ठाणे

कुत्र्यांच्या निर्बीजीकरणासाठी मनपा नेमणार ठेकेदार, भटक्या कुत्र्यांनी १३५ नागरिक व मुलांना चावा घेतला

Swapnil S

भिवंडी : जुलै महिन्यातील ६ ते ८ तारखेदरम्यान कामतघर, शांतीनगर आणि शहरातील इतर भागात मिळून भटक्या कुत्र्याने १३५ नागरिक व मुलांना चावा घेतला होता. तर केवळ शांतीनगरमधील भागात पिसाळलेल्या कुत्र्याने ४० पेक्षा जास्त विद्यार्थ्यांना व नागरिकांना चावा घेतला होता. या घटनेमुळे शहरातील कुत्र्यांच्या नसबंदीचा विषय ऐरणीवर आला. याची गंभीर दखल घेत महानगरपालिका प्रशासनाने कुत्र्यांच्या नसबंदीसाठी लागणाऱ्या व्यवस्थेची तयारी केली असून लवकरच कुत्र्यांच्या निर्बीजीकरणाची निविदा महानगरपालिकेच्या आरोग्य विभागाकडून प्रसिद्ध केली जाणार आहे.भिवंडी महापालिकेने गेल्या १२ वर्षांपासून कुत्रे पकडून त्यांची नसबंदी करण्याची प्रक्रिया पूर्णपणे बंद केली आहे. त्यामुळे भिवंडीत भटक्या कुत्र्यांची संख्या वाढली असून शहरातील रस्ते आणि गल्ल्या भटक्या कुत्र्यांचे आखाडे बनले आहे. रस्त्यांवरून जाणारे नागरिक अथवा वाहने यांच्या अंगावर कुत्रे धावून अथवा त्यांचा पाठलाग करून त्यांना चावण्यांचे प्रकार दैनंदिन जीवनात घडत असून एका महिन्यात सुमारे ८८६ जणांना भटके कुत्रे चावल्याची नोंद शहरातील इंदिरा गांधी स्मृती रुग्णालयाच्या वैद्यकीय अधिकारी डॉ. माधवी पंधारे यांनी दिली.भिवंडी महानगरपालिकेच्या आरोग्य विभागाच्या म्हणण्यानुसार २०१२ पूर्वी कुत्रे पकडून त्यांची नसबंदी करण्यासाठी संस्थांची व ठेकेदाराची नेमणूक केली होती. त्यासाठी स्थानिक कांबा गावातील डम्पिंग ग्राऊंडमध्ये नसबंदी केंद्र सुरू करण्यात आले होते. तर भटक्या कुत्र्यांच्या नसबंदीचा ठेका अंबरनाथच्या कुशल सेवा संस्था, पनवेलच्या पशु वेल्फेअर सोसायटीला दिले होते. महापालिका दोन्ही संस्थांना प्रति कुत्रा ११४० रुपये देत असे.

महापालिकेच्या सूत्रांनी दिलेल्या माहितीनुसार २००८ ते २०१२ या कालावधीत संस्थेने ३८ हजार ८६८ कुत्र्यांची नसबंदी केली होती.त्यासाठी महापालिकेने पाच वर्षांत २ कोटी ४८ लाख ३५ हजार ३० रुपये खर्च केले होते. त्यानंतर गेल्या १२ वर्षांपासून महापालिकेने कुत्र्यांची नसबंदी आणि पकडणे पूर्णपणे बंद केले आहे, त्यामुळे संपूर्ण शहरात समस्या निर्माण झाली आहे.भिवंडी महापालिका आरोग्य विभागाच्या म्हणण्यानुसार या कामासाठी चार वेळा निविदा काढण्यात आल्या.

तीन वेळा कोणीही टेंडर भरले नाही, मात्र चौथ्यांदा युनिव्हर्सल ॲनिमल वेल्फेअर सोसायटीने टेंडर भरले होते, त्यालाही टेंडर देण्यात आले होते. १५ फेब्रुवारी २०२० रोजी या कंपनीने सुरक्षा रक्कम जमा करण्यास नकार दिला, ज्यामुळे या संस्थेस काम देण्यात आले नाही.

महापालिकेच्या सर्वेक्षणानुसार २०१८ मध्ये त्यांची संख्या ८५१९ होती.दरम्यानच्या काळात कुत्र्यांची संख्या लक्षणीय वाढली असून सूत्रांनी दिलेल्या माहितीनुसार, सध्या शहरात सुमारे २५ हजार पेक्षा जास्त भटकी कुत्री आहेत.त्यांची संख्या मोजून आणि त्यांना मार्किंग करून नव्याने त्यांची नसबंदी करण्याची मागणी नागरिकांकडून केली जात आहे.

भिवंडी महानगरपालिका आरोग्य विभागाकडे ४८५ रेबीज इंजेक्शन उपलब्ध आहेत, त्यापैकी १५ रेबीज लसीचा वापर आरोग्य केंद्रात (ईदगाह केंद्र) करण्यात आला आहे. उर्वरित इंजेक्शन महापालिकेच्या दवाखान्यात उपलब्ध आहेत.कुत्रा चावल्यानंतर नागरिकांनी महापालिकेच्या या दवाखान्यात जाऊन रेबीजचे इंजेक्शन घ्यावे.तसेच शहरातील भटक्या कुत्र्यांच्या निर्बीजीकरणासाठी लागणारी कायदेशीर प्रक्रिया कागदोपत्री पूर्ण केली असून लवकरच त्यासाठी निविदा प्रसिद्ध करण्यात येणार आहे.

अजय वैद्य -भिवंडी महापालिका आयुक्त

Mumbai : आर्थिक कोंडी फोडण्यासाठी ‘बेस्ट’ आयडिया! आता CNG विकणार; २७ डेपोंत प्रकल्प राबवणार

कोल्हापूर -पुणे 'वंदे भारत' आजपासून; आठवड्यातून ३ दिवस धावणार, बघा वेळापत्रक

‘लालबागचा राजा’च्या दर्शनासाठी भेदभाव; दोन वकिलांची मुंबई पोलिसांकडे तक्रार

नोव्हेंबरच्या दुसऱ्या आठवठ्यात निवडणुका; मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांचे संकेत, महायुतीचे जागावाटप आठवडाभरात पूर्ण!

गणरायाच्या विसर्जन सोहळ्यासाठी BMC सज्ज; ६९ नैसर्गिक स्थळांसह, २०४ कृत्रिम विसर्जनस्थळांची व्यवस्था