राहणार आहे. यामुळे बारवी, भातसा, तानसा यांसारख्या अस्तित्वातील धरणांवरील ताण कमी होईल. शासन, स्थानिक संस्था, आणि लोकप्रतिनिधी यांच्यातील सहकार्यामुळे हा महत्त्वाकांक्षी प्रकल्प मूर्त रूपात साकारला जात आहे. येत्या काही वर्षांत पिण्याच्या पाण्याच्या प्रश्नावर तो कायमस्वरूपी तोडगा ठरेल, अशी नागरिकांची अपेक्षा आहे.